मन जाणे पापा!

जेवणाची सुटी होती. नेहमीप्रमाणे त्या पाचसहाजणी कँटिनमधल्या एका टेबलाशी घोळका करून बसल्या होत्या. गप्पांचा विषय होता, "आम्ही काय उपाय करतो"

एक म्हणाली, "मी नाही काही करत. नवराच काय ते बघतो". "बघतो" या शब्दावरून थोडं चावट विषयांतर झालं.

दुसरीनी आपण गोळ्या घेत असल्याचं सांगितलं. त्यावर काहीजणींनी आपणही तेच करतो अशा अर्थाच्या माना डोलवल्या.

आणखी एकजण म्हणाली, "आम्ही दिवस पाहून काय ते करतो". त्यावर थोडी खसखस पिकली.

मग सगळ्यांनी सुषमाकडे मोर्चा वळवला.

सुषमा म्हणजे इतरांच्या मते एक सँपल होती. इतरजणी गरज म्हणून नोकरी करत होत्या. सुषमा वेळ घालवण्यासाठी नि फॅशनच्या चैनीसाठी लठ्ठ पगाराच्या नवऱ्याकडे पैसे मागायला नकोत म्हणून नोकरी करत होती. उच्च राहणी आणि साधी विचारसरणी. एका गोष्टीचं मात्र तिला वेडच होतं म्हणा ना! ते म्हणजे आपली फिगर टिकवण्याचं. तिच्या मते फिगरचा एकच मानदंड होता. तो म्हणजे वजन कमी असणं. त्यासाठी ती सर्व आघाड्यांवर पहारा ठेवून होती.

तिला या चावट टाइमपासमध्ये काही रस नव्हता. तशीही ती ग्रुपमध्ये असली तरी फारशी कोणाशी बोलत नसे. अपवाद निलिमाचा. निलिमा आणि ती जबलपूरजवळच्या एकाच गावातल्या. लग्न होऊन मुंबईत आलेल्या. एकाच 'स्टेटस'च्या नि योगायोगानी एकाच ऑफिसात लागलेल्या.  

पण इतरजणीनी तिचा पिच्छाच पुरवला. फिगरविषयी दक्ष असलेल्या सुषमाबद्दल त्यांना असूया नि कुतूहल दोन्ही होतं. तिला एक मुलगा होता हेही त्याना ठाऊक होतं.

"तुम्हाला दुसरे काही विषय नाहीत का ग? " म्हणून सुषमा उठली. जेवणाची सुटी संपत आल्यामुळे इतरजणीही आपापल्या जागेवर गेल्या.

एकाच गावच्या असल्यामुळे सुषमा नि निलिमामध्ये ज्यास्त जवळीक होती. पुढे दोघींच्या कुटुंबांमध्येही मैत्री झाली. एकमेकांकडे जाणं येणं व्हायला लागलं.

"आम्ही साधनं वापरत नाही. अजितला आवडत नाही", एकदा तिनी निलिमाला सांगितलं. अजित तिचा नवरा. "मग गोळ्या घेत असशील" निलिमा म्हणाली. "नाही. गोळ्यानी भूक वाढते. मग खाण्यावर ताबा राहात नाही नि सगळीच मेहनत पाण्यात". मेहनत म्हणजे फिगर टिकवायला लागणारी.

"मग कसं काय मॅनेज करतेस? " निलिमानी विचारलं. "सांगीन वेळ आली की", सुषमा म्हणाली. निलिमानी तिचा नाद सोडला.

अजित अतिशय सालस स्वभावाचा होता. त्याचं बायकोवरचं प्रेम त्याच्या चारचौघातल्या वागण्यातही दिसून यायचं. दणकट शरीरयष्टीचा अजित सुषमाच्या मैत्रिणीबरोबर अदबीनी वागायचा.

हळूहळू एकेक गोष्टी बाहेर येऊ लागल्या. दोघांपैकी कोणीही ऑपरेशन करून घेतलेलं नव्हतं. एकच मूल नि तरुण वय असलेलं जोडपं ऑपरेशन करून घेईल अशी अपेक्षा करणंच चुकीचं होतं. पण मधूनच केव्हातरी सुषमा ऑफिसला दांडी मारायची नि डॉक्टरकडे जायची. तिची नेहमीची एक गायनॅक होती. दर दीड दोन महिन्यानी तिला गायनॅककडे जावं लागायचं. एवढा काय प्रॉब्लेम होता ते कोणालाच कळलं नाही. पण तिनीच एकदा निलिमाला सांगितलं क्युरेटिंग करून घ्यायला जाते म्हणून. ती तिची संततीनियमनाची पद्धत होती. तसं पाहिलं तर खर्चाचीच. पण पैशाला काही कमी नव्हतं. शिवाय गोळ्यांप्रमाणे त्यात वजन वाढण्याचा धोका नाही असं तिला वाटत होतं. 

दुसरीकडे देहदंड सोसून सुषमाची फिगरसाधना चालूच होती. तिचं जेवण म्हणजे दुपारी एक सँडविच नि रात्री एक सँडविच. निलिमाच्या घरीही चहाकॉफी ती अनिच्छेनीच घ्यायची. तिथेही सुरवातीला तिचं कौतुक होतं. पण नंतर निलिमाच्या घरातल्याना तो वेडेपणा वाटायला लागला. तसं निलिमानी तिला एकदोन वेळा सुचवलंही. पण मी मजेत आहे मला काही त्रास नाही म्हणून सुषमानी ते उडवून लावलं.

आयुष्य पुढे सरकत होतं. सुषमाच्या जगावेगळ्या वागण्याची सर्वाना सवय झाली. आता क्वचितच त्याबद्दल कोणी बोलायचं.

एक दिवस कळलं अजित इथली नोकरी सोडून गल्फ ला चाललाय. सुषमाला ते फारसं पसंत नव्हतं. जिवाभावाच्या मैत्रिणींत त्याविषयी बोलणंही झालं. निलिमानी नि तिच्या नवऱ्यानी अजितला विचारलं. त्यावर "दोन वर्षात परत येतोय. तुम्हीच समजवा तिला जरा" असं तो म्हणाला.

अजित गल्फ ला गेला नि सहाएक महिन्यानी सुषमा आजारी पडली. महिनाभर तिनी तिच्या गायनॅककडे ट्रीटमेंट घेतली. ट्रीटमेंट संपल्यावर ती पुन्हा ऑफिसात रुजू झाली. तिला खूप अशक्तपणा आला होता. आता तिच्याकडे कोणाला पाहवत नव्हतं.

जेमतेम आठ दिवस ती ऑफिसला आली नि पुन्हा आजारी पडली. मग मात्र तिची तब्बेत बिघडतच गेली. निलिमाच्या नवऱ्यानी अजितला फोनवर कल्पना दिली. त्याला एकदम काळजी वाटली. नोकरी सोडून तो भारतात परत आला.

सुषमानी नोकरी सोडल्यातच जमा होतं. 

अजित परत आल्यावर एक दिवस निलिमा आपल्या नवऱ्याला नि मुलाला घेऊन प्रकृतीची चौकशी करायला तिच्या घरी गेली. सुषमा आंथरुणाला खिळली होती. घरीच सलाइन लावलं होतं. अजित नि त्यांचा मुलगा सुजीत तिच्या उशापायथ्याशी होते. निलिमा आल्यावर सुजीत तिच्या मुलाबरोबर खाली खेळायला निघून गेला. बोलताबोलता कळलं, सुषमाला गर्भाशयाचा कर्करोग झाला होता. तो बरा होण्याच्या पलीकडे गेला होता.

तरीही उपचार म्हणून निलिमा नि तिच्या नवऱ्यानी तिला शुभेच्छा दिल्या. "काळजी करू नकोस तू नक्की बरी होशील" निलिमा मनापासून बोलली. तिचा स्वर गदगदलेला होता.

सुषमा क्षीण हसली. निलिमाकडे बघत म्हणाली, "मी गेल्यावर जरा सुजीतकडे लक्ष असू दे. " सर्वजण भेदरले. निलिमाच्या डोळ्यात पाणी आलं. बरं झालं सुजीत जवळपास नव्हता ते. हताश स्वरात अजित म्हणाला, "इथे मी तुझ्यासाठी परत आलो नि तूच आता जायच्या गोष्टी करतेस? "

अस्वस्थ शांततेत काही क्षण गेले. अजितकडे पाहात सुषमा म्हणाली, "तुम्ही जरा बाहेर जाता का? मला हिच्याशी जरा बोलायचंय. "

अजित, निलिमाचा नवरा, बाहेर गेले.

"इतक्या अचानक हे कसं काय झालं? " बाहेर आल्यावर निलिमाच्या नवऱ्यानी विचारलं.

"अहो काय सांगणार! " कपाळाला हात लावत अजित म्हणाला. "तिला दुसरं मूल नको होतं. म्हंटलं ठीक आहे. पण म्हणून सारखा गर्भपात करून घ्यायचा? दुसरे उपाय नाहीत? जरा प्रेग्नन्सीची शंका आली की बाईसाहेब चालल्या ऍबॉर्शन करून घ्यायला! म्हणायची क्युरेटिंग करायला चालले. पण आत्ता कळतंय तिच्या गायनॅककडून की ती ऍबॉर्शन्स होती . किती झाली त्याला मोजदादच नाही. तिनी तरी सुषमाला सांगायचं ना की त्यात धोका आहे म्हणून! पण नाही. पैसा मिळत होताना तिला त्यात!" थोडं थांबून तो पुढे म्हणाला, "सोडणार नाही तिला. केसच करतो तिच्यावर! "

निलिमाचा नवरा त्यावर काही बोलला नाही.

दोघेही आत परत आले. मैत्रिणींमधल्या गुजगोष्टी संपल्या होत्या.

थोड्याच दिवसात सुषमा गेली. सर्व काही माहीत असूनही निलिमाला ती अचनक गेल्यासारखं वाटलं.

ऑफिसात बातमी पोचली. सर्वजणी हळहळल्या. त्या दिवशी जेवणाची सुटी शांततेत गेली.

एक दिवस निलिमाच्या नवऱ्यानी तिला विचारलं, "त्या दिवशी सुषमा तुझ्या एकटीशी काय बोलली गं? काही विशेष? " पण लगेचच पुढे म्हणाला, "नाही म्हणजे काही गायनिक प्रॉब्लेमबद्दल असेल तर नको सांगूस. "

"तसं काही नाही." निलिमा म्हणाली. "तिला सारखे भास होत होते. त्याबद्दल ती सांगत होती. "

"कसले भास? "

"तिला हातात मूल घेतलेली देवी दिसायची म्हणे! "