जातिवंत पुरुष ???

काल मला एक गंमतशीर अनुभव आला... खरे पाहता लिहिण्यासारखी खूप मोठी घटना वगैरे नाही... पण तरीही...

काल आम्ही नाशिकला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो... रात्री ११.३० वाजता नीता व्हॉल्वो बस मध्ये आम्ही आरक्षण केले आणि बस मध्ये जागेवर जाऊन बसलो... नाशिक मध्ये आम्ही बसलो त्याच्या पुढच्या स्टॉप वर ११ जणांचा एक समूह बस मध्ये चढला... आमची जागा साधारण बसच्या मध्यावर होती... त्या सर्वांच्या जागा आमच्या मागच्या सीटपासून सुरू होत होत्या... बोलण्यातून ते सर्व जण मिल्ट्री कॅडेटस असावे असे वाटत होते.... त्यांच्यात एक सर पण होते.... त्यातले जे दोघेजण आमच्या मागच्या सीटवर बसले त्यांचे संभाषण जरा जास्तच मोठ्या आवाजात असल्याने आम्हाला अगदीच नीट ऐकू येत होते .... (आम्ही ऐकायचा प्रयत्न करत नव्हतो तरी  ) समजण्यास सोपे होण्यासाठी आपण त्यांना प्रशांत आणि सुशांत अशी नावे देऊया...

सुशांत: काय मग आता जाऊन भेटणार का?

प्रशांत: बघू, पण आता तिला माझ्याशी बोलायचे आहे की नाय काय माहीत...

सुशांत हम्म

प्रशांत: दोन वर्षापूर्वी मला ना तिची भईण भेटली एकदा रस्त्यात.... तेव्हा आमचं अफेयर चालू होतं.... तिची भईण म्हनाली मला शिर्डीला जायचय.. तुम्ही घेऊन चला.... मी बर म्हनलं... तिला पन म्हनलं चल... पण घरी कसं सांगनार... म्हनजे आम्ही फिरायचो पन अस जायच कुटे म्हनजे सांगायला हव ना घरी.... ती नाई येउ शकली... तिची भईन आणि मित्र मैत्रिनी असे ३ बाईक घेऊन आम्ही जाऊन आलो... ती जाम चिडली होती... आल्यावर मला म्हनाली... आता माझीच भईन होती म्हनून ... पन अस पुडच्या वेळी मला घेऊन नाई गेला तर बघा... 

सुशांत मग तू गेलास का तिला घेऊन?

प्रशांत: नाय ... ४ वर्ष झाली आजून नाय घेऊन गेलो

सुशांत मग आता किती वर्षांनी भेटणार?

प्रशांत: हा... म्हंजे आता ऍनिवर्सरी येतेय ना तेवा SMS करेन.... की मला तुला गिफ्ट द्यायचंय वगैरे मग बघू काय म्हणतेय.... तिचे आई बाबा आम्हाला भेटू देत नाहीत.... २ वर्ष होतील लग्नाला तेवापासून नाई भेटलो

असे म्हणत म्हणत क्षणात तो हमसून हमसून रडायला लागला.... अगदी ओक्साबोक्शी रडत होता.... सुशांत त्याला खूप समजावायचा प्रयत्न करत होता...

मलापण मनातून वाईट वाटत होते... म्हणजे मला पार्श्वभूमी काही माहीत नव्हती तरी त्याच्या बायकोला आणि त्याला भेटू देत नाहीत, ऍनिवर्सरीला तो तिला SMS करून विचारणार.... वगैरे....  बिचारा.... वेगळे कशाने झाले माहीत नाही पण तो एवढा रडतोय... म्हणजे त्याचं केवढं प्रेम आहे बायकोवर....

त्याचा रडण्याचा आवाज जस जसा वाढू लागला तशी त्याच्या रडण्याची बातमी शेवटपर्यंत बसलेल्या सगळ्या सोबतच्यांपर्यंत गेली... एक एक करत प्रत्येकाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला... आणि मग त्यांचे सर उठले....

सरः ए पश्या काय असा काय रडतोस.... पुरुषासारखा पुरुष तू ... आणि रडतोस काय? तुझं हे नेहमीचं झालाय.... सारखी सारखी तिची आठवण काढून रडत बसतोस.... विसरून जा सगळं

(मी मनात.... बायकोच्या विरहाने इतका रडणारा पुरुष मी पहिल्यांदा पाहिला आयुष्यात.... )

प्रशांत: पण सर ते असं विसरता नाय येत....

सरः अरे नाय कसं येत.... अरे तुझ्या घरी आई बाबा आहेत... एक बायको आहे...

(मी मनात.... .....   बायको आहे....? मग हा कोणासाठी रडतोय? काय चाल्लंय?)

सरः जरा घरच्यांचा विचार कर... एका पोरीसाठी कशाला इतका विचार करायचा?

(मी मनात.... अरे बापरे... म्हणजे हे सगळं बायको साठी नाही तर वेगळ्याच मुलीसाठी चाल्लय तर....  प्रेमभंग.... आणि आता लग्नाला दोन वर्षं होत आली तरी हा गेला की तिला भेटणार.... ऍनिवर्सरीचं गिफ्ट द्यायला? बरोबर आहे... तिचे आई वडिल कसे काय भेटू देतील?)

सरः चल डोळे पूस आणि विसरून जा आता.... एका पोरीसाठी एवढ?? अशा छप्पन पोरी भेटतील तुला.... लक्षात ठेव.... तू एक जातिवंत पुरुष आहेस.... काय ???? जातिवंत पुरुष....

इथे माझ्या विचारांची दिशा बदलली.... मला सर्वप्रथम त्याच्या विचारपद्धतीची कीव आली.... कसेतरीच वाटले.... घरी बायको आहे.... आणि हा कोणत्या त्या मुलीचा विचार करतोय.... मग तिच्याशीच लग्न करायचं होतं.... आणि तिच्याशी करू शकत नव्हता तर कोणाशीच करायचं नव्हतं... आणि आता केलेच आहे लग्न तर त्या मुलीला विसरायलाच हवे....  आणि हे सर तरी कशा टोन मध्ये बोलताहेत.... स्त्रियांना कस्पटासमान मानून... अजून एक ....

जातिवंत पुरुष ही कल्पना/ संकल्पना/ शब्दप्रयोग मी पहिल्यांदाच ऐकला ... सर्वसामान्यपणे मी तरी फक्त प्राण्यांच्या बाबतीतच ऐकला आहे.... घोडा वगैरे.... आणि जातिवंत पुरुष म्हणजे अजून वेगळं काय???? पुरुष हा पुरुष च.... जो जन्माने पुरुषाचा/ मुलाचा देह घेऊन जन्माला आला तो पुरुषासारखा पुरुष.... मग जातिवंत आणि अजातीवंत असा भेद म्हणजे काय असणार?

मनातले विचार आणि कंफ्युजन खूप वाढत होतं .... मी डोळे मिटून घेतले आणि झोपायचा प्रयत्न करू लागले... माझ्या डोळ्यासमोर चित्र तरळत होतं.... जातिवंत घोड्यावर बसून रपेट करण्यास निघालेला घोडेस्वार आणि शेजारीच घोडेस्वाराच्या थाटात... जातिवंत पुरुषाच्या पाठीवर आरूढ होऊन निघालेले सर....