सक्तीची निवृत्ती

पिंक स्लिप
******

भिंतीवर माझी  ' चीफ,एचआरडी ' ची पाटी आहे
नावासोबत विदेशी पदव्यांची दाटी आहे
समोर बसलेला, माझ्या दुप्पट वयाचा
इथला सर्वात जुना कर्मचारी विचारतोय,
' हे सकाळीच बोलावणं कशासाठी आहे? '
....
तो बंद लिफाफा मी मूकपणे त्याला देतो--
कुठल्याच गुलाबी भावनांशी नातं नसणारी
पिंक स्लिप आहे त्यात, जुनी नाती पुसणारी..
...
मी आवंढा गिळतो,
आणि बरेचसे अवघडलेले शब्दही.
एवढं शिकलो, पण एवढंच शिकलो नाही-
शांतपणे कसं सांगायचं कुणाला,
'उद्यापासून तुम्ही यायची गरज नाही' ?
...
दोन धीराचे शब्द मला सुचायच्या आतच-
त्या दोन ओळी वाचून
तो सावकाश उठतो,
माझी अवस्था पाहून अचानक मोकळं हसतो.
आणि उभं रहायचंही विसरुन गेलेल्या मला
खांद्यावर हलकं थोपटून, निघूनही जातो....
...
आता केबिनमध्ये माझ्या सोबतीला
एक नवंच कोडं मुक्कामाला आलंय-  
आज इथे
नक्की कुणी कुणाला मुक्त केलंय ?