फार दिवसांनी सोम्या आमच्या घरी आला होता. सोम्या म्हणजे सोमनाथ. पहिल्यापासून आमच्या गल्लीत त्याला सगळे सोम्याच म्हणायचे. दिसायला गोरा, उंच पण शरीरयष्टी म्हणाल तर पाप्याचं पितर. अंगावर मास जवळजवळ नाहीच. हातापायाच्या काड्या नुसत्या. पण आवाज काय सोम्याचा. त्यांच्या बिल्डिंगमधून मला हाक मारायचा. त्यांच्या आणि माझ्या बिल्डिंगमध्ये चांगलंच अंतर होतं. तरी त्याची हाक मला स्वयंपाकघरापर्यंत ऐकू यायची. त्यानं हाक मारली की माझी आजी म्हणायची, ''हम, जा. सोम्या बेंबटापासून ओरडतोय बघ.'' असा हा सोम्या.
शाळेत असताना एक सर्वसाधारण विद्यार्थी होता. अभ्यास वगैरे जेमतेमच. पण गाणं, नाच, वक्तृत्त्व, कथाकथन, भित्तिपत्रिका आणि कविता करणे या गोष्टी त्याला मनापासून प्रिय होत्या. त्यातल्या त्यात 'कविता' हा त्याचा वीक पॉइंट होता. गाणं, नाच, वक्त्तृत्त्व हे एकतर मुळात अंगात असावं लागतं किंवा फार थोड्या माणसांना ते मेहनत करून, सरावानं कमावता येतं. पण असल्या विचारांना सोम्याच्या आयुष्यात जागा नव्हती. आपण फार मोठे वक्ते, गायक आणि कवी मुळातच आहोत किंवा आत्ता नसलो तरी भविष्यात नक्कीच होणार आहोत असे दोन घोर गैरसमज स्वतःबद्दल त्यानं करून घेतले होते.
'कवी सोम' ही उपाधी त्यानी स्वतःला वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासूनच चिकटवून घेतली होती. 'कवी सोम' नाव बाकी छान होतं. मला तरी आवडायचं. पाडगावकर, खांडेकर, बोरकर, माडगूळकर, दामले, बापट या ख्यातनाम कविमंडळींची नावं सोम्या स्वतःचे जुने मित्र असल्यासारखी घेत असे. मग त्यात एका कविची दुसऱ्यशी तुलना करणे, पाडगावकर कसे सरस, बापट हे कवी असले तरी जास्त चांगले गीतकार कसे आहेत, माडगूळकर आज असते तर, अशा अनेक साहित्यसम्मेलनात शोभून दिसतील अशा विषयावर तो माझ्याशी चर्चा करायचा. ही चर्चा तो माझ्याशी का करायचा या प्रश्नाचं उत्तर मी अजुनही शोधतोच आहे.
त्या दिवशी सोम्याच्या हातातली वही पाहिली आणि मी दचकलो. आज आपलं काही खरं नाही. कविवर्य म्हणाले, ''काय साहेबा? कसं काय? नवी निर्मिती नुकतीच झालेली आहे. म्हंटलं रसिक माणसाला तिचा आस्वाद चाखायला मिळावा. वहिनी नाहीत वाटतं घरी?'' ही घरी नसल्याचं कविराजांना कसं काय कळलं कोण जाणे. मी विचार केला, च्यायला कसली निर्मिती? कोणाची निर्मिती? काय भन्नाट बोलतो हा. मी म्हणालो, ''अरे ही गेल्ये लग्नाला. संध्याकाळी येईल. हिला भेटायचं होतं का?'' ''नाही रे. तसं नाही. वहिनी घरी नाहीत म्हणजे तू मोकळा आहेस. म्हणून आलो. सकाळीच काही नवकविता स्फुरल्या. लगेच कागदावर घेतल्या. अशा काही सुचल्या आहेत ना की बास.'' सोम्या.
चला, आता दोन अडिच तास नवकाव्य वाचन होणार हे माझ्या लक्षात आलं. मनाची तयारी करून मी बसलो. उर्दू येत असतं तर 'ईर्शाद' का काय म्हणतात तसं म्हंटलं असतं. पण मी पडलो मराठमोळा. म्हणालो, ''हम, 'कवी सोम' करा सुरुवात.'' कविराजांनी उभं राहून सुरुवात केली. ''तर रसिकहो, पहिल्या कवितेचं नाव आहे 'रंग हरवलेलं पान'.'' काही खरं नाही. आज पानावर संक्रांत आहे बहुतेक. कवी सोम चालू झाले.
'पाना रे पाना, काय हा जमाना. कुणी बरे नेला तुझा केशरी चुना. चुना तर गेलाच पण कात आहे ना. कात असूनही विडा रंगेना! काय झाली चूक काहीच कळेना. हल्लिचे विडे रंगतच नाहीत. पहिल्यासारखी माणसे पान खाऊन थुकतच नाहीत. पान खाऊन थुकले नाही तर मजा ती काय? म्हणूनच हल्लिचे विडे रंगत नाहीत काय? रंगले नाहीत म्हणून आम्ही विडे खायचे सोडणार नाही. कारण आपण पूर्वीसारखे रंगत नाही ही भावना पानाला परवडणार नाही. कळीदार कपूरी पान केशरी चुना. तरी पान काही रंगेना. विडा काही रंगेना. कवी सोम म्हणे, मला काही हे गूढ उलगडेना.'
कविता संपल्यावर सोम्या म्हणाला, ''काय श्रोते कशी वाटली?" काय बोलायचं सोम्याला हे आता मलाच उलगडेना. मी म्हणालो, ''सोम्या विचित्र, फार कठीण आहे हे तुझं प्रकरण.'' मी असं म्हंटल्याबरोबर सोम्याला भलताच आनंद झाला. तो म्हणाला, ''कळलं ना तुला? हे सगळं जग कसं आहे ते? मला खात्री होती. तू सोडून बाकिच्यांना हे कळणार नाही. अरे आमच्या वडिलांना ही कविता मी ऐकवली, तर काय म्हणाले माहिती आहे? 'बरी आठवण झाली. सोम्या, आज श्रावणी शुक्रवारची सव्वाशीण आहे जेवायला. खाली जाऊन पानं घेऊन ये जा. विडे करायचेत. फायदा झाला हो तुझ्या कवितेचा. पानं आणायची आठवण झाली. नाहीतर हिनं कटकट केली असती.' असं म्हंटल्यावर काय होणार माझ्यातल्या या प्रतिभेचं? माणसाच्या आयुष्याची कशी परवड होतेय आजच्या जगात याचं चित्रण या कवितेत मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. केवळ तूच समजू शकलास हे.''
आता मी काय म्हणालो या गाढवाला आणि यानी त्याचा काय अर्थ काढला. कसली ही दुर्बोध कविता. कशाचा कशाला काही आगापिछा नाही. पान काय, विडा काय सगळंच विचित्र. माणसाच्या आयुष्याची परवड आणि नं रंगलेलं पान याचा संबंध मला तरी काही कळला नाही. नवकविता वाचायला किंवा ऐकायला दुर्बोध वाटतात असं मी ऐकलं होतं. पण आमचे कविराज दुर्बोधपणाच्याही एक पाऊल पुढे गेले होते. मी जणूकाही फारच प्रगल्भ श्रोता आहे असं समजून सोम्यानं पुढची कविता वाचायला घेतली. ''श्रोतेहो, आपल्या आधिच्या दिलखुलास आणि धीरगंभीर प्रतिसादाबद्दल आभार मानून पुढील निर्मिती आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे धाडस करीत आहे.''
मला काहीच झेपलं नाही. प्रतिसाद हा दिलखुलास आणि धीरगंभीर असा दोन्ही एकाच वेळी असू शकतो याचं ज्ञान मला नव्यानी झालं. कदाचीत सोम्याच्या मते दोन्ही समानार्थी शब्द असावेत. सोम्या सुटला. ''तर पुढील कवितेचं नाव आहे, 'झुरळाची घोडचूक'.'' च्यायला हिरोशिमा झालं आता नागासाकी. एकामागून एक बॉंब पडलेल्या जपानसारखी अवस्था व्हायला लागली.
'करड्या रंगाचे गोजिरवाणे झुरळ. कधी नव्हे ते चालत होते सरळ. सरळ चालून चुकले होते रस्ता. एकटेच बिचारे खात होते खस्ता. आजूबाजूला शत्रूचे मोठमोठे पाय. त्याला कळेना आता मी करू काय. करून करून काय करणार? सरळमार्गी जात राहणार. तेव्हढ्यात आला एक भलामोठा पाय. झुरळाच्या छातीचा ठोका चुकत जाय. पाय पडला झुरळावर. बिचारे मरून पडले रस्त्यावर. त्याचे प्राणपाखरू उडाले. बाकी झुरळे झाली एकदम मूक. त्यांना उमगली मित्राची सरळ चालण्याची घोडचूक'
देवा, किती परीक्षा पाहणार आहेस माझी? माझी अशी कुठली घोडचूक झाली की दुपारच्या वेळी मी याला घरात घेतला. सोम्या तर नुसता तापला होता. स्वप्नवत अवस्थेतून सोम्या बाहेर यायला काही काळ जावा लागला. तो भानावर आल्यावर म्हणाला, ''आयुष्यात सरळ चालणं ही किती मोठी चूक ठरू शकते, हे तुझ्या लक्षात आलं असेलच. काय दोष होता रे त्या चिमुकल्या जिवाचा? स्वतःच्या बंधूभगीनींना सोडून ते बिचारं एकटं चालायचा प्रयत्न करीत होतं. आपण एकटे चालू शकतो, कोणाच्याही मदतीशिवाय काहीतरी करून दाखवू शकतो हे पटवण्याआधीच काळानी झडप घातली त्याच्यावर. इवलासा जीव रे तो. काय बिघडणार होतं जीवंत राहिलं असतं तर? जग फार वाईट आहे मित्रा. सांभाळलं पाहिजे. वैरी कुठे असेल सांगता येत नाही.''
झुरळ आणि माझा संबंध फक्त झुरळे मारण्यापुरता होता. झुरळाइतका किळसवाणा कीटक जगात दुसरा कोणीही नाही या मताचा मी. त्याला गोजीरवाणं, इवलासा, चिमुकला जीव वगैरे म्हणण्यासाठी मला एक तर संत महंत तरी असायला हवं किंवा मी ठार वेडा तरी असलो पाहिजे. त्या क्षणी सोम्याला धरून गदागदा हलवावा आणि 'अरे भो***च्या जरा माणसात ये' असं ठणकावून सांगावं याखेरीज मला काहीही वाटत नव्हतं. पण सोम्याचा तो उत्साह, त्याची कवितेबद्दलची श्रद्धा (? ) पाहून मी म्हणालो, ''थोडी अतिशयोक्ती वाटते पण जीवन किती असुरक्षीत असू शकतं हे पटंवलस तू कवितेतून''. कितीही प्रगल्भपणाचा आव आणला तरी यापेक्षा बोजड आणि मोठमोठे शब्द वापरून मला बोलणं अशक्य होतं.
मी असं म्हंटल्यावर एखादं पारितोषिकच आपल्याला मिळालं आणि समोरच्या श्रोत्यावर आणखी अन्याय करायचं लायसन्सच जणू काही आता आपल्याकडे आहे असं समजून कविराज पुढचा बाँब टाकयला सज्ज झाले. ते टाकायला आणि मी झेलायला. ही परीक्षेची वेळ आहे, देवा मला सहनशक्ती दे, अशी मी प्रार्थना केली.
कविवर्य सोम उवाचः ''तर पुढील कविता मानवी मनावर खोलवर असा आघात करणारी आहे. अर्थात हे तज्ञांचं मत आहे. कवितेचं नाव आहे, 'बिनबाह्यांची पोलकी'.'' आता बिनबाह्यांच्या पोलक्यांमुळे होणाऱ्या मानवी (का पुरुषी) मनावरील खोलवर आघाताचं मतप्रदर्शन करणारे तज्ञ म्हणजे कोण असावेत याचा विचार करून डोकं फिरवून घेण्यात काही अर्थ नव्हता. पण 'बिनबाह्यांची पोलकी' हे कवितेचं नाव ऐकून मी थोडा फार का होईना क्युरिअस झालो हे मान्य केलेच पाहिजे. पुढील कविता माझ्या कानांवर आदळायला सुरुवात झाली.
'बिनबाह्यांची पोलकी, असतात मोठी बोलकी. बाई जड असो वा हलकी, साऱ्याच नेसतात ही पोलकी. बिनबाह्यांची पोलकी घालून, स्त्रिया येतात मॉडर्न होऊन. पुरुष मात्र बिचारे, बसतात कपाळाला हात लावून. त्यांच्या डोक्यात विचार असतो, सतत डोकं फिरत असतं. का हा अन्याय आपल्यावर, मन सारखं म्हणत असतं. बिनबाह्यांची पोलकी चापून चोपून नेसतात, उगाच आपलं डोकं इथून तिथून गरम करतात. टक लावून पाहिलं, तर पिसाटलाय म्हणतात. छान दिसतंय म्हंटलं तर, तर झपाटलाय म्हणतात. बघितल्याशिवाय राहवत नाही पुरुषाला, आणि बिनबाह्यांची पोलकी नेसण्यावाचून पर्याय नाही बाईला. पुरुषांनी पाहावं म्हणूनच त्या नेसतात, पण पुरुषानं पाहिल्यास त्यालाच कोर्टात खेचतात. पुरुष मात्र बिचारा पापाचा धनी, खिशात नाही मनी म्हणून पुसेना कुनी.'
आता मात्र सहनशक्तीचा अंत झाला होता. 'बिनबाह्यांची पोलकी' नाव ऐकून वाटलं काहीतरी श्रुंगारीक असेल. पण कसलं काय. हे असलं काहितरी दळभद्री निघालं. मी जरा नाराजीच्या सुरातच सोम्याला विचारलं, ''काही कळलं नाही रे? नक्की काय म्हणायचंय तुला यातून?'' सोम्या थोडा सिरियस होऊन म्हणाला, ''कविता थोडी अगम्य आहे हे मला मान्य आहे. अरे पण स्त्रीचा पुरुषाकडे आणि पुरुषाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोनच आपला समाज हरवून बसला आहे. स्त्रियांनी जर 'बिनबाह्यांची पोलकी' घातलीच नाहीत तर पुरुष बघणार नाहीत. पुरुषांनी आपली बघण्याची दृष्टी बदलली तर स्त्रियांना त्रास होणार नाही. पण स्त्री किंवा पुरुष दोघेही या गोष्टिंचा विचार करीत नाहीत. मधल्यामध्ये ठपका बसतो तो बिनबाह्यांच्या पोलक्यांवर.'' मला अजुनही बऱ्याच शंका होत्या पण तो विषय मी तिथेच सोडला नसता तर कदाचीत मीच 'बिनबाह्यांची पोलकी' या विषयावर पीएचडी करायला घेतली असती.
तेव्हढ्यात बेल वाजली. पाहतो तर बायको होती. बायको आल्यामुळे सततच्या सोम्याच्या बाँबिंगची तीव्रता थोडी कमी होईल म्हणून हायसं वाटलं. त्याचबरोबर बायको नेमकी त्याच दिवशी बिनबाह्यांचं पोलकं नेसली होती म्हणून नवल वाटलं. सोम्याला पाहून बायको म्हणाली, ''काय भावजी आज कशी काय वाट चुकलात? बसा. चहा करते. ह्यांनी काहीच केलं नसणार. पाणी तरी दिलंत का भावोजींना?'' ''दिलं वहिनी. पाणी दिलं. सरबतही दिल.'' सोम्या. ''चला बरं आहे. मागच्या उदबत्त्या बाकी छान होत्या तुमच्याकडच्या. ऑफिसमधल्या मैत्रिणींना सगळ्यांना दोन दोन पाकिटं हवी आहेत. सुधा काकू बऱ्या आहेत ना?'' सोम्या आणि हिच्या माहेरचं गाव एकच होतं. त्यामुळे गावचा आणि माहेरचा माणूस म्हणून पहिल्यापासूनच सोम्या आणि ही एकमेकाना ओळखत होते. सोम्या एकटाच होता. एकंदरीत सुमार शरीरयष्टी आणि बेताची परिस्थिती यामुळे लग्न जमेना. हिचं आणि सोम्याच्या आईचं (सुधा काकूंचं) चांगलं सूत होतं. हिनं काय, मी काय पुष्कळ स्थळं सुचवली. पण योग नाही. त्यात हे साहेब मुलगी बघायला गेल्यावर तिला असल्या कविता वाचून दाखवणार. म्हणजे जमत असलेलं लग्न मोडायचं.
असो. पुढे चार पाच महिन्यांनी सुधा काकू आनंदाची बातमी घेऊन आल्या. सोम्याही बरोबर होता. काकू म्हणाल्या, ''अलके, परमेश्वरानं ऐकलं गं माझं एकदाचं. हे घ्या पेढे. लग्न जमलं हो सोम्याचं. दापोलीचीच आहे हो मुलगी. एकदा नातवाचं तोंड पाहिलं की मी मोकळी. पुढच्या वेळेला पोर आली की घेऊन येइल सोम्या इकडे दाखवायला. आत्तापुरता हा फोटो आणलाय. सोम्याचा आग्रह होता. मुलगी मनोहर आणि अलका वहिनींना पसंत पडली की शिक्कामोर्तब झालं. बघून घे बरं का सोम्याची सोमी.'' आम्ही फोटो पाहिला. सोम्याच्या मानानी मुलगी थोडी बुटकी असावी. पण बाकी सगळ्या बाबतीत सोम्यापेक्षा नक्कीच उजवी होती. हिनं सोम्याला विचारलं, ''काय भावजी? अहो नाव तरी कळू द्या मुलीचं.'' सोम्या लाजून चूर झाला आणि म्हणाला, ''सुमती नाव आहे तिचं.'' त्यावर ही म्हणाली, ''छान आहे हो तुमची सुमती. आता बार उडवून टाका लवकर. पुढच्या वेळी मुंबईला आली की इथे घेऊन यायचं. जेवायलाच यायचं बरं का.'' त्यावर सोम्या म्हणाला, ''अलका वहिनी, तुमच्याचकडे पाठवणार आहे तिला. तुम्ही करता तसे बटाटेवडे करायला शिकवायचं बरं का तिला.'' बायको हसून म्हणाली, ''अहो येत असतील की तिला करता चांगले. तुम्हा पुरुषांचा विश्वास म्हणून नाही बायकांवर. सगळे पुरुष सारखेच. पण काही म्हणा भावजी, गावकडची असली तरी बरीच मॉडर्न दिसते बरं का. नाही, अगदी स्लीव्हलेस घालून फोटो काढलाय म्हणून म्हंटलं.''
सुधा काकू मध्ये पडून म्हणाल्या, ''हो गं बाई. खरं आहे. पण काय गं तुम्ही हल्लीच्या बायका. असली 'बिनबाह्यांची पोलकी' घालून कशा काय फिरता. कठीण आहे.''
'बिनबाह्यांची पोलकी' ऐकल्यावर सोम्याचा चेहरा गोरामोरा झाला. आम्ही एकमेकांकडे पाहून मोठ्यांदा हसत सुटलो. पुढे बरीच वर्ष सोम्याच्या कविता काही ऐकायला मिळाल्या नाहीत. पण त्याचा आनंदच झाला मला. एकदाचे 'कवी सोम' मार्गी लागले. त्यांचं घोडं गंगेत न्हालं.