टपकन् पडून थेंब-थेंब
पाण्यातनं बाहेर येण्यासाठी
छोटीशी उडी घेतात
आकाशाच्या दिशेनं
अगतिक होऊन
शेवटी
परत पाण्यात पडण्यापूर्वी
पहिल्या वलयात
पुन्हा वलयं निर्मितात
नजर खिळवून ठेवणारी
एकमेकात गुंतत जाणारी
असंख्य वलयंच वलयं
मलूल होत नाहीशी होत जातात
त्यांच्याच जागी
नवीन वलयं
साकारत असतात
गढूळलेल्या पाण्यावर
गाथा जीवनाची एकाक्षर
निसर्ग चितारतो पुन्हापुन्हा
कुणासाठी? कशासाठी?
त्या गढूळ पाण्याचा
स्पर्शही नको नकोसा वाटतो
पुनर्नवा बेडूक मात्र
त्या वलयांकडे पाहात
'खरांय् खरांय्' गात राहातो
'खरांय् खरांय्' गात राहातो ॥