ती उभी दारात, तो भिजे पावसात
पावसामधला तो, होता तिच्या अंगणात
तो तर पावसात, बेधुंद नाचत होता
जोराने पाऊस, आणखी बरसत होता
तिलाही वाटत होत, पावसामध्ये भिजावं
त्याच्यासंगे थोडंसंच, आपणही नाचावं
हसत हसत ती, पावसामध्ये गेली
क्षणार्धात पावसाने, ओली चिंब झाली
हातात हात घेऊन, ती पण भिजली
ढगांमधून दूर, पळाली होती बिजली
सळसळणारा वारा, शांत जरा झाला
लपलेला सूर्य, ढगांबाहेर आला
सप्तरंगी तोरण त्याने,आकाशी बांधलं
चिमणीच पिलू ,घराकडे निघालं
पहिल्या पावसात दोघेही, मनसोक्त भिजले
घड्याळात सायंकाळचे, साडेसहा वाजले
नेहमीप्रमाणे स्वयंपाकाची, झाली तिला घाई
तो होता छकुला आणि ती त्याची प्रेमस्वरूप आई