शुक्रतनय

पुराणातल्या कथेत एका
देवांच्या चलाखीचं वर्णन
येतं चटकदार प्रेमकहाणीसवे
हो, तेच ते कच-देवयानी आख्यान
राहून राहून वाटतं-
त्यातली एक उपकथा
काळाच्या ओघात
लुप्त तर झाली नसावी?
+++
दानवांनी केला कचाचा खातमा
तुकडे जाळले नि
राख मिसळली मद्यात
त्या राखेसवे थोडी मातीही असणं
स्वाभाविकच होतं!
+++
मद्य, ज्यात होती राख
देवांच्या प्रतिनिध्याची-कचाची
आणि होती मातीही
भूमिच्या प्रतिनिधीरूपानं...
जेव्हा ते मद्य
शुक्राचार्यांच्या उदरी विसावलं
तेव्हा दानवांनी केला आनंदोत्सव
इकडे देवयानी हबकली...
तिच्या आकांडतांडवाने
दानव नि शुक्राचार्य
दोघंही गांगरले
गुरूशापाच्या भीतीनं दानव
तर देवांच्या विजयाचा अंदाज आल्यानं
शुक्राचार्य स्वतः!
+++
देवयानीच्या हट्टाखातर
संजीवन मंत्राचं स्मरण करताच
कच जेव्हा पुनः जन्मला
शुक्रतनय होऊन
तेव्हाच त्या मृद्कणांनाही
लाभला पुनर्जन्म
कचाच्या देहासवे चिकटून
शुक्रतनय म्हणूनच!
तो प्रत्येक कण होता अभिभारित
संजीवन मंत्रानं...
+++
अवभृत स्नान करून
कच पवित्र झाला
मृद्कण मिळाले भूमीला
स्नानीयासह...
कचाची विद्या शापित झाली
निष्प्रभ ठरली, तरी
मृद्कणांनी आपल्या साऱ्या बांधवांना
ती संजीवन विद्या
गुपचुप वाटून टाकली!
+++
तेव्हापासून इथंच स्वर्ग अवतरतो
पाण्याचा स्पर्श होताच
चैतन्य साकारतं
धरती झालीय् एक श्रेष्ठ माता
संजीवक!!!