अश्रूंच्या ओघळात

तरारलाच एक थेंब कोपऱ्याला
बाहेर पडल्यावर कळले बिचाऱ्याला
पर्याय नाही एकत्र राहण्याला
जग पुसून टाकते एकट्या-दुकट्याला

स्वरयंत्रे कुठीत झालेली
शब्दांचीच होरपळ धुमसणारी
डोळ्यात तांडव लाटांचे, पण

पापणीची पताकाच गोठलेली

चुकलेच ते संस्कार आसवांवरले
लबाडच ते ह्रदयाला फसवून पळाले
कळवळले दुखावलेले डोळे
हुंदकेही घशातच घुसमटलेले

वेड्या अश्रुंचे हे भलेमोठे थारोळे
लागलेच आहे हेंदकाळायला
भांडू नका मित्रांनो, येईल साऱ्यांची वाट्याला
घ्या, येतीलच उपयोगाला
   ... माझ्या पश्चात ढाळायला.