ह्यासोबत
प्रभात फेरीच्या आवाजात गाव जाग व्हायला लागल होत. रोजच्या प्रमाणे महादेवाच्या मंदिरापासून प्रभात फेरी निघून गावाला प्रदक्षिणा घालून पुन्हा महादेवाच्या मंदिराकडे निघाली. पहाटे चारला रोज गावातील १०-१२ माणसं कोणत्याही बोलावण्याची वाट न पाहता जमत श्रीधर बापूंचा "कैलास राणा तुझ चंद्र.... " खड्या आवाजात ऐकला की पुढयाच २-५ मिनिटात महादेवाला नमस्कार करून "श्री राम जय राम जय जय राम " तेरा अक्षरी मंत्राचा जप करत फेरी निघायची तीच मुळी महादेवाच्या मंदिराला फेरी मारून. सर्वात पहिले श्रीधर बापुंचा आवाज त्या शांत पहाटेच्या वातावरणात ऊमटायचा. "हं.. श्री राम जय राम जय जय राम " पाठोपाठ १०-१२ तोंड " श्री राम जय राम जय जय राम "चा गजर करत वातावरण प्रफ्फुलित होउन सगळ गाव ह्या १३ अक्षरी मंत्राने भारावून जायचे.
नित्याचा हा आवाज ऐकून गावाला जाग होण्याची हि सवयच लागली होती जणू. एक वेळ कोंडाईचा कोंबडा आरवनार नाही पण प्रभात फेरी चुकेल अस कधी झाल नाही. सगळ्यागावातून फेरी पुर्ण होऊन मंदिरात परत यायचे तोपर्यंत गावातल्या गुरवाची मंदिराची साफसफाई होऊन देवाचे स्नान चाललेले असायचे. फेरीवाले आले की मग सामुदायिक आरती व्हायची नि मग रोजच्या कामाला सुरवात व्हायची. राम नामाच्या जय जय कारात प्रभात फेरी जी निघायची तीच मुळी उल्हसित करून टाकायचि. पहाटे ४ वाजता प्रभात फेरीचा देखावा बघण्यातच काय पण एखादी राम नामाची ललकारी ठोकायला पण मजा यायची. पहाटेचा अंधार, त्यातल्या त्यात पोर्णिमा असली तर मग काय विचारता? गावाच्या मध्यभागी एका ऊंच ओट्यावर महादेवाचे मंदिर. मंदिराच्या भोवती बांधलेला दगडी काळाशार ओबड धोबड ओटा, त्यावर पोर्णिमेच चांदण मंदिराच्या गाभाऱ्यातील मंद तेवणाऱ्या समईला साथ करायला मंदिराच्या प्रांगणात हळुच उतरायच. बरोबर ४ वाजता चंद्राचा प्रकाश गाभाऱ्यातील शिवलिंगावर पडायचा, आणि त्याच वेळेस बरोबर श्रीधर बापुची "कैलास राणा...... " आर्त साद वातावरणात उमटायची. समईच्या वातीने पेटता पेटवला जाऊन तो श्रीधर बापुच्या हातात कधी येऊन स्थिरावायचा हे पेटत्यालाही कळायचे नाही. मग राम नामाचा गजर करत बापू पुढे आणि टाळ आणि पखवाजाच्या सोबतीने बाकीची मंडळी बापुची री ओढत माघे चालू लागायचे. मंडळींनी गजर केला की सत्तरसिंग दाजीच्या गोठ्यातून दाजीचा टीकल्या बैल आपल्या गळ्यातील घंटा हलवून साथ द्यायचा. मग एक एक गल्ली माघे टाकत जाऊन पोहचायची ती खोल गल्लीत, नवल नानाच्या घराला डाव्या अंगाला घेउन प्रभात फेरी वातावरणात राम नाम भरत यायची ती होळी मैदानात, होळी मैदानातून राम नामाचा गजर करत येऊन पोहचायची ती काठोबाच्या परिसरात, मग राम मंदिर, सोनार वाडा, दरवाजा करत करत दयाराम गुरुजिंच्या शाळेला वळसा घालत सरळ निघायची ती चांग्या पाच्याला. चांग्या पाच्या काय होत हे गावकऱ्यांना माहित नव्हत, पण परंपरेने दर बुधवारी दही भाताचा नवैद्द गावातून पोहचत होता, चांग्या पाच्याला माघे टाकत प्रभात फेरी गौतम गिरावरून परत गाव दरवाजा आणि मग महादेवाच्या मंदिरावर महादेवाची आरती व्हायची, आणि मग प्रभात फेरीची सांगता व्हायची.
आजची प्रभात फेरी नित्याचीच होती फक्त गावकऱ्यांची संख्या मात्र रोडावली होती. कालच्या पावसाने गावाची चांगलीच धावपळ उडवली होती. जिकडे तिकडे पावसाच्या पाण्याचे डबके साचले होते. खोल गल्लीतिल पाणी तर गुडघाभर झाले होते. कुठे त्याच्यात कडबा वाहतांना दिसत होता तर, एक दोन ठिकाणी गुरांचे दोर, कपडे पाण्यावर तरंगतांना दिसत होते. गावात रस्त्या रस्त्यात चिखल मातला होता. पाण्याच्या डबक्यामुळे रस्त्यातिल डोक काढून वर आलेल्या दगडांचा एक दोन जणांना तर आपला प्रसाद देऊन सुद्धा झाला. कोंडाईच कोंबड आज आरवल पण पडक्या भिंतिच्या साथीने नशिब कोंडाईच्या घराला लागून मोकळी जागा होती नाही तर आनंदाच्या क्षणी दुःख सावरत बसाव लागल असत.
क्रमशः