जखम...

जखमेत त्या सुगंधी, अजुनी थोडी ओल आहे.

तु हसत हसत दिधला, तो घाव खोल आहे.

प्रेमाशिवाय जगलो, दिर्घायुषी होउनी...

जगणे कसे म्हणू त्या?  जे मातीमोल आहे.

जुळल्या मनामनांच्या, तारा अशा कि आता,

कुठली तुझी नि माझी? इतकाच घोळ आहे.

आरंभिलो जेथुनी, तेथेच पोचलो पुन्हा,

मज सांगती चंद्र-तारे, ही पृथ्वीच गोल आहे.

भेटायचो तुला मी, ज्या धुंद सागरापाशी...

तो बोलका किनारा, आता अबोल आहे.