कबिराचा एक दोहा प्रसिद्ध आहे,
" काल करे सो आज कर आज करे सो अब ।
पलमे परलय होयगी बहुरी करोगे कब ॥
कबीराचा उपदेश मला १००% पटतो तरी बऱ्याच लोकाना मात्र तो मुळीच पटत नाही त्यांच्या मते
" आज करे सो काल कर काल करे सो परसो ।
इतनी जल्दी क्या है भाई जब जीना है बरसो॥
अगोदर त्यांच्या मते इतक कोणत काम महत्वाच असत की जे आज ऐवजी उद्या झाल तर आकाश कोसळणार आहे? अस वागल्यामुळे काय बिघडतय आणि खरोखरच तसे वागून त्यांचे काही बिघडलेल दिसत नाही. उलट आजची गोष्ट उद्यावर ढकलल्यान त्यांचा फायदाच झालाय.
आता हेच पहाना एके काळी रेडिओ वापरण्यासाठी परवाना काढावा लागत असे. जणू काही रेडिओ हे एकादे महाभयंकर शस्त्रच आहे. आजकाल तसली शस्त्रेही विनापरवाना वापरली जात आहेत. तर त्या काळी म्हणजे रेडिओ वापरण्यासाठी परवाना लागत असे त्याकाळी मी इमानेइतबारे ३१ जानेवारीच्या आत पोस्टात जाऊन लांबलचक रांगेत उभा राहून पंधरा रुपये भरून पोस्टाकडूनच मिळालेल्या त्या कळकट्ट पुस्तकावर त्याहूनही कळकट शाईचा शिक्का मारून घेऊन परवान्याचे नूतनीकरण केल्यावर राष्ट्रपतिपदक मिळाल्याच्या आनंदात घरी येत असे. पण आमच्या बाबूरावनी मात्र ही दगदग कधीच केली नाही. मला खात्री होती की एक दिवस पोस्टाचे लोक बाबुरावांच्या घरावर छापा घालून त्यांचा रेडिओ नक्की जप्त करणार. बाबुरावांना मात्र अशी भीती कधीच वाटली नाही. उलट तेच मला " उगीचच आपला वेळ आणि पैसा वाया घालवतोय हा " असे म्हणून वेड्यात काढायचे. आणि खरोखरच एका सुप्रभाती सरकारला माझ्यासारख्या प्रामाणिक नागरिका ऐवजी बाबूरावांचच म्हणण बरोबर आहे अस वाटल आणि एक फतवा काढून यापुढे रेडिओला परवान्याची जरूरी नाही असे जाहीर करून ते मोकळे झाले. बाबुरावनी लगेच मला सुनावल, "बघ मी काय म्हणत होतो, अरे तुमचा परवाना पाहण्यासारख्या उचापती करायला पोस्टातल्या लोकांना वेळ कुठे आहे? "
जी गोष्ट रेडिओपरवान्याची तीच गोष्ट आयकर भरण्याची. मी तर पगारदार माणूस त्यामुळे मला प्रत्येक महिन्यात आयकर कापूनच पगार हाती पडे पण बाबुरावांच मात्र तसे नाही. त्यांचे अनेक धंदे त्यामुळ त्यांच खर उत्पन्न किती याचा पत्ता त्यानाही नसतो आणि आयकर भरण्यासारख्या क्षुल्लक बाबीकडे लक्ष द्यायला त्यांना फुरसत नसते. आणि तशी ती सरकारला म्हणजे आयकरखात्यालाही नसावी कारण बाबुरावांसारख्या बऱ्याच लोकांच्या नावावर इतके कोटी आयकर थकबाकी असे पेपरात छापून येते तेव्हां मग त्या खात्याना जाग येते. मग त्या वेळी सरकारवर मेहेरबानी म्हणून शक्य तितक्या कमी आयकरात ते आपला करभार निपटून टाकतात.
गावाकडील शेतावरील वीजबिल भरण्याबाबत मी अगदी दक्ष असतो. केव्हां म. रा. वि. मं. चे कार्यक्षम लोक येतील आणि आपली वीजजोडणी तोडून टाकतील आणि शेतातले उभे पीक वाळून जाईल याची मला धास्ती असते. कधीकधी तर बिल भरलेले असले तरी ही मंडळी बाबुरावांनी बिल भरले नाही म्हणून माझीच वीज तोडतील अशीही शक्यता असते पण बाबुरावांना त्याची मुळीच काळजी नसते. अगोदर तर कित्येक दिवस ते आकडा टाकूनच वीज घ्यायचे म्हणजे उगीच बिल थकायला नको की वीज तोडायला नको. पण एकदा त्यानाच शॉक बसला त्यामुळे हा सोपा उपाय त्यानी बंद करून अधिकृत जोडणी घेऊनच वीज त्यानी मिळवली पण तरीही वीजबिल भरण्याचे नाव घेतील तर ते बाबुराव कसले. मग कधीतरी स्वाभिमान योजना जाहीर होते आणि त्यावेळी बिल भरून बाबुराव वीजमंडळाला उपकृत करतात.
बाबूरावना मी कधीतरी विचारतो, " अहो पण तुम्हाला वेळीच या गोष्टी कराव्या अस का वाटत नाही? एक सुबुद्ध नागरिक म्हणून आपले ते कर्तव्य नाही का? "
" खर सांगू का बंडू, सरकारनच ही संवय मला लावली. "बाबूरावनी अस म्हणताच मी प्रश्नार्थक मुद्रा करून त्यांच्याकदे पाहत राहिलो.
" म्हणजे अस की कोठलीही गोष्ट वेळेत द्यायची नाही हा बाणा सरकारचा. आंदोलन करून किंवा धरणे धरावे तेव्हां यांना जाग येते. अजून जायकवाडीच्या, कोयनेच्या धरणग्रस्तांना भरपाई मिळतेच आहे. स्वातंत्र्यसैनिकांना ते मेले तरी अजून स्वातंत्र्यसैनिकाचे निवृत्तिवेतन मिळतच नाही. ही यादी पाहिजे तितकी वाढवता येईल. बर आपल्याला सरकारचे काही देणे द्यायचे असले म्हणजे कर, वीजबिल वगैरे तर त्या घेण्यासाठी तरी जरा सोयिस्कर पद्धत ठेवायची तर तेही नाही. आता आपलेच बघ, घर बांधले तरी बिगर शेती सारा (N.A. ) दर वर्षी भरावा लागतो. मी पहिल्यांदा तो भरायला गेलो तर त्यांची कागदपत्रे काही त्याना सापडत नव्हती शेवटी मी त्यांचा नाद सोडून घरी परतलो. पुन्हा दोनतीनदा मी त्या कार्यालयात गेलो तर तेथे कोणीही हजर असायचे नाही. एकदा सुदैवाने एक कर्मचारी सापडला तर त्याने पुन्हा एकदा कागदपत्रे शोधण्याचा प्रयत्न करून "अहो उगीचच खाजवून खरूज कशाला काढताय? तुम्हाला नोटीस आली तर भरा तेव्हां. "अस सांगून मला परत पाठवल. शेवटी घर विकायच्या वेळेपर्यंत यांची नोटीस काही आली नाही पण त्यावेळी मात्र आवश्यकच असल्याने काहीतरी रक्कम भरावी लागली. किंवा भरता आली म्हण.
"वीजबिल भरण्याची तीच तऱ्हा, आत्ता आत्ता जरा सुधारणा झालीय नाहीतर त्यासाठी भलीमोठी रांग असायची कित्येकदा तुला अर्धा दिवस रजा त्यासाठी काढावी लागली असेल. घर बांधल्यावर मला वीज जोडणी मिळाली तरी विज बिल मात्र मिळत नव्हते चौकशी करायला गेलो तर "मिळेल लवकर " अस सांगायचे. शेवटी मला अगदी मागे लागल्यावर पाच वर्षांनी एकदम १०, ०००/- रु. चे बिल आले मग ते एकदम मी कसे भरणार? मग वीज मंडळालाच पाच वर्षाचे बिल एकदम भरणे शक्य नाही हप्त्याने भरणा करण्याची परवानगी द्या म्हटल्यावर चूक त्यांचीच असल्यामुळे ती द्यावीच लागली. "
या गोष्टी अर्थातच खऱ्या होत्या कारण माझाही अनुभव असाच होता.
" मग यथा राजा तथा प्रजा ही उक्ती सार्थ ठरली तर आश्चर्य कसले? "
" आणखी एक महत्वाची गोष्ट, " बाबुराव आता रंगात आले होते,
" तू तरी या सगळ्या गोष्टी अगदी वेळेवर करतोस असा टेंभा मिरवतोस पण मला एक सांग तसे केले नाही तर आपले नुकसान होईल अशी भीती तुला वाटते म्हणूनच ना?. तुला जर खात्री असेल की तू बिल भरले नाहीस तर तुझी वीज तोडली जाणार नाही किंवा महापालिकेचा मिळकतकर भरला नाहीस तर तुझ्या घराचा लिलाव होणार नाही किंवा पाणीपट्टी भरली नाहीस तर तुझा नळ तोडण्यात येणार नाही तर तू तरी या गोष्टी वेळच्या वेळी करशील का? मला तशी भीती वाटत नाही हाच आपल्या दोघातला फरक. शेकडा ९० तुझ्यासारखे आहेत म्हणून सगळे व्यवहार सुरळीत चालू आहेत. जर सरकारने दाखवून दिले की कायदे तोडणारा कोणीही असला तरी त्याला शासन होईलच आणि तेही अगदी कडक तर मग कोणाचीच काय माझीही छाती होणार नाही अस वागण्याची पण तसे घडेल तो सुदिन केव्हां उगवणार कोण जाणे "बाबुरावांच्या बोलण्यावर मला वाद घेता आला असता तरीही त्यात अगदीच तथ्य नव्हते असे नाही त्यामुळे मी गप्पच बसणे पसंत केले.