जगलो तालावर इतरांच्या मला हवे ते कधी घडलेच नाही
पडलो शय्येवर मरणाच्या तरी त्यातले कोणी रडलेच नाही
मृगनयनीच्या नयनांतला एकेक अश्रू जणू एकेक मोती
कबरीवर माझ्या ढाळायला कधी दोन मोती घडलेच नाही
दिले सर्वस्व प्रेम याचना केली प्रीती नव्हे मी भक्तीच केली
सुमनाहून मन कोमल तिचे कधी मजवरी जडलेच नाही
निष्पर्ण वठले जगणे अन भोगणे दुःख अपार निरंतर
अमृतवर्षावातही माझ्या पदरी काही पडलेच नाही
जगरहाटी ही अशीच चाले यंत्र फिरतसे एक निरंजन
रामकृष्णावाचूनही येथे कोणाचे काही अडलेच नाही