पॉम..पाँ...पॉम...

"ए भाय... जरा देख के चलो... आगे भी नही पिछे भी.. " म्हणत आम्ही रस्त्यावर गाडी दामटतो, २ व्हिलर असेल तर नुसतीच बेफान नाही तर,कधी कधी फुटपाथ वर देखिल  आणि ४ व्हिलर असेल तर सर्व गल्लीबोळातून आपल्या गाडीसमोरच्या गाडीतला कसा "माठ" आणि त्याच्यामुळे आपल्याला कसे अडकून राहावे लागते ही बोंबाबोंब करत कट मारण्याचा प्रयत्न... त्यातून मामा नि शिट्टी मारली तर ? अरे थांबतंय कोण ?आला ओरडत मागे तर लायसन्स काढून घेतो... त्याला म्हणायचं सॉरी चुकून झालं.. पुढच्या वेळी नाही तोडणार सिग्नल, म्हणून १०० रु. दंड ऐवजी ५० ची नोट हातात कोंबून लायसन्स खिशात टाकून पुन्हा बुंगाट पसार... !!

असे लोक कमी का आहेत ? पण मी त्यातला नाही बरं का... गाडी हे एक मशीन आहे, ते सोयीसाठी वापरावे, त्याला वेळच्या वेळी औषध पाणी करावे(म्हणजे नंतर खर्च येत नाही) आणि गरज असेल तेव्हाच उपयोगात आणावे हे मला पटते, अर्थात ते पटवून देण्यात बऱ्याचशा अंशी वरील वर्गातील लोकं, किंवा पुण्याचे ट्रॅफिक जबाबदार आहे...

 तर, जुनी सेकंड हँड मारुती विकून मी नवीन गाडी घ्यायच्या विचारात होतो, आय१० किंवा आय २० हा पर्याय मित्रांनी सुचवला, काकांना हे कळले तेव्हा मारुती कशी बेष्ट आहे ह्यावर तासभर आमचे चुलत काका त्यांचे वडील आणि त्यांचे शेजारी ह्यांचे निरूपणं ऐकले, नवीन गाड्या तरी किती येतात हो २ वर्षात... आता म्हणे पोलो गाडी आलिये... तिच फोक्स्वेगनची... आणि शेवर्ले पण बीट काढून चांगलाच गोंधळात टाकत आहे,

काही नातेवाईक तर असे बोलतात की ह्यांना नातेवाईक म्हणू की तऱ्हेवाईक तेच कळतं नाही, म्हणे "राजा, आपण स्वतः गाडी घ्यायची ना.. तर साला मर्सिडिजच आणायची... बाकी गाड्यांची मजा नाही रे... "

"अहो, ३ मर्सिडिज आहेत माझ्याकडे पण त्या चालवायला मला आवडत नाही, एकतर माझी उंची जास्त आहे आणि त्यामध्ये पेट्रोल पण भरपूर मावत नाही ना..." मी विनोदात वेळ मारून नेतो आणि तिथून सटकतो.

(खोटं काय?    मी खोटं सुद्धा बोलत नाही बरं का... खरंच ३ मर्सिडिज आहेत, शो केस मध्ये ठेवल्या आहेत सध्या, पुढील महिन्यात की-चेन ला लावेन... )

टेस्ट ड्राइव्ह ला गेलो की प्रत्येक गाडी पेक्षा हीच गाडी कशी भारी आहे ते समजावून सांगण्याचा सेल्समन आटोकाटं प्रयत्न करतो, बरं त्याच्या त्या प्रयत्नात कंम्पॅरिझन मॉडेल चे न-ऐकलेले छुपे (फ़्लॉज) दोष अधिकच उठावदार वाटतात !!

टेस्ट ड्राइव्ह नंतर लगेचच ICICI चे रिप्रेझेंटीटिव्ह तुमचा ताबा ओढायला लागतात.. की त्यांचे लोन घेऊन कसे फायदे आहेत, आणि त्यावर आकर्षक फ्री गिफ्ट सुद्धा आहे बरं का ! (अरे चोरांनो, व्याजात एक फ्री काय तर बाकिच्यांच्या फ्री दिलेल्याचे पण पैसे वळते करून घेणारात की..  ) बरं गाडी ही चैनीची गोष्ट आहे त्यामुळे ह्याला टॅक्स बेनिफिट शून्यं... (अहो आजकाल लक्ष जात इथे, कालच ७०० ~र~ कापले गेलेत IT च्या नावाखाली!!)

त्यात परत तुमच्या जुन्या गाडीची किंमत २० हजार असते ती त्या क्षणापुरतीच बरं का.. फारतर २ दिवस, मग त्यानंतर आणलीत तर पुन्हा मार्केट प्राईझ कमी होत जाणार हे ते व्हल्युएशन सुपरवाईझर्स ताबडतोब सांगतात(मैत्रीचा सल्ला म्हणून) 

i10, i20, polo, santro,beat, A Star,Wagon R, Vista  इ. इ. गाड्यांच्या टेस्ट राईड घेऊन आलो, सगळे गुण दोषांचे पत्रक मांडून त्यावर पाकीट ठेवले, आणि एकंदरीत परिस्थिती पाहून जुनी गाडी अजून थोडे दिवस चालू शकेल हा निर्णय केला... शेवटी काय हो, ते पहिल्या कॅटेगरीतले लोकं काय आणि आपण काय... शेवटी जरासा आजु-बाजूला...

" ॥ यहाँ चलती को गाडी, कहते है प्यारे... पॉम पाँ पॉम...॥

॥ टूटी फूटी सही.. चल जाये ठीक है... सच्ची झुटी सही... चल जाये ठीक है...--॥"

 गाण्याच्या सुरुवातीची लाइन जरा हळू होते एवढंच बाकी ध्रुवपद आणि शेवट तर सारखाच वाटतो --आपण किती आनंदाने म्हणतोय त्यावर त्याची चाल आणि यमक जुळत जात आपोआप... गाडी जुनी असो वा नवी, जेवढे जमेल तेवढी पॉलिश्ड ठेवायची आणि रोज आरशांत म्हणायचं... एवढी काय खराब झाली नाहीये ही गाडी सुद्धा... !

शेवटी पाकीट सलामत तर गाडी हजार..."    ! आत्ता नाही तर पुढच्या वर्षी... !

बोला गणपती बाप्पा मोरया..   

-

आशुतोष दीक्षित.