निसर्गाचा हिशोब

आज वाळ्याच्या पडद्यांना पाणी घालताना सहज खिडकीतून बाहेर पाहिले. शेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झाले होते. खिडकीच्या खाली, वळचणीच्या जागी पारव्याच्या मादीने दोन अंडी घातली होती. म्हणूनच आज सकाळपासून त्यांची खिडकीपाशी लगबग चालली होती तर! एवढे दिवस त्यांना रोज खिडकीपासून हुसकावून लावता लावता मीच जिकिरीला आले होते. त्यांचे ते खर्जातले घुमणे, पंखांची फडफड आणि खिडकीत केलेली घाण ह्यांपेक्षाही मला त्यांना तिथे आपला संसार थाटू द्यायचा नव्हता. गेल्या दोन खेपांना पारव्यांची बाळंतपणं आणि त्यांच्या पिलांची देखभाल करताना आलेल्या अनुभवांची शिदोरी तर होतीच, शिवाय खिडकीत अडचणीच्या जागी त्यांनी अंडी घातली तर धक्का लागून ती फुटणार-बिटणार तर नाहीत ना हीदेखील काळजी होती.
पण पारव्यांना तेवढे कळत असते तर मग काय! त्यांचा तरी काय दोष म्हणा! सिमेंट-काँक्रीटच्या जंगलात त्यांनी तरी कोठे संसार थाटायचा? आणि वाळ्याचा पडदा म्हणजे अतोनात गारवा.... त्यांच्यासाठी ए. सी. च जणू! घरट्याचा आभास करून देणारा वाळ्याच्या मुळ्यांचा नैसर्गिक पोत आणि आडोसा... मग काय! ह्या पारव्यांच्या जोडीला आयतेच फावले होते! त्यांचे कुंजकूजन सुरू झाले रे झाले की मी त्यांना हाकलून लावायचे. पण पठ्ठे एकतर चिकट तरी होते किंवा बुद्दू तरी! रोजच्या हाकलण्याला न जुमानता, न कंटाळता दर दिवशी हजेरी लावणार म्हणजे लावणारच!
पारव्याने खिडकीत घातलेल्या अंड्यांची बातमी घरी कळली त्याबरोबर सर्वांचे आधीच्या पारवा-स्मृतींना उजाळा देणे सुरू झाले. आमच्या आधीच्या जागेत, सहाव्या मजल्यावर पारवे हे जणू परिसराचा अविभाज्य भाग असल्याप्रमाणे वावरत. खिडक्यांच्या वळचणी जश्या त्यांना प्रिय होत्या त्याचप्रमाणे वेळी अवेळी आमची नजर चुकवून घरात शिरून कपाट, फडताळ, लोंबकळणाऱ्या वायरी यांवर स्वार होणे आणि घुमत बसणे हा त्यांचा आवडता छंद! तिथेही ते त्यांच्या अंगभूत चिकाटीचे प्रदर्शन करत. घरातल्या लपण्याच्या जागा आमच्यापेक्षा त्यांनाच जास्त ठाऊक! फक्त आम्हीच नव्हे तर शेजारी-पाजारीही त्यांचा मुक्त संचार असे. आणि आम्हाला सरावल्यामुळे असेल कदाचित, पण त्यांना आमच्या रागावण्याची भीतीच वाटत नसे. शेवटी हातात काठी घेऊन तिचे विविध आवाज करत, तोंडाने कंठशोष होईस्तो आरडाओरडा करत आम्ही व शेजारी त्यांना हाकलून लावत असू.  
तरीही एकदा एका पारव्याच्या लबाड जोडीने पोटमाळ्यावर खोक्याच्या आडोशाला अंडी घातलीच! ''आलिया भोगासी'' करत आम्ही त्यांच्यासमोर सपशेल शरणागती पत्करली. पुढचे अनेक दिवस घरात काड्या, पिसे, दोरे यांचा कचरा व पोटमाळ्यावर त्यांची घाण, अशा साम्राज्यात त्यांच्या घरातल्या असंख्य फेऱ्या सहन करण्यात गेले. पिलांचा जन्म झाल्यावरही बरेच दिवस ही जोडी त्यांना अन्न भरवण्यासाठी खिडकीतून ये-जा करत असे. तोवर आमच्या दोन भिंती त्यांनी खराब केल्या होत्या. एक पिलू लवकर उडायला शिकले आणि बघता बघता स्वतंत्रही झाले. पण दुसऱ्या पिलाला बहुधा तेवढा आत्मविश्वास नसावा. ते पोटमाळ्यावरच वावरायचे. टुलूटुलू चालायचे आणि उडायची वेळ आली की आपले छोटेसे पंख नुसतेच फडफडवायचे. बाबा पारव्याला एव्हाना ह्या सुखी संसाराचा कंटाळा आला असावा, कारण तो आता येईनासा झाला होता. आई मात्र पिलाला भरवायला यायची अधून मधून. त्या पिलांचे ते गोड कर्कश स्वरातील ओरडणे ऐकणे म्हणजे आम्हाला स्वर्गानुभूतीच असायची!! कानात कापसाचे बोळे घातले तरी उपयोग व्हायचा नाही!!
शेवटी करता करता एक दिवस, आमच्या सर्वांच्या धीराची सत्त्वपरीक्षा पाहून ते चुकार पिलू उडायला लागले. पण.... आमच्या घरातला पोटमाळा त्याच्या एवढ्या परिचयाचा झाला होता की संध्याकाळी ते न चुकता घरी परतायचे व पोटमाळ्यावर चढून बसायचे. घरचेच नातवंड असल्यामुळे आम्हाला त्याला हुसकावणेही जीवावर यायचे. तरीही दिवसेंदिवस खराब होणाऱ्या भिंती व अशक्य घाण पाहिल्यावर त्याला घराचे दरवाजे खिडक्या बंद करण्याचा कठोर निर्णय घेण्यावाचून आमच्यासमोर अन्य पर्याय नव्हता! आणि हे पिलू तरी किती चलाख असावे! खिडकीपाशी दबा धरूनच बसायचे. दोन मिनिटांसाठी जरी खिडकी उघडली की महाशय आत!! आणि त्यांच्या आवडत्या स्थानी जाऊन वक्र मान करून तोंडातून आनंदाचे चीत्कार! त्यांना आमचे भयही वाटत नसे... निवांतपणे आमच्या डोक्यावरून अगदी जवळून जायचे.  खांद्याला, डोक्याला त्यांचे पंख चाटून जात. ह्या वेळी आम्हीही ठाम निश्चय केला होता. त्याप्रमाणे त्यांना दारे बंदच ठेवली. यथावकाश त्या पिल्लाची घरी ये-जा एकदाची थांबली. आम्हीही सुटकेचे निः श्वास सोडले.
पण हाय रे दैवा! पुढच्याच वर्षी तारुण्यात पदार्पण केलेले पिलू आमच्या दारात आपल्या जोडीदारासह हजर! आता हे प्रकरण हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसत होती. त्यांना आमचे घर म्हणजे वडिलोपार्जित इस्टेट वाटत होती की काय? पुन्हा एकदा आमच्यावर स्वतःच्याच घराची दारे-खिडक्या बंद करून, स्वतःला कोंडून घेण्याचा प्रसंग गुदरला होता. त्या जोडीला कटवल्याची पूर्ण खात्री झाल्यावरच आम्ही मोकळे श्वास (खरोखर! ) घेतले.  
आज याही घराच्या खिडकीत पारव्याच्या अंड्याला पाहिल्यावर आम्हाला सर्वांनाच आपल्या भवितव्याची काळजी वाटू लागली होती. दोन दिवस असेच गेले. रोज पारवीण काकू येऊन अंडी उबवत बसत. पारवे काका त्यांना साथ द्यायला जोडीने घुमत बसत. त्यांच्या घूत्कारांचे नाद मला रात्री झोपेत स्वप्नातही ऐकू येत. त्या अंड्यांना हालवावे का ह्याविषयी घरात तीव्र मतभेद होते. पक्ष क्रमांक १ चे म्हणणे होते की निसर्गात ढवळाढवळ करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. सबब ती अंडी तशीच राहू द्यावीत. पक्ष क्रमांक २ चे म्हणणे होते की एखाद्या खोक्यात ती अंडी ठेवली तर ती सुरक्षित राहतील व कचराही कमी होईल! पण पारवे त्या स्थलांतरित अंड्यांना स्वीकारतील की नाही ह्याबद्दल पक्ष क्रमांक २ खात्रीशीर सांगू शकत नसल्याने ''ठेविले मादीने तसेची ठेवावे'' असा विचार करत आम्हीही त्या अंड्यांची जागा बदलण्याचे टाळले.  
आता इथेही कचरा करणे सुरू झाले होते. सुतळीचे तुकडे, पिसे, काटक्या, दोरे अन अजून काय काय! नशीब, खिडकीचे दार स्लायडिंग आहे. नाहीतर ती अंडी आमच्या धक्क्याने खालीच पडली असती. पण बहुधा निसर्गाला अशा अडनिड्या जागी त्या नव्या पिलांचा जन्म होणे मान्य नसावे. एके सायंकाळी जोराची वावटळ सुटली, आणि त्या सोसाट्याच्या वाऱ्यात ती दोन्ही अंडी जमीनदोस्त झाली. वावटळ, पाऊस थांबल्यावर नेहमीप्रमाणे मादी खिडकीपाशी आली. पण अंडी तर नव्हतीच! बिचारी खूप वेळ घिरट्या मारत होती. तिचा जोडीदारही तिच्याबरोबर शोधात सामील झाला होता. सगळीकडे आपल्या माना वाकड्या वाकड्या करून दोघेही त्या अंड्यांना धुंडाळत होते. मादी आपला शोक पंखांची अशक्य फडफड करून प्रकट करत होती. त्यांची ती तगमग पाहून मला वाईट वाटत होते. मानवी भाषा त्यांना काय समजणार!!  तरीही मला त्यांची ती तडफड बघून उगाच करुणा दाटून आली आणि मी त्यांना चक्क मराठीतून अंडी खाली पडून फुटल्याचे सांगितलेही! पण त्या अजाण जीवांना त्यातले काहीच कळत नव्हते. त्या दिवसानंतर जवळ जवळ तीन-चार दिवस दोघेही नर-मादी खिडकीभोवती घोटाळत असत. हळूहळू त्या नष्ट झालेल्या अंड्यांचे सत्य त्यांनी स्वीकारले असावे, कारण त्यांचा खिडकीजवळचा संचार कालांतराने बराच कमी झाला.  
आमच्या घरावरची पारवा-संक्रांत एकदाची टळली म्हणून मला मनात कोठेतरी बरेही वाटत होते आणि त्याच वेळेला त्या निरागस मादीचा आकांत आठवून कसेसेही होत होते. एका आईची कूस उजवायचीच राहून गेली होती. पुढील विणीच्या वेळी तिची पिल्ले जगतीलही.... पण जन्माअगोदरच काळाआड गेलेल्या ह्या पिल्लांचा हिशोब कोण देणार होते?
--- अरुंधती कुलकर्णी