प्रामाणिक मृत्यू

काय म्हणता? प्रामाणिकपणा मेला !
तरीच एव्हढी गर्दी अंत्ययात्रेला
         सारे यात्री उधळती आकाशी गुलालाला
         आता रान मोकळे झाले भ्रष्टाचाराला

टपलेच होते 'असत्य' खुर्ची बळकावयाला
विचारांचा गोंधळ आणि उधाण दमदाटीला
         शाब्दीक आग लावली विधायक कार्याला
         सोज्वळ बाग लागली नामशेष व्हायाला

फ्रॅक्चर झाली सत्याची कुबडी
अब्रूही आता नाचते ऊघडी
         चहुबाजूला लांडीलबाडी
         लखलखती तोंडे बेगडी

काय म्हणता? आज स्मृतीदिन प्रामाणिकपणाचा
त्यानिमित्ताने तरी आठवणी खऱ्यांच्या
           सत्त्याचा थेंबभर डबक्यात
           दुमदूमती डरकाळ्या भ्रष्ट बेडकांच्या