सिक्कीम सहल-९: गान्तोक ते न्यू जलपैगुडी प्रवास

गान्तोक-४: गान्तोक ते न्यू जलपैगुडी प्रवास

सकाळी ०९०० वाजता नास्ता झाल्यावर, ११३०० ला सिलिगुडीकडे प्रयाण करण्यापूर्वी, दोन तास वेळ उपलब्ध होता. आम्ही तत्परतेने महात्मा गांधी मार्गावर एक प्रभातफेरी मारून आलो. केरकचरा आणि पानाच्या पिचकार्‍या विरहित क्षेत्र (लिटर अँड स्पिट फ़्री झोन), अशी पाटी दिमाखाने मिरवत महात्मा गांधीपथ आमचे सहर्ष स्वागत करत होता. खरेदीचा हुरूप काही केल्या मावळत नव्हता. पर्यटक आता परतीच्या प्रवासास लागतांना स्मरणभेटींच्या खरेदीत गुंतलेले होते. तरीही लवकर हॉटेलवर पोहोचून सामानाची आवराआवर करणेही गरजेचे होते. तीन दिवस सतत गान्तोकमधेच राहत असल्याने जवळपास सारेच सामान बाहेर काढले गेलेले होते.

सामानाची बांधाबांध झाली. आमची बस पाल्जोर स्टेडियमसमोरच्या मोकळ्या पटांगणात उभी असल्याचे वृत्त समजले. मग प्रवासी आणि सामान सार्‍यांचीच हॉटेलच्या मागेच असलेल्या पाल्जोर स्टेडियमसमोर उचलबांगडी झाली. सामान टपावर चढले. तर प्रवासी बसमधे. परस्परांच्या संपर्क-पत्त्यांची देवाणघेवाण सुरू झाली. संपन्न झाली. गणपती बाप्पा मोरयाचा गजर झाला आणि बस सिलिगुडीच्या दिशेने मार्ग आक्रमू लागली. सुमारे दोन तासात जवळजवळ तीस किलोमीटरचे अंतर कापून रँग्पो इथे पोहोचलो. आमच्यासोबतच्या जर्मन नागरिकांच्या "ईनर लाईन परमिट"चे सोपस्कार सांभाळण्याकरता थोडे थांबलो आणि मग पुन्हा प्रवास सुरू झाला.

रँग्पोहून आम्ही निघालो तेव्हा कॉलिंपॉन्ग ३५, दार्जिलिंग ५८, सिलिगुडी ७७, तर न्यू-जल-पैगुडी ९१ किमी अंतरांवर होते. तिस्ता नदीवरला सिक्कीम-पश्चिम बंगाल सीमेवरला पूल ओलांडला आणि मग आम्हाला लागले दार्जिलिंग-गोर्खाऱ्हिल-कौन्सिलचे "चित्रे वे-साईड इन्न रिव्हर राफ्टिंग सेंटर". इथेच आम्ही जेवलो. दार्जिलिंगहून जेव्हा सिक्कीमला निघालो होतो तेव्हा इथेच, आकाश भरून आल्याने व पाऊस पडू लागल्याने, आमच्यातील बहुसंख्य लोकांनी तराफातरणाच्या आमच्या कार्यक्रमास फाटा देण्यास प्राधान्य दिलेले होते. तेव्हा, वेळ असूनही आम्ही पावसाच्या भीतीने तराफातरण करू शकलो नव्हतो. आता तर रात्री आठची दार्जिलिंग मेल न्यू-जल-पैगुडीस जाऊन पकडायची असल्याने, गाठीस वेळच नव्हता. येनकेनप्रकारेण तराफातरणाची संधी हुकली होती. ते शल्य मनात धरूनच इथून काढता पाय घेतला.

रँग्पो ते सिलीगुडी अंतर हा त्या मानाने सपाटीवरला प्रवास. या प्रवासात रस्त्याच्या दुतर्फा शाल्व (साल- ज्याच्या खोडाच्या लाकडाचा उपयोग लोहमार्गाखाली आधार देण्याकरता करतात, स्लीपर्स म्हणून) वृक्षांची लागवड दिसून आली. हिरवा गार लंबवर्तुळाकृती डौलदार पर्णविस्तार आणि काळसर बुंधा (खोड) यांनी नटलेली उंचच उंच झाडे सर्वदूर लावलेली होती. नजर पोहोचेस्तोवर चारही बाजूंना साल वृक्षच दिसत होते. पुढे साल लाकडाच्या भव्य वखारी आणि आगरेही नजरेस पडली. सालाचे कठीण लाकूड किंमती असते आणि त्याचे उत्पादनही ४,००० ते ६,००० फुटावरच्या निम्नऱ्हिमालयन पठारांवरच होऊ शकते. त्यामुळे, रँग्पो ते सिलिगुडी प्रवासात सालाची कृत्रिम अरण्ये दृष्टीस पडणे हा केवळ योगायोगच नव्हता, तर या भौगोलिक कारणांमुळे तसे घडणारच होते.

शिवाय, आता आम्ही बव्हंशी पर्वतीय प्रदेशातून बाहेर पडून सपाटीवरून प्रवास करत होतो, त्यामुळे ज्यांना बस लागत होती, तेही आता स्थिरस्थावर झालेले होते. संध्याकाळच्या सुमारास आम्ही हॉटेल सेंट्रल प्लाझा, सिलिगुडी इथे येऊन पोहोचलो. चहापाणी झाले. गाडीत खाण्याकरता डबाही भरून घेतला. उगाचच दोन तास आधी तिथे पोहोचून काय करायचे म्हणून गमतीजमती करत तिथेच थोडा वेळ घालवला. मग बस निघाली आमच्या शेवटल्या टप्प्यातल्या प्रवासास. सिलिगुडी ते न्यू-जल-पैगुडी. अंतर जेमतेम १५ किमी. तेही सपाटीवरचे. फार फार तर अर्ध्या तासात पार करू.

पण ते व्हायचे नव्हते. बस बंद पडली. आम्ही प्रत्येकच जण, सिलिगुडीला उगाचच वेळ घालवत बसलो, म्हणून हळहळू लागलो. इथे किमान इतर वाहने आसपास दिसत होती. रिक्षा-टॅक्सी करूनच शेवटी न्यू-जल-पैगुडी गाठावे लागणार अशी रंगत दिसू लागली. पर्यटनादरम्यान उत्साहाने केलेल्या खरेदीचा भार आम्हाला अकारणच जाणवू लागला.

चक्रधर महाशयांना पेट्रोलटाकीत कचरा अडकला असल्याचा शोध लागला. यथावकाश तंत्रज्ञ हाती लागला. बिघाड दुरूस्त झाला. सार्‍या बसने सुटकेचा निश्वास टाकला. आम्ही पुन्हा एकदा न्यू-जल-पैगुडीच्या मार्गावर अग्रसर झालो. रिंकू बाबा की जय, असे म्हणून प्रवाशांनी चक्रधराप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मात्र, त्यात आताच्या त्याच्या कर्तबाचा भाग फारसा नसून, ज्या अवघड वाटेवरून त्याने आम्हाला पर्वतीय प्रदेशातून सहिसलामत फिरवून आणले होते, त्या सुरक्षित सफरीचाच भाग अधिक होता.
.
नरेंद्र गोळे या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.