भय इथले अजून संपत नाही

यः क्रिएटिव्ह सः मनुष्य असे म्हणत आम्ही घोडे उधळले
अन् धुळीकडे दुर्लक्ष करत पुढयातल्या क्षितिजावरले पीस पकडले

पीस झटकता हाती आले पिपातल्या उंदरांचे जिणे
मान मोडूनी काडी चावत माडीवरले लाजिरवाणे
शृंगार साहेना तो दुबळ्यांचा परी यत्र तत्र दुबळ्यांचीच बिऱ्हाडे
भावगीत गात गोजिरवाणे पिपात उंदीर न्हाले न्हाले
समष्टीचा अर्थ विचारता देणाराही देतच गेला
पारव्याची रानभूल ती परी ओळ शेवटाची सुचवून गेला
अर्थाअर्थी घोडे होते, अर्थाअर्थी क्षितिजही होते
लाजून पुढे सरणाऱ्या अन् बावरणाऱ्या वधूइतकेच घायाळ होते
सावरताना मग उंच झुला घोडे अडले क्षितिजापाशी
भय इथले अजून संपत नाही म्हणूनी प्रतिभा बिचारी सदा उपाशी