गलितगात्र

निष्ठूर जीवना मी गाळून गात्र आहे
देण्या लढा तुझ्याशी आता न पात्र आहे
जिव्हा मुखात काळी आहे तुझ्या जरीही
बोले तसे घडावे हा योग मात्र आहे
जी वाटते हवी, तू नसताच सोबतीला
भासे नको नकोशी ही दीर्घ रात्र आहे
गंभीर घेतला मी अभ्यास जीवनाचा
झालास तू गुरु मी अद्याप छात्र आहे
साध्या गुन्ह्यास माझ्या निश्चीत सूळ आहे
तू खूनही करावा जामीनपात्र आहे (स)
ऐकून तव कहाणी ''कैल्या''स वाटताहे
मी पिंकदान आहे तू फूल-पात्र आहे.
डॉ.कैलास गायकवाड