शेतकरी गीत : काळ्या काळ्या मातीमधी पिकलंया सोनं

काळ्या काळ्या मातीमधी पिकलंया सोनं
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान                                   ||धृ||

औंदाच्याला बरसला बरसला पानी
मातीचा सुवास आला गर्द हिरव्या रानी
पळापळी करतात खोंडं माजेल ओलं वारं पिऊन
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान                          ||१||

विहीरीच्या पान्यामंदी चाले मोटर तासंतास
पाटामधून पानी जाई खालच्या शेतास
वखरणी करतात बैलं वैरण खावून
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान                    ||२||

डोईवर पदर हिरवी साडी लेवून
कारभारणी येईल आता न्याहारी घेवून
घाम गाळून कामं करतो पिक येवूदे सोनं
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान                  ||३||

शेतकरी बळीराजा झाला पोरगा धरतीला
अन्नधान्य पिकवून देई आधार देशाला
कणगीत धान्य भरू दे देवा नको काढाया ऋण
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान                  ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०७/०७/२०१०