सारेचि देखिले वैभव ... (बाबा महाराज आर्वीकर) - भाग २

ऐसी बादशाही भोगिली मी सुखे। आणिक ती दु:खे आनंदाने ॥२१॥

किती सांगू बापा हाल या देहाचे। बंध ते चोरीचे भोगले मी ॥२२॥

वेडा म्हणोनिया मार तो साहिला। कथा खांडव्याला झाली ऐसी ॥२३॥

वाहिले मी ओझे हमालाच्या परी। हीच मुंबापुरी साक्ष आहे ॥२४॥

भांडी घासायासी तीन दिस होतो। हॉटेली चहा तो ग्राहकान्सी ॥२५॥

बंदरी राहिलो कोळसा फेकाया। धन्य वाटे माया मज सारी ॥२६॥

तैसाचि फिरलो राजभवनात। राहिलो सुखात तीन ठायी ॥२७॥

हजारो कोसांची पायपीट केली। बिहारी बंगाली मंत्र विद्ये ॥२८॥

परी आता झालो गोसावी मुळाचा। वीट वैभवाचा मज आला ॥२९॥

सोळा वरूषांचा निघालो आडरानी। पंढरी वाटेनी म्हणत विठ्ठल ॥३०॥

कुठेही पाहावे काहीही करावे। देई तेचि खावे भगवंत ॥३१॥

जरीचे अंबारी देह सजविला। गजावरी मिरवला नेपाळात ॥३२॥

परी गोड नाही वाटे माझ्या जीवा। म्हणोनिया देवापाशी आलो ॥३३॥

उणेपणा काही उरलाच नाही। सुखे सर्वव्यापी प्राप्त झाली ॥३४॥

चिंध्या पांघुरल्या उतार वस्त्र्यांच्या। विंध्याद्री गिरीच्या कडेलागी ॥३५॥

ऐसे बहु आहे चरित्र विटाळ। अज्ञानाचा मूळ ऐसा सारा ॥३६॥

हे काय सांगावे जगापुढे आम्ही। सदाचे निकामी वैभव हे ॥३७॥

याहुनी थोर हरिभक्त झाले। शरीर विटंबिले बहू कष्टे ॥३८॥

आम्ही काय केले व्हायचे ते झाले। हरिने ठेविले तैसे वागू ॥३९॥

सारेची जाणावे मृगजळी व्याप। वृथा हे विलाप आलापाचे ॥४०॥

बहू ऐसे आहे चरित्र आमुचे। परी ते वाणीचे वृथा शीण ॥४१॥

- प. पू. बाबा महाराज आर्वीकर

(श्री. महाराजानी लिहीलेले साधनाकालीन वर्णन)