कायी माय

बसच्या खिडकीतून दिसणाऱ्या विदर्भातल्या काळ्या मातीकडे पाहून सुचलेल्या काही ओळी.

कायी माय

कायी माय ढगानकड डोया लाऊन पायते
अमृताच्या सरी आता कवा बरसते?
 
वाट पाऊन पावसाची तिचा गया सुकला
नदीसंग शेजारचा नाला हि आटला
  
दिसभर उन्हामंदी सोसते उष्ण झावा
तिच्या अंगणातून पयाला चिमण्यांचा थवा

कोकीयेचे सूर मात्र कानी तिच्या पडे
कापसाच्या बिया आता पाण्यासाठी रडे

हिरवा शालू तिला नेसायचा हाये 
झेडूंचा गजरा तिला माळायचा हाये

कायी माय झाली पाण्यासाठी आतुर
ढगानले धाडले दोन चार पतूर

ढगानपाशी पतूर अजून पडूनच हाये
कायी माय पावसाची वाट पाहतच हाये