अर्धवट बघितलेले चित्रपट

पूर्वी चित्रपट कधीकधी (शनी/ रवी) बघायला मिळायचे. त्यात त्यावेळी टीव्हीसमोर बसणे, वीज असणे, चित्रपटगृहात तो चित्रपट उपलब्ध असणे वगैरे भानगडी असायच्या. त्यात दुरदर्शनवर चित्रपट सुरू असला तर त्याचं नाव फक्त सुरुवातीला दाखवणे, म्हणजे प्रेक्षकांवर उपकार करणे प्रकार असावा असे वाटते. असो.

दुसरा अर्धवट चित्रपटांचा प्रकार म्हणजे चित्रपट बघून बरेच दिवस झाले की चित्रपटाचे नाव विसरणे. मी पाहिलेले चित्रपट आणि वाचलेली पुस्तके अशी एक यादी मी बनवली होती. आता ती कुठे ठेवली, हे आठवायला हवं.  

चित्रपटांची नावे माहिती नसल्याने अनुक्रमांक देत आहो, ( ते चित्रपटाचे नाव नाही  )

१. हा एक हिंदी चित्रपट आहे. यात दोन हिरो आहेत. दोघांचे नाव रवी, आणि दोघे चांगले मित्र. पण एक उच्च वर्णीय तर दुसरा मागास जातीचा. दोघांनाही नोकरीच्या जागी विरुद्ध परिस्थितीला सामोरे जावे लागते. ज्या ठिकाणी मागास जातीचा उमेदवार हवा तिथे (बहुदा)  ब्राह्मण पोचतो, तर जिथे ब्राह्मण पाहिजे असतो तिथे मागास जातीचा. दोघे कंटाळून एकमेकांचे सर्टिफिकेट्स बदलून घेतात. पण पकडल्या जाण्याच्या भीतीने फोटो बदलवण्याचे ठरवतात (हे नक्की आठवत नाही). आणि मग सुरू होते नाट्य. या चित्रपटात बहुदा "मेरा नाम, तेरा नाम" असे काहीसे गाणे आहे.

२. हा इंग्रजी चित्रपट आहे. चार मित्र (किंवा भाऊ). चौघांचे वेगवेगळे कौशल्य. एक धनुर्धर, तर दुसरा सरसर झाडावर चढणार, तिसरा भीमासारखा शक्तिवान, चौथा ..... खूप जलद धावणारा (आठवत नाही. ). ह्या चित्रपटात सगळ्यांची वेषभूषा "अमिताभ" प्रकारची आहे. या चौघांना एक महाकाय मूर्ती ऑलिंपिक सामन्यात न्यायचे काम मिळते, ती मूर्ती नेतानाचे विनोद जबरदस्त आहे. त्या मूर्तीसोबत हे चौघे ऑलिंपिक मध्ये भाग इच्छितात आणि तिथे आलेल्या ४ तरुणींना "इंप्रेस" करू पाहतात, पण त्या तरुणींचे वडील त्यांना परवानगी देत नाही. ऑलिंपिक मैदान शिरण्याची धडपड खूपच छान दाखवली आहे.

दोन्ही चित्रपट विनोदी होते. पण आता पुन्हा बघायचे म्हटले तर कसे जमणार ?