स्वातंत्र्यदिनाचा...

स्वतःच्या तंत्राचा अवलंब करुन इतरांना पारतंत्र्याची हवा खाऊ देण्याची सोय
म्हणजे स्वातंत्र्य!
देश स्वतंत्र झाला. साठीच्या घरात पोचला. परंतु
लोकांचं राज्य अजूनतरी स्वप्नच ठरलंय. लोकशाही अस्तित्वात आली म्हणजे
स्वतंत्रता नव्हे.
लोकशाहीच्या तंबूलाच भ्रष्टाचाराचा बांबू आधार देऊन
दिमाखात उभाय. एकेका मताला कितीतरी महत्त्व आलंय, आणि त्यामुळेच लालची
मतदारराजा एका क्षणिक मोहापायी आपले मतदानाचे स्वातंत्र्य विकून टाकतो.
मताच्या प्रत्येक बटनाला नेता अमूक तमूक रक्कम अदा करीत असतो. हे सर्वश्रुत
उघड गुपित आहे. अशी ठराविक संख्येची बटने विकत घेतली की खुर्ची फिक्स! मग
अशा विकतच्या खुर्चीवरचे नेते साधा सरळ पारदर्शी व्यवहार करतील? मुळीच
नाही. कोणत्याही क्षुल्लक कामाला रेटून पैसा मागितला जातो. नेत्याच्या
कारकिर्दीची पहिली दोन वर्षे झालेला खर्च वसूल करण्यात जातात, त्यानंतरची
दोन वर्षे आगामी खर्चाची तजवीज करण्यात जातात आणि राहिलेले एक वर्ष मंजूर
निधीतून लोकोपयोगी (दिखाऊ) कामे अर्धवट ठेवण्यात जाते. पुन्हा नव्या दमाने
मते मागायला, पैसे वाटायला हा मोकळा. एकंदर काय तर ज्यांच्याकडे पोत्यांनी
पैसा साठलेला आहे त्यांनीच निवडणूक लढवावी. आपल्या सारख्या गोरगरिबांचं ते
काम नव्हे...
त्याची तरी काय चूक आहे म्हणा. त्याला पक्षाच्या
उमेद्वारीचे तिकीटही 'पेटी' सरकावूनच मिळवावे लागते. त्यानंतरही मतांच्या
राजकारणासाठी लाखोँची रास पालथी घालावी लागते. तेव्हाच खुर्ची आवाक्यात
येते. म्हणूनच त्याला त्या पाच वर्षाँत पाहिजे तसे यथेच्छ वागायला मिळते.
अशाप्रकारे लोकशाहीच्या रक्षकांनीच प्रत्येकाच्या स्वातंत्र्याला सुरूंग
लावलाय...
डोनेशन भरल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. लाचेचे पुडके
फेकल्याशिवाय नोकरी लागत नाही. एकूणच सगळीकडे भ्रष्टाचार हाच शिष्टाचार
बनलाय.
स्वतंत्र भारताचा नागरिक खरोखर स्वतंत्र आहे? पक्षाचा कितीही
सच्चा कार्यकर्ता असला तरी हायकमांडच्या परवानगी शिवाय किँवा
पक्षश्रेष्ठीच्या चमच्यांची मर्जी सांभाळल्याशिवाय कोणतेच काम होत नसते.
लाचखोरीची ही कीड सर्वच क्षेत्रात फोफावलीय. स्वतंत्र भारताची हीच एक मोठी
शोकांतिका आहे.
समाजजीवन तरी कोठे स्वतंत्रपणे जगता येतेय? गल्लीतल्या
मंडळाच्या कार्यकर्त्यांची अरेरावी
सहन करून ते म्हणतील ती वर्गणी
द्यावी लागतेच ना? गावगुंडांच्या तावडीतून प्रत्येकजण एकदा तरी गेला आहेच
ना? बॉसची बॉसगिरी कर्मचाऱ्‍यांना सोसावी लागतेच ना? कोणीतरी मुक्त आहे का?
हरेकाला कशा ना कशाचा जाच असतोच. जाताजाता हळूच जात जाणून घेतली जातेच ना?
मतांच्या राजकारणात जातीचा पाश नरडीभोवती आवळला जातोच ना? आणि यातील एकाही
कस्टडीची हवा खाल्ली नसली तरी घरातले साखळदंड कोणाला चुकलेत? कोणती स्त्री
पुरुषाच्या कचाट्यातून मुक्त होऊन मोकळा श्वास घेतांना दिसते? किँवा कोणता
नवरा बायकोची नजरकैद भेदून स्वच्छंदपणे शीळ घालतोय? कोणीच नाही! म्हणजे
प्रत्येकजण पारतंत्र्यात आहे...
आणि तरीसुद्धा पंधरा ऑगस्टची ऑफिशीयल
सुट्टी मौजमजेत जावी यासाठी चौकातल्या तिरंग्याला सलाम ठोकून तुम्ही आम्ही
स्वतंत्र असलेल्या बेंबीच्या देठापासून ओरडून घेतो-
'स्वातंत्र्यदिनाचा
विजय असो.'