वाट पाही

राया माझा सरदार
    शिवरायांच्या पदरी ।
गेला मोहिमी कधिचा
    प्रिया तुझी वाट पाही ॥ १ ॥

वेढा पन्हाळी पडला
    बाळ माझा अडकला ।
काळजाला थार नाही
    जिजाऊ ही वाट पाही ॥ २ ॥

जणु वणवा पेटला
    जीव कासावीस झाला ।
खग चातक कधिचा
    पावसाची वाट पाही ॥ ३ ॥

फिरे रानोवनी माय
    टिपायाला दाना-पाणी ।
कोटरांत चिव-चिव
    पिलं तुझी वाट पाही ॥ ४ ॥

आंग्ल लचके तोडीती
  सारा मुलुख लुटती ।
दीनवाणी हिंद माता
   स्वातंत्र्याची वाट पाही ॥ ५ ॥

किती चाललो फिरलो
    शिणलो परी नाही ।
वाट पंढरीची माझी
    विठामाई वाट पाही ॥ ६ ॥