झेंडा फडकणे...!

ही एक मोठी मजेशीर गोष्ट आहे. तितकीच करूणही...
आम्ही कॉलेजला असतांना अनेक मित्रमैत्रिणी लाभल्या. असेच एकदा एका
मैत्रिणीसोबत मी इव्हिनींग वॉक करीत होतो. तेव्हा ती रस्त्यातच पोट धरून
गपकन् बसली. कळवळू लागली. तिला खूप वेदना होत असाव्यात. मी भांबावलो.
'काय झालं? अपेंडीक्स दुखतंय का? तुला स्टोनचा त्रास आहे का? मग होतंय तरी
काय तुला?' मी प्रश्नांच्या फैरी झाडत माझं वैद्यकीय ज्ञान पाजळत होतो.
त्यावर ती कसनुसं तोंड करीत म्हणाली, 'अगोदर मला रुमवर जाऊन टॅबलेट घ्यावी
लागेल. प्लिज पटकन् एखादी रिक्षा कर.' मी धावाधाव करून एक रिक्षा आणली व
तिला रुमवर सोडलं. गोळी खाल्ल्यावर पंधरा मिनिटांत ती शांत झाली.
निघतांना तिथे असलेल्या तिच्या रुम पार्टनरला विचारलं,
'हिला झालंय तरी काय?'
'अरे हिचा झेंडा फडकलाय.' सगळ्याच हसू लागल्या. ते कोड्यातलं उत्तर ऐकून
मीच शब्दकोड्यात पडलो. मला काहीच कळेना. त्याच अनभिज्ञ स्थितीत मी परतलो
तरी माझ्यामागे तो झेंड्याचा भुंगा फडफडत होताच.
'काय गं, काल तुझी रुम पार्टनर जे म्हणाली त्याचा अर्थ काय?' मैत्रिणीला
एकटी गाठून मी संदर्भासह स्पष्टीकरण मागितलं. ती संकोचली. मग हसू लागली.
काही सांगेचना.
'सांग ना गं, सांग ना.' मी मित्र असूनही मैत्रिणीसारखी तिला गळ घालू लागलो.
'जाऊ दे तुला सांगून काय उपयोग? आमच्या प्रायव्हेट गोष्टी.'
'पण मला सांगायला काय हरकत आहे? मी चांगला मित्रय ना तुझा?' परंतु इतकी
वैयक्तिक खाजगी बाब ह्याला कशी सांगावी? असा संभ्रम तिला पडला असावा.
तसं पाहिलं तर आम्ही मेडिकल लाईनमधले. इतरांच्या तुलनेत आमच्या लाईनी जरा
सुपरफास्टच असतात. मी फारच उद्युक्त केल्यावर तिने ते गुपित सांगून टाकलं.
त्याबद्दल मी तिचा आभारी आहे, ऋणी आहे. कारण त्यामुळे मला पुढील वैवाहिक
जीवनात फायदाच झाला. माझ्या बायकोच्या बाबतीत सतर्क राहण्याचं ज्ञान
मिळालं. कॉलेज जीवनात मैत्रिणी असल्याचा नंतरच्या आयुष्यात कसा लाभ होतो हे
यावरून लक्षात यावं...
तर ती म्हणाली, 'झेंडा फडकणे म्हणजे पिरियड येणे, डेट येणे.'
'ओह आय सी. पण झेंड्याचा शब्दप्रयोग कशासाठी?'
'छे बाबा तू भलत्याच चौकशा करतोस बघ. हा आमचा कोडवर्ड आहे मी नाही सांगणार
जा.'
'बरं बाई राहिलं. नको सांगूस.' ते त्यांचं होस्टेल लाईफचं गुपित होतं.
(त्याकाळी पॅडचं आजच्याइतकं फॅड नव्हतं. लाल फडके दोरीवर वाळत घातल्यावर
झेंड्याची उपमा सुचली असावी, हा माझा एक अंदाज.) सडेतोड नामकरण करण्यात
मुली भलत्याच हुशार असतात, हे मी जाणून होतो.
'पण काय गं, इतका त्रास होत असतो त्या प्रक्रियेचा?' मला कालचं तिचं ते
रस्त्यातलं विव्हळणं आठवत होतं.
'बघ ना रे, मला दरवेळी डिसमेनोचा ट्रबल येतो. अँटीस्पास घेतल्याशिवाय पेन
थांबतच नाही.'
'मग डेटच्या आधीच टॅबलेट सुरु करायच्या की.'
'अरे पण नेमक्या कोणत्या दिवशी ते वेळीच नको का लक्षात यायला?'
'अगं सोप्पंय. गेल्याच आठवड्यात गायनिकच्या मॅमनी नाही का तो फॉर्म्युला
सांगितला. आठवला?'
'मी अबसेंट होते बाबा. असं कर ना, तूच मला डेट काढून देत जा.'
'आँ!' मी आश्चर्य व्यक्त केलं.
'मला काही वाटणार नाही अरे. मी तुझी चांगली मैत्रिणय ना?' मग मी तयार झालो.
आता प्रत्येक महिन्याला तिला इन्फॉर्म करण्याचं वाढीव काम माझ्या मागे
लागलं. ती भलतीच विसरभोळी किंवा केअरलेस असावी. तिनं तिच्या शारीरधर्माची
नोंद ठेवण्याचं काम निःसंकोचपणे माझ्यावर ढकलून दिलं होतं...
मग मी तयारीला लागलो. सलग सहा महिन्यांच्या डेटस् तिच्या रुममधील
कॅलेंडरवरून टीपून घेतल्या. (नशीब, ती त्या तारखेला छोटा क्रॉस करीत गेली
होती.) त्या तारखांच्या मधले दिवस कॅलेंडरच्या आधारे तंतोतंत मोजले. अन्
त्यांच्या बेरजेला सहाने भागले. येणारा अंक तिच्या संभाव्य मासिकपाळीची
दिवससंख्या होती. तो अंक या तारखेत कॅलेंडरप्रमाणे मिळवला की पुढील
पिरीयडची डेट मिळायची. ती मी तिला न चुकता दोन दिवस आधीच सांगायचो.
त्यामुळे तिला लगेच गोळ्या सुरु करता येत व पोटदुखीच्या विलक्षण त्रासातून
मुक्तता मिळायची.
मी तारीख देणं आणि तिचा पिरीयड येणं हे एक समीकरणच बनून गेलं! इतकंच काय
तिचं लग्न झाल्यावर देखील दोन मुलांच्या काळातील दोन वर्षांचा अपवाद वगळता
त्यात खंड पडला नव्हता. माझा फोन येऊन गेला की ती गोळ्या चालू करायची. एक
चांगली निखळ मैत्री म्हणून मी ते काम आजतागायत न लाजता करीत आलो...
आणि गेल्या चार पाच महिन्यात जेव्हा मी फोन केले तेव्हा ती प्रत्येकवेळी
हताशपणे हसून म्हणाली, 'नाही ना रे, आजकाल अनियमितता वाढलीय बघ. मला वाटतं
आता यापुढे फोन करुन आगाऊ सूचना देण्याची गरज राहणार नाही. बहुतेक आता मी
निवृत्त होतेय.' ते ऐकून मलाच गलबलून आलं. कळीचं फूल होतांना जे तडकणं असतं
ते मी अनुभवलं होतं. आणि ते सुसह्य होण्याकामी माझी तिला मदतच होत आली
होती. आता तेच फूल डोळ्यांदेखत कोमेजतंय म्हटल्यावर मला गहिवरून येणं
साहजिकच होतं...
म्हणूनच म्हणतो, अखिल स्त्रीवर्गाच्या त्या झेंडा कष्टमय शारीरधर्माला
आम्हां पुरुषवर्गाचा मनापासून सलाम!