तुझ्या हाकेसरशी

तुझ्या हाकेसरशी
पापण्या थरारल्या,
धडधडले काळीज
चित्तवृत्ती फुलारल्या.

तुझ्या हाकेसरशी
बांगड्यांची किणकिण,
अंगावरती गोड शहारे
पैंजणांची रुणझुण.

तुझ्या हाकेसरशी
कासावीस झाला प्राण,
विखुरल्या बटा
नुरले पदराचे भान.

तुझ्या हाकेसरशी
झाला जादूटोणा कसला?
अन माझ्या खानदानी
कुळाचा पाया खचला.

तुझ्या हाकेसरशी
भररात्री आले,
आयुष्य सारे उरलेले
पहाटेच्या शोधात गेले.
000