विमुक्त-१

विमुक्त-१

निहारचा कॉल बघून विशालने आनंदाने उडी मारली.  पुढच्याच मिनिटाला निहारने पार्टीचे सगळे डिटेल्स विशालला एस एम एस केले होते.  पाचव्या मिनिटाला बाईक काढून विशाल निघालाही.  विशाल, निहार आणि त्याचे मित्रमैत्रिणी उगीच गाजावाजा न करता आपापले काम करत.  एकमेकांना ऐनवेळी फोन किंवा एस एम एस करून  पार्टीला बोलावत. त्यात त्यांना कमीपणा वाटत नसे.  अगदी साध्या अनौपचारिक पार्ट्यात जसे ते जात असत तसेच अगदी सिलेक्टेड लोकांच्या पार्टीचेही निमंत्रण त्यांना असे.  पण अशा पार्टीला जाण्याऐवजी कुठेतरी फिरायला जायचे, बारमध्ये निवांतपणे संगीत ऐकायचे ,पीत बसातचे, थिएटरमध्ये सिनेमा वा नाटक पहायला जायचे . जे काही त्या क्षणी मनात येईल ते करणारे हीच त्यांची खरी ओळख होती.

 असाच एकदा वाद झाला. भांडण वाढले तेव्हा तेव्हा  सारिका म्हणाली होती, "बघाव तेव्हा पार्टी करत असतोस. कभी लाईफ के बारे मे सोचो! "
विशाल हसला होता.
 "लाईफ? हेच तर लाईफ आहे. हेच तर वय आहे पार्ट्यांचे. "
"सोचा है कभी ? काय  करत असतोस नेहमी? पटला तोवर जॉब केला. सुटला तर सुटला. नवा मिळेल तेव्हा मिळेल. मिळाला तरी ठीक नाही तरी ठीक.  तू आणि निहार काहीही काम करायला तयार असता.  तू सिनेमे बघत आणि पीत बसला नाहीस तर क्लबमध्ये नाचतोस. . कोणाकडे तरी अजून रिलिज न झालेल्या सिनेमाची पायरेटेड कॉपी बघतो्स . निहारने म्हटले तर  कधी ब्ल्यू फिल्म  किंवा एकोणीसशे साठ सत्तरमधले एखाद्या सिनेमातले कातरलेले शॉट्स बघतोस. आणखी कुणी रेकमेन्ड केले तर  मास्टरबेट करणारे सैनिक, काळ्या गोर्‍या मुली, जे कुणी सांगेल ते बघतोस. काही लिमिट आहे की नाही? तुझी काही आवडनिवड आहे की नाही? "
"मला ते आवडत म्हणून करतो आणि समजा कुणी म्हटल हे पाहा, हे तुला आवडेल तर इजन्ट इट इझी? , सोचने का, ढुंडने का टाइम तो बचता है ऐसे रेकमेंडेशनसे.  आणि स्वत: काही करायला गेलो , ते आवडले नाही, पटले नाही याचे फ्रस्ट्रेशन पण"
"सगळ इझी आणि विन विन अस पाहिजे तुला"
"काय चुकत आहे माझ? ये मेरी फिलॉसोफी है"
"मजा मारायला वेळ आहे आणि पैसा आहे असे वाटत असेल तर दे त्यातले दुसऱ्याला. तसे जर नसेल तर अरे, बी सिरियस अबाउट युवर करियर , युवर लाइफ. "
"९ ते ५ रोज ऒफिसात जायच, काम करायच आणि स्ट्रेस येतो म्हणून स्ट्रेज मॅनेजमेंट शिकायची, लोकांना शिकवायची.  पैसे भरून आणि पैसा घेऊन! काही अर्थ आहे का त्याला? तुझ्या त्या ग्रूपला तरी काही अर्थ आहे का? काय तर प्रार्थना म्हणा, एकमेकांशी बोला , सोशलायझेशन करा. हे सगळ ओढून ताणून असत, शिवाय स्वत:च्या स्वार्थासाठी असत.  ही तुझी डेफिनेशन आहे आयुष्याची!
"तुझ्यासारख नशेत असण्यापेक्षा तरी बर"
"अपने बारे मे सोच, माझे वागणे नसेल आवडत तर जा तू " विशाल बडबडला होता.

"माझ्या आई बापाचे कधी ऐकले नाही मी. मग कोणाचे किती आणि कशाला म्हणून ऐकायचे ? काय करेल? जाईल सोडून आपल्याला ही" विशालला आठवले की पहिला ब्रेकअप त्याच्या मनाला टॉचला होता. त्याचवेळी त्याला बारमधे निहार भेटला होता. काही घडलेच नाही असे मानून नव्याच्या शोधात जा असे म्हणाला होता. त्यानेच कुठलीशी पार्टी अरेंज केली होती त्यामधे घेऊन गेला होता.  त्यानंतर विशाल निर्ढावला होता. किती मुली, किती काळ असा हिशोबही त्याने थांबवला होता. लपवालपवी, खोटेपणा विशालला आवडत नसे, जमत नसे. हे कारण होते म्हणूनच रिलेशन सुरु करण्याआधी सारिकालाही त्याने त्याच्या अशा आयुष्याची , वागण्याची माहिती दिली होती.  सारिकाने ते मान्यही केले होते. सुरुवातीला सगळे "ऒल वेल" वाटले होते.  अखेर सहा महिन्यांनी शेवट व्हायचा तोच झाला होता. ब्रेकअप.. आणखी काय.

तेवढ एक बर होत, सारिकाशी ब्रेकअप झाला म्हणून त्याला तिच्या वस्तू परत कराव्या लागणार नव्हत्या किंवा तिने काही भेटी दिलेल्या टाकून द्याव्या लागणार नव्हत्या. इतर मुलींनी . त्यांना जे काही आवडत त्याच ब्रँडचे कपडे विशालकडून घेतले होते. त्याच्या आवडीनिवडी बदलायचा प्रयत्न केला होता.  कुठला तरी शर्ट , कुठलतरी जिन्स, याच ब्रॅन्डचा टाय तुला छान दिसतो म्हणत त्याला भेटी दिल्या होत्या. ब्रेकअपनंतर त्यांनी दिलेल्या वस्तू विशालने कधी उसासत तर कधी निर्विकारपणे टाकून दिल्या होत्या.

" हक्क सांगतात या पोरी. हाऊ पझेसिव्ह दे कॅन बी .आय थॉट शी वॉज ओके विथ ऒल धिस. ओके विथ माय वे ऒफ लाइफ"
"ये सब शुरू शुरू मे फिर दे ऒल आर सेम"  निहार त्याला म्हणाला होता .
" नाराज होऊ नकोस. तू पुन्हा देवदास होणार आहेस का? इसलिए ये कम से कम कमिटमेंटवाली लिव्ह इन ही ठीक है. नही बनती तो बात खतम. कुणाला फार जीव लावायचा नाही. चार दिवस मजा करायची ,आपला फायदा पहायचा आणि पुढे जायच "
तो तसा पुढे गेला पण मग सगळे संपलेच होते.

विशाल फेसबुकवरचे जुने फोटो बघत होता. कधी त्याचा मिठीत असणारी ,कधी बिलगून उभी असलेली सारिका आणि कधी टाचा उंचावून विशालच्या ओठांवर ओठ टेकवणारी सारिका त्या फोटोंमधे होती.  ते बघितल्यावर विशालचा मूड गेला. गेल्या आठ महिन्यात चार पोरी आल्या, गेल्या , त्याला काही थ्रील वाटले नव्हते. जसे त्या आल्याचा आनंद फार नव्हता तसे त्या गेल्याचे दु:ख तर तसुभरही नव्हते. ठराविक काळापुरती दोघांची सोय झाली होती.

त्याने आणि निहारने आपापल्या फेसबुकात  अनेक मुली, अनेक पार्ट्य़ांचे फोटो ठेवले होते. त्याने निहारच्या फेसबुकावर नजर टाकली. तिथे फोटोत असणारे सगळे उच्च मध्यमवर्गीय किंवा मध्यमवर्गीय- त्यासारखे फ्रीलांसर आणि आयुष्य स्वत;च्या इच्छेनुसार जगणारे.
प्रोफाइल फोटॉतच कुठल्यातरी नव्या, अपरिचित ब्रॅन्डची बिकिनी घालून असलेली मिनाक्षी आणि मासोळीच्या आकाराचा ग्लास हातात असलेला निहार होता. विशालला वाटायच, चाळीशीला आलेली मिनाक्षी काय देणार याला? पण तिच्या हातात चांगला जॉब आणि घर दोन्ही होत. आपल्या मित्राला पोसायची आणि स्वातंत्र्य द्यायची तिची तयारी होती. कॉल सेंटरपासून , हॉटेल मॅनेजर, वेटर ते बारटेंडर असा कोणताही जॊब निहारने केला किंवा सोडला. पण मिनाक्षीच्या कमरेभोवती त्याचा हात मात्र प्रत्येक फोटोत दिसत होता. बदलत होता फक्त ग्लासचा आकार , दारूचा ब्रॅन्ड, कपड्यांचा आणि परफ्यूमचा ब्रॅन्ड.
 अशी स्पेस आपल्याला मिळाली तर.. विशालला स्वत:ची लाज वाटली. त्याला स्वत:च्या विचारांची कीव आली.  मिनाक्षीबद्दल कधीच त्याला आकर्षण वाटले नव्हते.  आकर्षण होत ते तिच्या वागण्याचे. सारिका आणि मिनाक्षी.. दोघीही खंबीर, आपापल्या भूमिकेवर ठाम असणाऱ्या; पण दोन वेगळ्या विचारसरणीच्या. आपल्याला कुणा एकीचे वागणे पटत नाही. त्याही आपल्यासारख्या  मध्यमवर्गीय कुटुंबांतून आलेल्या, त्याच चौकटी झुगारणाऱ्या. ---
ज्या वेगाने विचार चालू होते त्याच वेगाने त्याची बाईक रस्ता कापत होती. रस्त्यावरच्या खाणाखुणा बघून ’मिनाक्षीचे घर येईलच’ असे पुटपुटत विशालने हातातली सिगरेट रस्त्यावर टाकली.  तीस किलोमीटर झाले सुद्धा एवढ्यात ? विशालने बाईक स्टॅन्डला लावली . आपल्या केसावरून हात फिरवला, चष्मा नीट करून तो दारासमोर उभा राहिला.

 त्याने मिनाक्षीच्या दारावरची बेल वाजवली तेव्हा एका अनोळखी माणसाने दार उघडले, विशालचा पोशाख पाहून त्याला आत घेतले. 
"हा कॅमेरा, हवे तेवढे फोटो काढ. सगळी लोक कशी पार्टी एन्जॉय करतात ते कळू दे इतरांना "  आत आल्या आल्या
 आपला कॅमेरा विशालच्या स्वाधीन करत निहार म्हणाला.
 घरात वीसएक माणसे दिसत होती. बरीच अनोळखी होती. अर्थात कुणीही दिसले असते तरी त्याने त्याला काही फार फरक पडणार नव्हता. अगदी सारिका दिसली तरी!
तिचा विचार आला तसा विशालने तो झटकूनही टाकला. अनोळखी माणसे खर अपेक्षितच होती कारण ती मिनाक्षीची पार्टी होती. ती कुठून एवढ्या ऒळखी करते आणि माणसे जमवते याचे त्याला आश्चर्य वाटे.  मार्गारिटा पिता पिता  वेगवेगळ्या परफ्यूमच्या वासाने त्याचे डोके भणभणू लागले होते म्हणून की काय विशालला पोटतल्या भुकेची जाणिव झाली.  इतका वेळ त्याने खाद्यपदार्थांकडे बघितलेसुद्धा नव्हते. तो फोटो काढत होता त्यादरम्यान मिनाक्षीने नेहमीप्रमाणे आपल्या एकदोन मैत्रिणींची त्याच्याशी ओळखही करून दिली होती.  विशालला त्या दोघीतही काही विशेष दिसले नव्हते. सहसा असे होत नसे पण आज कुणी क्लिकच झाले नाही.’ बिग डील!"म्हणत त्याने त्याचा विचार सोडून दिला आणि जरा दूरच राहणे पसंत केले होते. विशालच्या हातात कॅमेरा होता हे बरेच होते.

"व्हेज नॉन व्हेज दोनो भी मोरोक्कन है" बुफे टेबलाशी उभ्या असणाऱ्या दोन मुलांनी उत्तर दिले.
'म्हणजे नेहमीप्रमाणे' असे विशाल मनातल्या मनात म्हणाला . मिनाक्षीच्या पार्ट्यांचे वैशिष्टयच म्हणजे  एका प्रकारचे जेवण ,  खास पोशाख आणि  हवे ते प्यायची सोय आणि मुभा असायची. काहीतरी निराळे ,अगदी विचित्र असे थीम घ्यायची अनेकदा मिनाक्षी. ’ऐन उन्हाळ्यात इमाजिन यू आर इन जम्मु काश्मीर", ’तुम्ही जंगलात हरवले आहात" ’आपण सगळे १८७५ मध्ये आहोत" असले काहीतरी. पार्टीला येणाऱ्यांना ती त्यानुसार ड्रेस घालायला सांगायची. लोकांनाही या सर्व प्रकाराचे आकर्षण वाटे. विशालला हा सर्व मूर्खपणा वाटायचा, काहीसा बालीशपणा सुद्धा. त्याने मिनाक्षीला तसे सांगितले होते एक दोनदा. तिने विशालचे बोलणे हासून सोडून दिले होते.

खुसखुस, लिंबाचे लोणचे , सॅलड आणि लॅम्बचे पिसेस विशालने प्लेटमधे वाढून घेतले . चमचमीत रश्श्यात आलूबुखार आणि जर्दाळू ? त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. पण एक घास तोंडात टाकल्यावरच त्याने त्याने मनापासून दाद दिली.  मघापासून त्याच्या आजूबाजूला एक माणूस घुटमळत होता. तो आता विशालच्या शेजारीच बसला.  खाण्याच्या नादात विशालने हे कळूनही न कळल्यासारखे दाखवले. शेवटी फार झाले तेव्हा एवढे दुर्लक्ष करूनही "माझा टाईप वेगळा आहे कसे कळत नाही त्याला" विशाल बडबडला . त्या माणसाला खडसावून सांगावे की नाही यावर विशाल विचार करत होता. तेवढ्यात  मिनाक्षी हातात एक ड्रिंक घेऊन विशालकडे आली. ग्लास त्याच्या हवाली करुन आणि  त्याच्या गळ्यातला कॅमेरा घेऊन ती गेली सुद्धा. जातांना शेजारच्या माणसाकडे आणि विशालकडे बघून तिने एक इशारा मात्र केला.  फिकट गुलाबी जांभळ्या प्रकाशात , मोरोक्कन संगीताबरोबर ड्रिंकचा प्रभाव वातावरणात पसरू लागला होता. जोडीजोडीने एकमेकांना बिलगून जोडपी मधूनच दिसेनाशी झाली.
विशालचे जेवण संपत आले होते तेव्हा खोलीत दुसऱ्या  कोपऱ्यात बसलेल्या निहारच्या गप्पा रंगल्या होत्या.  दोनचार तरूण मुलामुलींशी तो बोलत होता. नव्या मुव्हीबद्दल सांगत होता, नव्या हॉटेलची माहिती देत होता. या सर्व गोष्टी केल्या नाहीत तर कसे कळणार काय चांगले?हा त्याचा युक्तिवाद होता.  शिवाय एवढसे करून जर काही फायदाच होणार असेल तर ते नाकारणारा किती मूर्ख हे सुद्धा मनावर ठसवत होता. निहारचे वर्णन करण्याचे कसब असे होते की त्या मुलामुलींना भुरळ पडली होती. विशालची आणि निहारची ओळख बारमधे  एका पार्टीत झाली होती हे विशालला प्रकर्षाने पुन्हा आठवले. त्यावेळी सुद्धा असाच हातातला ग्लास उंचावून निहार बोलत होता.
"अभी नही तो कब?  आयुष्य जगण्याकरताच आहे. बास्स हॅव फन.  मोअर आणि मोअर फन. चिअर्स! "

विशालला आता जवळ जवळ सगळी निहारची वाक्ये पाठ झाली होती. तिथे असलेल्या माणसांची नावे बदलायची हाच काय तो थोडा फार बदल असायचा. एखाद्या सराईत सेल्समनसारख बोलायचा निहार. तसाच हसरा चेहरा करून.
 पैसा असला तरच जगण सोप आहे ते विशालला माहिती होत. तो पैसा मिळवायला काय करायच याच निहारच तत्त्व मात्र त्याला पटल नव्हत.
"विशाल, तू सोचता रहेगा यह ठीक है या नही , एथिकल है या नही, लोग तेरेसे आगे निकल जाएंगे. "
"अगर कोई फ्रीमे जहर देंगा तो क्या वो भी चलेगा? तू उस जहर की तारीफ करेगा क्या? "
"ये ऐसी बेकार बाते करनेका शौक है तुम्हे, पर हिंमत नही है कुछ नया आजमानेकी, मिडलक्लास मेंटालिटी से कब निकलेगा?"
"एथिक्स सभी लोगोको होते है. तू दिखाना चाहता है तू मिडलक्लास नही इसलिए कुछ भी करेगा क्या? सगळे सारखेच वागतात.  मिंधेपणा, चमचेगिरी, लागटपणा ,खोटेपणा किती करायचा, किती स्वार्थी व्हायच याची प्रत्येकाची लिमिट असते यार ..."  एकदा त्याने निहारला म्हटल होत.
त्यावर निहार हासला होता, "मेरे साथ रह जा ,तू एक दिन तो पुरा बदलेगा. कॉन्फिडन्स कोई चीज है. मी जे करतो ते नेहमी सक्सेस्फुल होत. "

या सस्केसवरून विशालला सारिकाचे बोलणे आठवले.
"निहार तुम्हे अपना सर्वंट समझता है, उसे पता है की यू विल डू एव्हरीथिंग फॉर हिम"
"मी त्याचा नोकर नाही, मित्र आहे, "
"मित्राचे एक म्हणणे मान्य केले का त्याने?"
"आर यू जेलस ऒफ हिम? की मिनाक्षीचा हेवा करतेस, उन्हे सक्सेस मिलता है इसलिए"
"सक्सेस ? वह जो करता है वह है सक्सेस? और है भी  तो ऎट व्हॉट कॉस्ट? अरे निहार ने तो अपनेआप को बेच दिया है, ही हॅस सोल्ड हिज सोल. तुला पण विकेल तो आणि  हे जेव्हा तुला कळेल ना विशाल, तेव्हा उशीर झाला असेल"

काही असो निहार वॉज पॉप्युलर. त्याच्या बोलण्यात, त्याच्या बढाईतही तथ्य होत. जे करायचा ते कॉन्फिडन्सने. हजरजबाबी होता. निहारने केस रंगवले होते. त्याने काळ्या केसांमधे एक करडा रंगाचा केसाचा एक पट्टा ठेवलेला दिसत होता. कुठल्याशा जेलने त्याने केस नीटनेटके केले होते. डोळे काळेभोर आणि बोलके होते. अगदी समोरच्या मनात खोलवर शिरणारे. . त्याचा रंगही विशालसारखाच सावळा होता,उंची साधारण पाच दहा असेल. पण सगळी जादू त्याच्या आवाजात होती, बोलण्यात होती.

 निहारची स्टाईलच अजब होती.  लोक जिथे बिअर पिणारे असतील तिथे हा ठराविक फेमस ब्रॅन्ड न नेता कुठलीतरी अपरिचित ब्रॅण्ड्ची विस्की न्यायचा.  त्यातल्या अर्ध्याहून अधिकांना ती प्यायला लावायचा. लोकांच्या मनाचा त्याला अंदाज होता. कुठला माणूस कुठल्या एखाद्या वेळी कसा वागेल ते त्याला बरोबर कळायच.  आम्ही करतो ते चांगले किंबहुना आम्ही बघितले म्हणून त्याला चांगले म्हणायला लागतील लोक असे तो अभिमानाने सांगायचा.  अनेकदा प्रवाहाविरुद्ध वागूनही तो जिंकायचा. विशालनेही असे प्रवाहाविरुद्ध वागण्याचा प्रयत्न केला. मुद्दाम मिनाक्षीच्या पार्ट्यांना तो मनाला आले ते कपडे करून गेला.. तिने सांगितलेला ड्रेसकोड न पाळता. पण त्याला काही ते जमले नव्हत. सगळ्यांनी त्याची टिंगल केली.
हे सर्व आठवले अन विशालचे तोंड कडवट झाले. आपल्याला ते शक्य नाही. निहार कॅन डू इट. 
विशाल एकदा ऒफिसमधल्या सहकाऱ्याशी, रोहनशी बोलत होता.
 "एक नशा असते निहारबरोबर असण्यात. तो म्हणेल ती फॅशन आणि तो करेल ती पूर्वदिशा..  जोवर इतरांना निहारच्या ग्रुपचे सिक्रेट, नवीन ट्रेंड कळतात तोवर निहारने नविन काही शोधलेले  असते.  कुठल्याही गोष्टीत फार काळ त्याच मन रमत नाही.  मग ते नाटक, सिनेमा, एखादा पब असो वा  क्लब असो की नवा मित्रमैत्रीण. नव्याच्या शोधात जुन्या गोष्टींचा शोक करायचा असतो याला थाराच नाही. नविन काय असेल त्यामध्ये स्वतःला गुरफटून घ्यायच. बास्स!.  "
पार्टी म्हटली की  निहार ,विशाल आणि मिनाक्षी एकत्र येत.  निहार आणि विशालच्या ब्लॉगवर काही वाचले, त्यांच्या फेसबुकातले , ब्लॉगवरचे काही फोटो बघितले की एकच कल्ला व्हायचा. ते सौंदर्य टिपायला बाकी सर्व आसुसलेले असायचे. एकीकडे लोकांची अशी स्पर्धा सुरु असायची पण त्याचवेळी निहारचे नवे प्रोजेक्ट सुरू झालेले असे.
निहार कुठे राहतो, काय काम करतो, त्याचे ऒफिस कुठे आहे, असे अनेक प्रश्न त्याला प्रथम भेटणाऱ्यांच्या मनात असत. पण निहारच्या बोलण्यात हे सर्व मागे पडे. त्याचा मोठ्ठा बंगला आहे, स्वत:च ऒफिस आहे, त्याच्याकडे मर्सिडीज आहे अशा अनेक बातम्या वर्तूळात तयार होत ,पसरत.  विशाल निहार नेहमी भेटला होता तो पार्टीत किंवा मिनाक्षीकडे. या कंपनीत जायचे आहे , बाहेरगावी जायचे आहे अशी उत्तरे निहार देई. त्यामुळे हे सगळ्या प्रश्नांचे खात्रीलायक उत्तर मिळत नसे. मग जगात जे काही म्हणून भव्य, उदात्त, हवेहवेसे आहे ते सर्व असणारा म्हणजे निहार असे मित्रांना वाटू लागे.

जुन्या आठवणी किती दूर ढकलल्या तरी येतच राहिल्या. त्यातच विशालची तंद्री लागली . तो माणूस त्याच्या शेजारी येवून बसला याचा विशालला पत्ताच नव्हता.  त्या माणसाच्या सलगीची जशी विशालला जाणीव झाली तशी त्या स्पर्शाने त्याला शिसारी आली. तोंडाला येतील त्या शिव्या त्याने त्या माणसाला ऐकवल्या.
"क्या समझता है अपने आप कॉ?तुझ्यासारखा वाटलो का मी?"
"मिनाक्षी सेड इट विल वर्क फ़ायनली. तू ओपन मांडेड आहेस. तू एकटा आहेस सध्या. यू नीड कंपनी.  तुला चालेल म्हणाली ती.  म्हणून. "
विशालचा चेहरा कुणीतरी चाबकाचा फटका द्यावा असा झाला होता. सगळेजण त्या दोघांकडे बघत होते. त्या माणसाचाही अपमान झाला होता.
"ए निहार, माझा टाईम आणि पैसा काय एवढा स्वस्त आहे का?’’
त्या माणसाच्या चेहऱ्यावर संताप होता. त्याची आणि निहारची बाचाबाची चालू होती.
"मिनाक्षी , क्या लगा था तुम्हे? यू ट्राईड टू हुक मी अप? इसके साथ?" विशालच्या आवाजातून त्याच्या रागाची कल्पना येत होती.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------