नवी मराठी वेबसाईटः मायभूमी



महाराष्‍ट्राच्‍या कडेकपाऱ्या आणि दगड-मातीतून इथला इतिहास दरवळतो. आपल्‍या तलवारीच्‍या बळावर इतिहास घडविणारी पोलादी मनगटाची नररत्ने जशी या भूमीत जन्‍माला आली तशीच आपल्‍या अनुभव विश्‍वाच्‍या आणि शिक‍वणुकीच्‍या बळावर पोलादी समाज मन घडवणाऱ्या संत विभूतींनीही या भूमीला आपल्‍या अस्तित्‍वाने पावन केले आहे. साहित्य, काव्‍यशास्‍त्र संगीत आणि अष्‍टकलांची खाण असलेल्‍या शिवबाच्‍या या भूमीत तुम्ही-आम्ही जन्‍माला आलो. याचा निश्चितच सर्वांना अभिमान वाटणे साहजिकच आहे.

याच मातीने रोहिडेश्वराला स्‍वरक्ताने अभिषेक घालून स्‍वराज्याची शपथ घेणारे शिवरायही जन्‍माला घातले आणि 'स्‍वराज्य हा माझा जन्‍मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार' असे ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्‍यांनाही घडवले. याच मातीने मायमाऊली ज्ञानदेव आणि तुकारामही जन्‍माला घातले आणि बाबा आमटे, सचिन तेंडुलकर आणि गानकोकीळा लता मंगेशकर यांच्‍या कार्याची प्रेरणाही हीच भूमी...

छातीचा कोट करून मोगली साम्राज्याला राखून धरणारा मर्द मावळा याच भूमीतला आणि स्‍वातंत्र्याच्‍या ध्‍येय्यापोटी समुद्र पोहून जाण्‍याची ताकत असलेला विनायक दामोदर सावरकर नावाचा महापुरूषही याच भूमीतला.

जितका रंजक इथला इतिहास तितकाच वैविध्यपूर्ण इथला निसर्गही!

फेसाळलेले सागर किनारे आणि उधाणलेल्‍या दर्याला आव्‍हान देणाऱ्या लालमातीतला कोकणी माणूस असो किंवा उत्तूंग सह्याद्रीच्‍या कडेकपाऱ्यांना आव्‍हान देत काळ्या आईच्‍या सेवेत रमणारा जगाचा पोशिंदा शेतकरी राजा सर्व याच भूमीची लेकरं...

या पावनभूमीची महती सांगणारी मायभूमी.कॉम ही वेबसाईट कविवर्य कुसूमाग्रजांच्‍या जन्‍मदिनाचे आणि मराठी दिनाचे औचित्‍य साधून आम्ही वाचकांच्‍या सेवेसाठी सुरू केली आहे. गेल्‍या काही वर्षांपासून प्रसारमाध्‍यमाच्‍या क्षेत्रात कार्यरत असल्‍याने या भूमीतील नररत्नांबद्दल माहिती देतानाच वाचकांपर्यंत ताजी बातमी लवकरात लवकर पोचावी असा प्रयत्न आम्‍ही याद्वारे करीत आहोत.

पहिला घास भरवणाऱ्या मायभूमीचे आणि पहिला शब्‍द बोलायला शिकवणाऱ्या मायबोलीचे ऋण कधीही फेडणे अशक्यच! मात्र तरीही माझा हा बालहट्ट...!

वाचकराजा तुझ्या शुभेच्‍छांच्‍या बळावर...!

आमचा हा प्रयत्‍न कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा... आणि हो मायभूमीच्‍या मुक्तमंचावर तुमच्‍या लेखणीचेही स्‍वागतच...

मायभूमीवर लिखाण करा

होय, माय मराठीच्‍या सेवेसाठी झटणाऱ्या प्रत्येकाचे
'मायभूमी'वर स्‍वागत आहे. तुम्ही कुठल्‍याही प्रकारचे लेखन करीत असल्‍यास
आणि ते प्रकाशित व्‍हावं असं तुम्हाला वाटत असल्‍यास '
मायभूमी' तुम्हाला उपलब्‍ध करून देत आहे, एक मुक्‍तपीठ... 

एक
संधी-
आपले विचार जगभरात पसरलेल्‍या कोट्यवधी मराठी
बांधवांपर्यंत 
पोचवण्‍याची...

आपले यापूर्वी नेट जगतात प्रकाशित न झालेले स्‍वलिखित लिखाण आमच्‍याकडे
पाठवा आणि आम्ही ते आमच्‍या असंख्‍य वाचकांपर्यंत पोचवू.

मग प्रतीक्षा कसली?

तुमचं कुठल्‍याही प्रकारचं लिखाण-

देशातल्‍या
किंवा राज्‍यातल्‍या सामाजिक व राजकीय घडामोडीवरचं तुमचं परखड मत, तुमचे
विचार, तुम्ही केलेली भटकंती अगदी तुमच्‍या गावाची महती आणि माहिती
सांगणारा लेख किंवा तिच्‍या/त्याच्‍यासाठी म्हणून लिहीलेली पहिली चारोळी
किंवा कविताही काहीही आपल्‍या या मुक्तमंचासाठी पाठवा. लिखाणाला साजेसे
फोटो पाठवल्‍यास स्‍वागतच.

आपल्‍या शब्‍दांना वाट
द्या, जगाच्‍या व्‍यासपीठावर येण्‍याची....


फक्त लेखन पाठवताना खालील गोष्‍टींची काळजी घ्‍याः

1. लेखन स्‍वलिखित असावे आणि समाजाच्‍या उपयोगाचे असावे. संकलीत असल्‍यास
मूळ लेखकाच्‍या नावासह तसा स्‍पष्‍ट उल्‍लेख असावा.
2. लेखन मराठी युनिकोडमध्‍ये (Mangal) किंवा (Krutidev) मध्‍ये टंकलिखित
केलेले अथवा पीडीएफ फाईल प्रकारात असावे.

... आणि हो आपल्‍या लेखासह आपला थोडक्यात परिचय,
पत्ता व लेखात प्रकाशित करण्‍यासाठी पासपोर्ट आकारातील छायाचित्र अवश्‍य
पाठवा.

खाली दिलेल्‍या फॉर्ममध्‍ये आपले लेखन पेस्‍ट करून किंवा editor@maaybhumi.com या पत्‍यावर आपल्‍याला पाठवता
येईल...