आता कुणीही भेटत नाही,
दिवा कधीच पेटत नाही,
पाऊस कोसळायचा कोसळतोच,
सुसाट वाराही वाहतो,
पाखरे येतात खिडकीशी
पण त्यांना कुणीही हाकत नाही,
आता कुणीही भेटत नाही,
दिवा कधीच पेटत नाही.
ऐकले मी हुंकार अनेक,
शब्द अन भाव अनेक,
उगाच हसणे उगाच रुसणे,
पैजणेही छुम-छुम बोलायची,
पण आता कुणाची चाहुल नाही,
आता कुणीही भेटत नाही,
दिवा कधीच पेटत नाही.
अजुनही दाराशी प्राजक्त फुलतो,
कुणीच पण तो वेचत नाही,
मला एकटे सोडून गेलीस,
कुणीच आता सोबत नाही,
आता कुणीही भेटत नाही,
दिवा कधीच पेटत नाही.
दुःखाने मी भरून गेलोय,
आता नाही जगणे सोसत,
प्रेम तरीही आटट नाही,
नसेल मिळणार मरण मला जर
का मी मरणाला भेटत नाही,
आता कुणीही भेटत नाही,
दिवा कधीच पेटत नाही.