वैराटगडावरचा विचित्र अनुभव

वादविवाद संपले आणि पाचवडच्या इथल्या वैराटगडावर जाण्याचे नक्की झाले. सुमंतांनी त्यांची झेन ट्रेक साठी पहिल्यांदाच काढली असावी.
सकाळी सात - सव्वासात ला आमची स्वारी निघाली. वाटेत मस्त टाईमपास करत पाचवड ला पोचायला साडेनऊ वाजले.
किल्ला तसा उंच नाहीये. पण त्या रणरणत्या उन्हामुळे आमची फार दमणूक झाली. त्यात शॉर्ट कट वगैरे मारत (त्याचा उलट जास्तच त्रास झाला) आम्ही वरती पोचलो.
किल्ल्यावर फिरून आम्ही सरळ रस्त्याने खाली उतरण्यास सुरुवात केली . तेवढ्यात दरीतून एक व्यक्ती हाका मरताना दिसली. पहिल्यांदा वाटले की गुरे - ढोरे पळणार गावातीलच कोणीतरी असेल.
पण ती व्यक्ती जोरजोरात हाका मारत होती आणि आमच्या दिशेने भरभर चढून येत होती. आम्हाला जरा वेगळाच वाटले, पण आम्ही तिथेच थांबलो. करवंद आणि इतर काटेरी झुडुपामधून तो माणूस सपा सप वर चढून येत होता. त्याचा तो वेग बघून आम्हा नियमित गडांवर जाणाऱ्या ट्रेकेर्स ला पण थक्क केले. 
त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आता स्पष्ट दिसू लागले. आणि एकदाचा तो माणूस आमच्या समोर येऊन उभा राहिला.
अनवाणी पाय, फाटलेला लेंगा, अतिशय चुरगाळलेला शर्ट, प्रचंड दमलेला, त्रस्त आणि चिंतित असलेली ति व्यक्ती बघून आम्ही सगळे कोड्यात पडलो. आणि अखेर त्याचा तोंडातून शब्द फुटले ..
"आमचं साडू अडकलंय तिथ, जरा मदतीला चला ? "..
त्याचि ति अवस्था बघून त्याच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय मार्ग नव्हता. मग मी , पुक्या आणि माणके  त्याच्या मागून खाली दरीत उतरू लागलो. प्रशांत आणि सुमंत यांनी कार पाशी जाऊन थांबायचं ठरलं.
जाता जाताच जरा खोलात जाऊन विचारपूस केली.
त्या व्यक्तीचं नाव होत "हणमंतराव", ते आणि त्यांचे साडू वैराटगडावर निघाले होते, आणि वाट चुकले. गडाला तिकडून दुसरी वाट पण आहे ही माहिती आम्हाला तेव्हाच कळली.  तो पुढे बोलू लागला...
"आमचं साडू तिथे दरीत पडता पडता झाडावर अडकलय, जरा त्यांना काढायला तुम्ही मदत करा, नाहीतर काही खरं नाही बघा. "... आम्ही ते ऐकून थक्क झालो. पुढे अजून काय काय विचित्र पाहायला मिळेल याची मी कल्पना करू लागलो. त्याचे पाय झपाझप चालत होते आणि त्यांचा वेग वाढतच होता.
त्याच्याबरोबर चालता चालता पुक्या आणि माणके कधी मागे पडले ते कळलेच नाही. त्यांना मारलेल्या हाकांना उत्तर येईनासे झाले.
मग मात्र मला भीती आणि चिंता वाटू लागली. अस काहीतरी घडेल अस वाटलं पण नव्हत.
आणि पुढे जाऊन एक वेळ आली की आता पुढे डोंगरच संपला होता, पुढे अतिशय उभी आणि खोल दरी होती, गर्द झाडी सुद्धा मागे राहिली होती. त्या काट्यांचे शरीरावर अनेक ठिकाणी वार झाले होते, गाल आणि हातावर ते स्पष्ट दिसून येत होते.
आणि त्या क्षणाला हणमन्तराव बोलले "नक्की आठवतच नाहीये कुठं पडलं ते .. ".. हे ऐकून तर मला धक्काच बसला. हा माणूस आपल्याला फसवत तर नाही ना? असा एक विचार डोक्यात आला .
पण इतकं बोलून ते डाव्या बाजूने डोंगराच्या समान उंचीवरून चालू लागले. मी त्यांना काहीच बोललो नाही आणि गुपचुप तिथेच थांबलो.
खिशातून परत एकदा मोबाईल काढला, अयर्टेल आणि पुढे एक काडी दिसली, पुक्याला फोन लावायला मी क्षणाचाही विलंब केला नाही.
"अरे कुठेस ?" मी विचारलं आणि २-३ वाक्यात जे काही घडत आहे ह्याची कल्पना देण्याचा प्रयत्न केला. हणमंतराव आता दिसेनासे झाले होते. मी तिथेच थांबून होतो आणि कोणी दिसतंय का ते बघू लागलो. माझी पावले हळू हळू ज्या वाटेवरून आलो, त्या वाटेल वळली .
आणि तेवढ्यात एक सत्तर बहत्तरिचे खेडूत आजोबा तिथे एका दगडाला टेकून बसलेले मला दिसले. त्यांचं लक्ष माझ्याकडे नव्हते.
त्यांच्या जवळ जायची माझी पहिल्यांदा हिंमत झाली नाही. पण "जे होईल ते होईल " अस मनाशी ठरवून मी पुढे सरसावलो. थेट त्यांच्या शेजारी जाऊन बसलो, आणि त्यांना विचारलं,
 " काय आजोबा? इतक्या उन्हच इथे काय करत आहात?"  हे विचारताना माझी अवस्था कशी झाली असेल ते इथे शब्दात मांडणे फार कठिण आहे. मी तिथे असल्याचे त्यांना काहीच आश्चर्य नव्हते, पण एकदाचे उत्तर आले,
"आम्ही पडलो होतो दरीत, आमचं साडू आम्हाला शोधायला वरती गेलंय, देव धावून आलं आणि आम्ही त्या दगडावरून इथे पोचलो," .. त्यांनी हातवारे करून ति जागा मला दाखविली, त्या तिरक्या प्रचंड अश्या दगडावरून वर यायला खरंच देवच मदतीला लागेल, अशी ती जागा होती.
आपण शोधत असलेली व्यक्ती हिच , हे मला त्यांच्या पहिल्या वाक्यावरूनच कळले. त्यांच्याशी पुढे काही बोलायच्या आधी मी, पुष्कर ला जोरात हाक मारली,
"आलो आलो ".. पुक्यानी उत्तर दिले , आणि माझ्या जिवात जीव आला. त्याला येण्यासाठी अजून कमीत कमी ५ मिनिटे तरी असावीत असा माझा अंदाज होता.
"वय काय आजोबा तुमचं?" ..
"मागल्या वर्षी ८२ होत, म्हणजे आता ८३. "...
मला अजून एक हादरा बसला, आपल्या शहरातील ८२ वर्षांच्या व्यक्तीशी मी तुलना केली, त्यामुळेच असेल कदाचित...
"अहो, हे काय आता वय आहे का तुमचं किल्ले चढायचं? "..
त्यांनी मला फक्त एका हास्यानेच  उत्तर दिले.
तेवढ्यात पुक्या आणि माणकेन्नी हाक मारली, "भूषण , कुठेस?", मी जरा पुढं जाऊन त्यांना दर्शन दिले, त्यांनी पण एक सुस्कारा सोडला.
आणि आम्ही तिघे त्या आजोबांना घेऊन खाली जायची वाट बघू लागलो. तेवढ्यात लांबून काही गावातील मुले वर येताना दिसली.
आम्ही भरभर चालून त्यांना गाठले. आणि थोडक्यात हकिकत सांगितली. पुढे त्या मुलांनी आम्हाला खालची वाट दाखविली.
त्यांच्या बोलण्यातून अस लक्षात आलं की आमची गडबड त्यान्ना दिसली आणि खालच्या गावातून ते मदतीला वरती आले होते. एका मुलाच्या हातातील बाट बघून त्याचा पुरावा मिळाला.
आम्हाला उशीर होत होता, त्यामुळे त्या आजोबांना आम्ही मुलांच्या ताब्यात दिले. आणि आम्ही साधारण १० मिनिटांमध्ये खाली उतरलो.
सुमंत आणि प्रशांत कार घेऊन त्या गावत आले होते. आम्ही एकदाचे गाडीत बसलो आणि आयुष्यात आलेल्या एका थरारक प्रसंगाचे चिंतन करू लागलो.
हणुमंतराव सापडले का नाहीत हे मात्र कळू शकले नाही. पण त्यांचा तो काळजीने व्याकुळ झालेला चेहरा मात्र कित्येक दिवस डोळ्यन्समोरून जात नव्हता.