यमन...

 दोन्ही बाजूस दोन तानपुरे... पलिकडे पेटीवर वालावलकरबुवा.. तबल्याला कामत आणि खुद्द स्वरभास्कर गायला!! हे असं दृश्य ज्यांनी म्हणून पाहिलं असेल, त्यांच्या भाग्याचा हेवा करावा तितका कमी आहे.  त्यात जर संध्याकाळची वेळ असेल, आणि यमनसारखा राग असेल तर बोलायलाच नको!

माझ्या सुदैवाने, मी अण्णांचं गाणं प्रत्यक्ष ऐकलं असलं, तरीही त्यांचा यमन प्रत्यक्ष ऐकायला मिळाला नाही याचं वाईट वाटतं. पण एका मैत्रिणीकडून त्यांच्या जवळपास तासभर रंगलेल्या यमनचं लाईव्ह रेकॉर्डिंग मिळालं आणि मी दुधाची तहान त्या ताकावर भागवली. पण ताकही खरोखर अमृततुल्यच! त्याच मैत्रीणीशी बोलताना आम्ही 'अनेक कलाकारांनी गायिलेला एकच राग सलग ऐकायचा' असं ठरवलं.

त्याची मी जी अंमलबजावणी केली त्याचाच हा अनुभव.

            रविवारची सुट्टी, बाहेर धो धो नाही तरी थोड्याच वेळात पूर्ण भिजवू शकेल एवढा पाऊस, त्यामुळे नाइलाजाने का होई ना, मी घरीच होतो.तेव्हाच ही अंमलबजावणी करावी असं मनात आलं. पाऊस पडत होता त्यामुळे मल्हार वगैरे ऐकायला हरकत नव्हती, पण माझ्याकडे कुमारांचा एकच मल्हार आहे त्यामुळे तेवढाच ऐकला गेला असता म्हणून मल्हारावर काट मारली, आणि अनेक जणांनी गायिलेला आणि बहुजनप्रिय असा यमन निवडला.  सुरुवात केली ती अण्णांच्या यमनने. 'काहे सखी कैसे के... ' असे काहीसे बोल विलंबित ख्यालाचे.बहुतेक पेटीवर वालावलकरबुवाच असावेत. अप्पा जळगांवकरांचा पेटीचा बाजच वेगळा आहे.

ती कधी कधी गायकापेक्षाही भाव खाऊन जाऊ शकते, नव्हे जातेच. ह्याबद्दल त्यांना गायकाचीही दाद मिळते हा भाग वेगळा. पण वालावलकरांची पेटी 'पतिं नातिक्रमेत्' असं व्रत पाळणारी वाटते(मला). तबलाही उगाचच गायकाचा आवाज बुजवून टाकणारा नाही. त्यामुळे 

हा

यमन ऐकणाऱ्याला भीमसेनी स्वरांचं आकंठ स्नान घडतं. अर्थात अण्णांच्या किमान मी ऐकलेल्या गाण्यात तरी असं कधी झालेलं नाही, पण इतर गायकांच्या बाबतीत बऱ्याचदा तसं होतं आणि निखळ गाणं ऐकल्याचा आनंद मिळत नाही.असो, तर ह्या यमनचा विलंबित ख्याल मध्यापर्यंत आला आहे, यमनचा एक एक स्वर अण्णा अतिशय नाजुकपणे हाताळत मैफिल रंगवत आहेत. समेवर येण्याआधीचे आणि समेनंतरचे स्वर गळ्यातून असे काही येत आहेत, की ’सम आली’ असे म्हणेपर्यंत आपण पुन्हा पुढच्या स्वरात गुंग होऊन सम किंवा ताल मोजणेच विसरून जातो.गाणं थोडंसं कळतंय म्हटलं, की आपोआपच सम मोज, ताल मोजून बघ, असे प्रकार होतात.पण अण्णांसारख्यांचं गाणं असलं, की हे सगळं गळूनच पडतं. आपण आणि त्या कलाकाराचे एक से एक स्वर, ह्यांच्यामध्ये दुसरं काहीही नाही. ’स्वरसमाधी’!! आनंद !!

विलंबित ख्यालात  'सुनरी सखीऽ' चा ईकारांत षड्ज येतो आणि श्रोता अंतर्बाह्य हलतो. यमनमध्ये अनेक भाव उत्पन्न करायची विलक्षण ताकत आहे. ह्या ईकारांत षड्जामुळे, किंबहुना, तो षड्ज, ते स्वर आणि 'सुनरी सखी, मै का कहू तोसे?' ह्या शब्दांमुळे, यमनच्या स्वरातली हुरहुर ऐकणाऱ्याच्या स्पंदनांपर्यंत पोहोचते.

नंतर विलंबित ख्यालाची सम येते आणि ’श्याम बजाये ... धा धिं धिं धा..धा धिं धिं धा...’ च्या तालात द्रुत बंदिश सुरु होते.ह्यातल्या समेचे ’आज मुरलिया’ तर अफाट.'योगी-जंगल जती(यती)सती,और गुनी मुनी सब नर नारी मिले | मोह लियो है मनरंग कर के |' ह्या शब्दांतून प्रत्यक्ष श्याम मुरारी जेव्हा बासरी वाजवत असेल, तेव्हा काय स्थिती असेल ह्याचे चित्र ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर तरळते. यमनमधली सगळी  एक्स्टसी  एक होऊन त्या स्वर-शब्दांनी निर्मित चित्रात सामावते. श्रोता त्यात बुडून जाणार इतक्यात 'दा नि तादीम, ता ना दे रे ना' करत एकतालातला तराणा सुरू होतो. आहाहा...!! ह्यापेक्षा वेगळा शब्द नाही. एकतालाच्या ३-३, ४-४  आवर्तनापर्यंत चालणाऱ्या ताना ऐकल्या की त्या भीमसेनी साधनेपुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहवत नाही. द्रुत बंदिशीतली 'एक्स्टसी' ह्या तराण्यात चरमावस्थेस जाते. हा तराणा ज्यांनी कुणी प्रत्यक्ष ऐकला असेल, त्यांनी तो पंचप्राण कानात आणून ऐकला असेल खास.

थोड्या वेळात तराणा संपला, लाईव्ह ऐकलेल्यांनी टाळ्या वाजवल्या. त्याही विरून गेल्या. पण मी डोळे मिटून बसलो होतो, तो तसाच किती तरी वेळ होतो. मी काय ठरवून यमन ऐकायला सुरुवात केली हेच विसरून गेलो. आणि किमान त्या वेळी तरी बाकी काहीही ऐकूच नये, अण्णांचा यमन कानात आहे, तो तसाच साठवून ठेवावा असंच वाटत होतं. आणि मी केलंही तसंच.शांत डोळे मिटून बसलो....यमनच्या स्वरांत स्वत:ला हरवून... बराच वेळ...!!