द्वैत

अंधारलेली अरुंद गल्ली. दोन चार कुत्री मलूलपणे पडलेली. भुंकण्याचेही त्राण नसलेली. मी एका माडीसमोर उभा. अरुंद जिना आणि वर एक खोली दिसतेय. खिडकीतून बल्बचा रोगट पिवळा प्रकाश अंधारावरच्या डागासारखा पसरलेला. मी एक एक पायरी चढू लागतो. माझ्या पायांचा आणि श्वासाचाच फक्त आवाज. खोलीचं प्लायवूडचं तकलादू दार मी ढकलतो. आत एवढ्याशा जागेत एक खाट आणि त्यावर ती आणि तो, काळा आणि केसाळ. आधी तिचं लक्ष जातं. तिचा चेहरा कसानुसा. त्याच्या लक्षात आल्याबरोबर शिवी हासडून तो अंगावर धावून येतो. माझ्या मुस्कटात मारल्याचं जाणवतं. गालाला झिणझिण्या, डोळ्यात पाणी, कानशीलं तापलेली आणि हात शिवशिवणारे. कुठून तरी माझ्या हातात सुरा येतो. मी त्वेषानं त्याच्या पोटात भोसकतो. त्याची कर्णकटू किंकाळी आणि तोंडावर उष्ण रक्ताचा शिपकारा. मी वळून पळू लागतो पण जिन्यावरून माझा तोल जातो. छातीत धस्स होतं आणि..... मी भसकन उठून बसतो. खोलीत एसी असूनही घामाच्या धारा लागलेल्या. छातीत इतक्या जोरात धडधडतंय की हृदय आतून छातीला धडका देतंय असं वाटावं. बाहेर पाऊस कोसळताना खिडकीतून दिसतं. हे असलं स्वप्न पडायची ही कमीतकमी दहाहजारावी वेळ. पुन्हा ती असुरक्षितता मला घेरते. घशाला प्रचंड कोरड पडते. मी बेडवरून उठतो आणि सगळी दारं-खिडक्या बंद आहेत की नाही ते पाहायला जातो. सगळं बंद असतं. खरं म्हणजे झोपायच्या आधीच मी स्वतःच सगळं बंद केलेलं असतं. वेड्यासारखा मी घरात फिरू लागतो. कपाटात, दारांमागे, पडद्यांमागे, कोचाखाली, माळ्यावर, बाथरुममध्ये आणि अगदी फ्रीजमध्येही कोणी लपलं आहे का ते पाहतो. कोणीही नसतं. मला काहीच कळत नाही. मी थकून जातो आणि मटकन कोचावर बसतो. तिथेच मला झोप लागते.

************************************************************

ऑफिसला जाण्यासाठी मी बसस्टॉपवर उभा असतो. सकाळची कोवळी उन्हे, पाऊस पडून गेल्याने थंड, कुरकुरीत हवा. मला थोडं बरं वाटतं. उगीचच टायची गाठ मी वरखाली करून इकडे तिकडे पाहतो. समोरच्या बिल्डींगमधून एक आकर्षक तरुणी कुत्र्याला घेऊन बाहेर पडते. बसस्टॉपकडे पाहून हात हलवते. मी इकडे तिकडे पाहतो. बसस्टॉपवर आणखी एक-दोनजण असतात पण ते मख्ख. ती रस्ता ओलांडून येते. जशी जशी जवळ येईल तसे तसे तिचे स्मितहास्य रुंदावत जाते. मी मात्र अस्वस्थ.

"हाऽऽऽय, सुमीत! ", चार-पाच फुटावर आल्यावर ती चिवचिवते.

आता अगदी जवळ येऊन ती मला मिठी मारणार असं वाटल्यावर मात्र मी मागं सरकतो. तिच्या पिंगट डोळ्यात प्रश्नचिन्ह. मी अडखळत तिला सांगतो की तिचा गैरसमज झालाय. माझं नाव सुमीत नाही अमित आहे वगैरे. ती खळखळून हसते.

"अच्छा! तूच तो अमित आहेस तर. ", ती मला आपादमस्तक न्याहाळत म्हणते, " सुमीत कुठाय? ".

"कोण... कोण सुमीत? "

तिच्या डोळ्यात करुण भाव उमटतात. "नेव्हर माईंड. आय अॅम सॉरी", ती म्हणते आणि कुत्र्याला घेऊन चालू लागते.

मी बुचकळ्यात. विचार बंद करण्यासाठी बॅग मधून पेपर काढून वाचायला लागतो. नेहमीच्याच बातम्या. राजकारण्यांचा घोडेबाजार, क्रिकेटची मॅच, मोर्चा, शहरात आणखी एक निर्घृण खून वगैरे.

************************************************************

ऑफिसात पोचतो. आत गेल्यावर लगेचच स्वागतकक्षात प्रिया बसलेली दिसते. गार वाटतं. तिचं लक्ष फोनकडे आहे हे बघून तिच्याकडे टक लावून पाहातच आत येतो. बोलता बोलता केस कानामागं टाकणे, मध्येच पेन्सील चावणे, हसणे.. तिच्या अदा पाहून छातीत कळ उमटते. दुसरा कोणी घेऊन जायच्या आत तिला प्रपोज केलं पाहिजे असं मी स्वतःला अब्जाव्यांदा बजावतो. पण तिला साधं गुडमॉर्निंग म्हणायची पण माझी हिंमत होत नाही. तसाच चरफडत जागेवर जाऊन बसतो. दोन तीन तास कामात लक्ष घालण्याचा प्रयत्न करून जेवायला उठतो. पॅंट्रीत जातो. तिथे पिझ्झा, मफिन्स आणि सॉफ्टड्रिंक्स ठेवलेले. मी साठेला विचारतो. "प्रियामॅडमची ट्रीट हाये. साखरपुडा झाला ना त्यांचा", साठे सांगतो. माझ्या पायांखालची जमीनच सरकते. कधी झाला, कोणाशी झाला अशी सहज केल्यासारखी चौकशी करतो पण साठ्याला काहीच माहिती नसतं.

माझी तगमग होते. एक-दोघा कलिग्जना आडून आडून विचारून पाहतो पण फारसं काही हाती लागत नाही. मला अगदी असहाय्य वाटतं. ऑफिस सुटल्यावर पुन्हा तिच्याकडे पाहात पाहात मी घरी जायला निघतो. घरी मी खूप विचार करतो पण काय करावं मला कळत नाही. शेवटी डोकं दुखायला लागतं. मग मी झोपेची गोळी घेऊन झोपतो.

************************************************************

एक दोन आठवडे असेच जातात. झोपेच्या गोळ्या घेतल्याने स्वप्न हल्ली पडत नसतं. शुक्रवारी लवकर काम आटपून मी जायला निघतो तर लिफ्टमध्ये प्रिया. मोबाईलवर कोणाशी तरी गुलुगुलू बोलत असते. माझं डोकं जाम दुखायला लागतं. पंधराव्या मजल्यावरून तळमजल्यावर येईपर्यंत माझी शुद्ध हरपतेय असं वाटतं. मी डोळे मिटून घेतो. किती वेळ गेला ते कळत नाही. डोळे उघडतो तेव्हा मी घरात कोचावर असतो. घड्याळाचे काटे एकावर एक चढून ऊर्ध्व दिशेला. ऑफिसमधून घरी कसा आलो, काय केलं काहीच आठवत नाही. पण आत कुठेतरी शांत वाटत असतं. फार दिवस सापडत नसलेली एखादी गोष्ट सापडल्यासारखं. मी झोपेची गोळी घेतो आणि झोपून जातो.

************************************************************

शनिवार सकाळ. आळसावलेली. दोन दिवस आता कुठेही जायचं नसतं. कोणाशीही संबंध येणार नसतो. मी रिलॅक्स होतो. साफसफाई, कपडे धुणे, स्वयंपाक वगैरे करण्यात दिवस जातो. रात्री गोळी न घेताच छान झोप लागते.

रविवार सकाळ. खूपच आळसावलेली. मस्त पुस्तक वाचत लोळत दिवस घालवतो. रात्री गोळीची आवश्यकता वाटत नाही. दहालाच बेडवर पडतो. उद्या ऑफिस. ऑफिसचा विचार करता करता प्रियाचा विचार येतो. खोल डोहात धोंडा टाकावा तसं होतं. तिला आता प्रपोज करावं की नाही अशा संभ्रमात मी. मला स्वतःचीच फार कणव येते. डोळे पाणावतात. प्रियाच्या भावी नवऱ्याचा राग येतो. त्याचा चश्मा घातलेला गोरा गोमटा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. का हे लोक माझ्या आवडीच्या व्यक्ती माझ्यापासून हिरावून घेतात? मी रडू लागतो. बाहेर कडकडाट होऊन पाऊस कोसळायला लागतो. तशीच साधारण अकरा वाजता झोप लागते. पुन्हा ते स्वप्न. पुन्हा छातीत धस्स होणे. पुन्हा दचकून उठणे. घर धुंडाळणे. धाप लागून कोचावर बसणे. घड्याळात पहाटेचे साडेपाच. आता झोपण्यात अर्थ नसतो. मी तयारीला लागतो. कपड्याना इस्त्री करतो. दाढी करतो. आंघोळीपुर्वी चिखलात घाण झालेले शूज स्वच्छ करून पॉलिश करतो. बाथरूममध्ये पडलेले ओले कपडे धुवायला टाकतो. ओला रेनकोट बाल्कनीत नेऊन टाकतो. दाराजवळचे चिखलाचे ठसे पुसतो.

आंघोळ आणि नाश्ता होईपर्यंत सात वाजतात. मी ऑफिसला जायला निघतो.

************************************************************

ऑफिसमध्ये पोचतो. आत जातो तर प्रिया जागेवर नसते. मी निराश होतो. चरफडत कामाला लागतो. लंचपर्यंत सगळं नॉर्मल. लंचमध्ये पँट्रीत जेवायला बसतो. आजूबाजूला लोक येत जात असतात पण वातावरणात एक प्रकारचा ताण जाणवतो. लोक कुजबुजत असतात. मला काही कळत नाही. जेवण झाल्यावर बाहेर जातो. प्रिया अजूनही आलेली दिसत नाही. मी साठ्याला गाठतो. काय झालं विचारतो.

"तुम्हाला माहिती नाय? प्रियाबाईंच्या भावी नवऱ्याचा खून झाला काल रात्री. भोसकलं म्हणे कोणीतरी. ", साठे सांगतो.