टोचले होते जगाने; खंत नाही
बोचले होते तुझेपण शब्द काही
घे, तुला सारेच माझे मोकळे घर..
पण मला ठेवायची आहे नशाही
काळजी घेतो जशी माझ्या मुलीची
अन तशी सांभाळतो मी वेदनाही
लेकरे नव्हती तरी सांभाळले जग
अन कुणी नुसतेच बनते वंशवाही
थांबले नाहीत डोळ्यातून अश्रू
केवढे होते तिचे जीवन प्रवाही
का? कशाला व्हायचे मी फार मोठे?
दर्शवीतो सत्य छोटा आरसाही
वाटले हलके तुला मी भेटण्याने
अन बरा नसतोच तोरा एवढाही
केवढे बोलून गेलो आज आपण
कोणताही शब्द ना उच्चारताही
जेवढी आसूस असते प्रेयसीची
वाट तितकी देव बघतो आतलाही