आहे रे 'मी'

दिवसाराती
सतत चालतो
आले वादळ
नाही डरतो
मी!      ॥१॥

श्वास माझा
बळ माझे
बुद्धी माझी
प्रयत्न माझे
विश्वास यशाचा
मला!  ॥२॥

दूतदया
स्वर्गीय कृपा
पाठीराखा
नाकारणारा
मी!  ॥३॥

गणित चुकले
डाव मोडला
प्रश्नग्रस्त अन्
खंतावलेला
मी!  ॥४॥

सत्यालाही
फुटती काटे?
खुपती पायी
स्वतःस कोसणारा
मी!  ॥५॥

कोण हंसतो
मंद मिष्किल
मजला म्हणतो
काटे काढून
उभे राह्यचे
पुन्हा एकदा-
आहे रे ‘मी’!!  ॥६॥