भाषा: आग्री / मराठी
गोपाला
ढोरे वळणारा गोवारी
ढवल्या-पवल्यांना हाका मारी
साधा भोला गोवारी,
झाली मारामारी, उगारल्या तलवारी
गोपालाला आता, गोपालभाई म्हणे दुनिया सारी
गोपाला, गोपाला
दलालीचा धंदा केला
साऱ्यांना नडला
देह सारा सोन्याने मढवला
खानदानी जमिनीवर गाढवाचा नांगर फिरविला
समाज सलाम करतो पैशाला
पैसा संपल्यावर कं करशील बाला?
गोपाला, गोपाला
देवकीचा तू बाला, देवकीनंदन गोपाला
गोवारी व्हतो तवा शालेन जाऊ वाटे
शालेन गेलो तवा पैसा मोठा वाटे
शिकून नाही नोकऱ्या केल्या
सैन्यात जायची तयारी नाही,
मेहनत तर नाहीच नाही
शिक्षक व्हायची तयारी नाही
एका रातीन मना शेठ व्हायाचे
त्यासाठी रक्त पितो,
मी माझे अन दुसऱ्याचे
मला देवकीनंदन नाही, कंस आहे व्हायाचे
साऱ्या जगावरी आहे राज्य करायचे
किसनाचे आता डोळे झाकायचे
वासुदेवाला तुरुंगात डांबायचे
देवा! सांभाळ तुझी लेकरे
देशाची आता झाली लक्तरे
दारू, जुगारात हरवली पोरे
ना आता गोवारी, ना गुरेढोरे
एकमेकांचा जीव घेण्या बाळगती हत्यारे
बंद झाली आता सरस्वतीला दारे
गोपाला, गोपाला देवकीनंदन गोपाला
चोहो बाजुने आला पैसा
पुढच्या पिढीचा खाल्ला हिस्सा
रोज रटारटा शिजतो नोटांचा रस्सा
पाप म्हणजे काय कळत नाही
भारतमातेचे काही खरे नाही
गोपाला, गोपाला, देवकीनंदन गोपाला
सांभाळ तुझी लेकरे, पुण्य समजती पापाला