भारतातल्या आरोग्य पर्यटनातील धोका : प्रतिजैवप्रतिकारी जंतूंचा संसर्ग?

ह्या भयंकर संसर्गाचे नाव अहे एनडीएम-१ (न्यू दिल्ली मेटॅलो-लॅक्टामेझ). भयंकर म्हणायचे अशासाठी की, तो शेवटचा उपाय म्हणून वापरल्या जाणाऱ्या प्रतिजैवांनाही दाद देत नाही. ऑगस्ट ते नोव्हेबर दरम्यान तपासलेल्या २४ घटनांपैकी २२ घटनांमध्ये हा संसर्ग झाल्याचे दिसले असे भारतीय संशोधकांनी मार्चमध्ये म्हटले आहे. हा संसर्ग समाजात पसरण्याची भीतीही आहे. भारतात उपचार चालू असणाऱ्यांना ह्याचा धोका असल्याने वैद्यकीय पर्यटनावर ह्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.

लॅन्सेट ह्या वैद्यकीय प्रकाशनात प्रकाशित झालेल्या अशाच प्रकारच्या एका ब्रिटीश अभ्यासनिष्कर्षावर आधारित दाव्याला भारतीय आरोग्य मंत्रालयाने फेटाळून लावले आहे. भारतात उत्कर्षित होत असणाऱ्या आरोग्य पर्यटनाविरुद्ध भीती पसरवून ते अडचणीत आणण्यासाठी रचलेले हे कारस्थान असल्याचे राजनीतिज्ञांनी म्हटले आहे. मात्र मुंबईत हिंदुजा रूग्णालयात संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या चमूने वरील (२४ पैकी २२ घटना) ही धोकादायक बाब असल्याचे जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया मध्ये म्हटलेले आहे.

भारतात उपचारासाठी गेलेल्या ३ व्यक्तींना असा संसर्ग झाल्याचे आणि हे हिमनगाचे केवळ टोक असून जागतिक स्तरावर फैलाव होण्याचा धोका असल्याचे ऑस्ट्रेलियातील एका संसर्गरोगतज्ज्ञाने म्हटले आहे.

भारतीय वैद्यकीय अधिकारी हे नकाराच्या पवित्र्यात असल्याचे डॉ. के अब्दुल गफूर ह्या चेन्नईतील संसर्गरोग सल्लागाराने म्हटले आहे. 'जगातला कुठलाच देश ह्या संसर्गाविरुद्ध प्रतिक्षम नसला तरी जेथे प्रतिजैवोपचारावर प्रभावी नियंत्रण नाही अशा भारतासारख्या ठिकाणी ही समस्या अधिक तीव्र होते. भारतातल्या जवळ जवळ सर्व मोठ्या रुग्णालयांतून ह्या जंतूच्या फैलावाचा आढळ आहे पण ह्याविषयी मर्यादित विदा उपलब्ध आहे. थोड्याच डॉक्टरांना या जंतूच्या फैलावाचे भान असावे. जबाबदार अधिकाऱ्यांनी केवळ अर्हताप्राप्त लोकांनाच प्रतिजैवोपचाराची परवानगी द्यावी, आणि त्यावर लक्ष ठेवावे.' असे डॉ. गफूर ह्यांनी म्हटले आहे.

नेहमीप्रमाणेच मी ही माहिती फिजऑर्गच्या ह्या पानावर वाचून माझ्या आकलनशक्तीप्रमाणे मराठीत थोडक्यात सांगितलेली आहे. चू. भू. द्या. घ्या.