बंद

केला कुणी आज बंद
    आहे नुसतीच ब्याद ।
जन मानसाच्या मनी
    काय तयाचा आल्हाद ॥

काढली रे कुणी आज
    सरकारची या कळ ।
बस फोडी, ट्रेन रोखी
    सारा सावळा गोंधळ ॥

म्हणे आम्ही कार्यकर्ते
    देशाची या चिंता वाहु ।
किती दूर गाव माझा
    बस बंद कसा जाऊ ॥

झाला बंद जो यशस्वी
    श्रेया साठी चढाओढ ।
जनतेच्या व्यथा लाख
    त्याची कुणाला त्या चाड ॥