बंद दरवाजा

सांग मला त्या, बंद खोलित

केलेस कोणाला, तू बंदिस्त
सांग कोण असे , ते कानात
उत्सुकता लागे ती जबरदस्त
बंद केला असे, कामविकार
असे  श्रृंगारास, सदा तयार
अतिरेक करे, नाना विकार
नको घेऊस, त्याचा कैवार
बंद केला तो,  क्रोध घातकी
अविचारी असे,कसा नाटकी
बळी घेत असे, क्रूर पातकी
घेऊ नकोस, जवळी मंचकी
बंद केला असे, लोभ फसवा
लालुच दाखवी, असे नटवा
नाती तोडतोच, त्यास तटवा
संगत त्याची, लगेच कटवा
बंद केला असे , मोह मायावी
अनेक कुकर्मे, करण्या लावी
साळसूदपणा, खोटा दाखवी
संगत  याचीच, कैद चाखवी
बंद केला असे,  गर्वास ताठ
अहंकाराचा असे,याचा थाट
नुकसान करे, पडताच गाठ
संगत नकोच, फिरवा पाठ
बंद केला तो, मत्सर कुत्सित
कधी कोणाचे, भलेना इच्छित
शांत नसे, सदा मन विचलित
द्वेषाचा निर्माता, नको संगत
अशा षड्रिपूंना, केले बंदिस्त
दार ठोठावती, पाहा ते सतत
उघडू नकोस, घेण्यास घरात
नसता दुःखाची होईल खैरात