रिक्षावाला

पहाटेची वेळ होती मी पुण्याच्या वल्लभनगर बसस्थानकावर उतरलो होतो. आदली पूर्ण रात्र मी महाराष्ट्र शासनाच्या बससेवेचा बळी झालो होतो. बाहेर थंडी होती आणि नेमका अंगावर स्वेटर नव्हता. खिशातला हातरुमाल कानाला बांधून मी गेटच्या दिशेने चालू लागलो. पाठीवरची पिशवी आज मला ढालीसारखी वाटत होती.
एवढ्या सकाळी भोसरीला जाण्यासाठी पी एम टी मिळणार नाही याचा अंदाज होता त्यामुळे रिक्षाच्या थांब्याकडे वळलो. सावजानं चालून शिकाऱ्याच्या जाळ्यात जावं अगदी तसा मी त्यांच्याकडे गेलो.दोन-तीन रिक्षे होते त्यात रीक्षेवाले पहुडले होते. पहिल्या रिक्षातला रिक्षावाला घोरत होता त्याची झोपमोड करणे नकोसे वाटत होते पण इलाज नव्हता.त्याला जागे करून मी विचारले इंद्रायणीनगर येणार का? तो डोळे चोळत म्हणाला ‘एकशेवीस रुपये होतील.’ एरवी बारा रुपयात जाऊ शकणाऱ्या ठिकाणासाठी एकशेवीस रुपये खुपच जास्त होते. पण बाहेर थंडी आणि होती आणि कचेरीत जाण्यापूर्वी मला थोडीशी विश्रांती आवश्यक होती त्यामुळे मी त्याचाशी सौदा करण्यासाठी तयार झालो. मी ऐंशी रुपये सांगितले,तो शंभर म्हणाला; मी माझ्या शब्दावर ठाम राहिलो कारण ऐंशी रुपये हीच मुळात खूप जास्त रक्कम होती. तो तयार होईना शेवटी मी तिथून निघून महामार्गाकडे जात होतो, इतक्यात त्याचा पाठीमागून आवाज आला ‘चल चल बस’. मी रिक्षात बसलो त्याने विचारले ‘इंद्रायणी नगरमध्ये कुठे जायचे आहे? मी म्हणालो ‘द्वारकाविश्व रेसिडन्सी’. मी त्याला बोललो ‘मी तुम्हाला सांगेन,स्वामी समर्थ शाळा माहित आहे ना तीथे अगदी जवळ पाच मिनिटाच्या अंतरावर आहे.’
त्याने रिक्षा चालू केली. मी थोडीशी डुलकी घेतली आणि टेल्को रोड सोडून रिक्षा आत वळली. थोड्याच वेळात स्वामी समर्थ शाळा आली आणि त्याने रिक्षा उभी केली. मी त्याला सांगितले कि माझे घर इथून अजून पुढे आहे. त्यावर तो बोलला 'तूच सांगितले ना स्वामी समर्थ शाळा मग...? इथून पुढे जायचे असेल तर वेगळे पैसे पडतील.'
माझ्याकडून जास्त पैसे लाटण्याचा त्याचा डाव माझ्या लक्षात आला. मला रिक्षावाल्याचा या कृतीचा मनातून राग आला. माझ्याकडे त्याला भाडणे,जास्त पैसे देऊन घरापर्यंत जाणे,किंवा ऐंशी रुपये देऊन तिथेच उतरणे असे पर्याय होते.रात्रभराच्या प्रवासाने आधीच माझी अवस्था चीडचीड झाली होती पण सकाळी सकाळी मी त्याच्याशी भांडत बसण्याच्या मनस्थितीत नव्हतो. 
रिक्षावाला किमान पंचेचाळीस वर्षाचा धडधाकट माणूस होता चेहऱ्यावरून तो अजिबात तो बिलकुल फसवेगिरी करणारा वाटत नव्हता केवळ दहा रुपयासाठी त्याने बेईमानी करावी ही गोष्ट मनाला पटत नव्हती. त्याच्यावर राग येण्यापेक्षा आता मला त्याची कीव येत होती. माझ्यासारख्या माणसाला कुणाला तरी दिलेल्या शब्द मोडण्याची किंमत केवळ दहा रुपये इतकी क्षुल्लक असू शकते ही गोष्ट पटत नव्हती. मी तसां घराच्या खूप जवळ आलो होतो ऐंशी रुपये देऊन तिथेच उतरणे माझ्या जास्त सोयीचे होते पण माझ्या मनातली घालमेल मला ते करण्याची परवानगी देत नव्हती. 
मी त्याला विचारले, ‘पुढे घरापर्यंत येण्यासाठी किती पैसे घेणार?’ तो बोलला ‘दहा रुपये.’ मी म्हणालो ‘चला मी देतो दहा रुपये जास्तीचे.’ 
त्याने पुन्हा रिक्षा चालू केली आणि मला माझ्या इमारतीसमोर आणून सोडले.मी खिशातून शंभर रुपये काढले आणि त्याला दिले.तो खिशातील नोटांच्या पुडग्यातील दहा रुपयाची नोट मला परत देत होता तोपर्यंत मी आणखी वीस रुपयांची नोट त्याच्याकडे केली. तो म्हणाला ‘तू शंभर दिलेस ना मग हे कसले वीस?’ मी म्हणालो ‘ते दहा रुपये ठेवा आणि तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे कदाचित तुम्हाला एकशेवीस रुपयाला इथपर्यंत येणे परवडत होते तर हे वरचे वीसही ठेवा. पण काका एक विनंती आहे दहा-वीस रुपयासाठी कोणाला दिली जबान अशी बदलू नका.’ 
रिक्षावाला माझ्या चेहऱ्याकडे पाहत होता. माझ्या चेहऱ्यावर त्याला कसलीही घृणा किंवा उपकाराची भावना दिसत नव्हती होती ती केवळ एक तळमळ,दिला शब्द जपण्यासाठी केलेली विनंती. एक सविनय सल्ला. 
द्वारकाविश्वच्या गेटवरचा सुरक्षा रक्षकही दुरून हे पाहत होता,ऐकत होता. दुसऱ्याच क्षणात रिक्षावाला रिक्षाच्या बाहेर आला त्याच्या चेहऱ्यावर एक विस्मयाची छटा होती. त्याच्या डोळ्यात निराळे भाव होते.तो वीस रुपये पुढे करत म्हणाला ‘साहेब (!) मला फक्त ऐंशीच द्या वरचे दहा नकोत’. त्याच्या या अनपेक्षित वागण्याने मी अवाक झालो. पुढे काही म्हणण्याआधीच तो माझ्या हातात वीसरुपये देऊन मोकळा झाला. त्याने नजरानजर न करता रिक्षाला किक मारली. 
न राहवून गेटवरचा सुरक्षारक्षक काय घडले याची माझ्याकडे चौकशी करू लागला. मी त्याला पूर्ण तपशील दिला नाही. पण इतक मात्र म्हणालो ‘पुण्यात असे रिक्षावाले खूप कमी आहेत!’ मी त्याच्या पाठमोऱ्या रिक्षाला रस्त्यावरच्या दिव्याच्या उजेडात पहिले त्यावर लिहिले होते ‘फिर मिलेंगे’.