तिची साधीशी कविता

तिची साधीशी कविता
माझा अर्थाचा गोंधळ
काळेसावळे ते ढग
तिचा सखा घननीळ |

तिची साधीशी कविता
शोध अंतरीचा घेई
खोल विरहाचे दु:ख
अलगद वर येई |

तिची साधीशी कविता
म्हणे'तुझी माझी भेट
आज वसंत बहर
पुढे वैशाखाची वाट |

तिची साधीशी कविता
थोडे डोळे पाणावती
दोन मोतियांचे अश्रु
तिच्या गाली ओघळती |

तिची साधीशी कविता
माझ्या गळा एक मिठी
शब्द विरुनिया गेले
अर्थ एक दोघां ओठी ! ...........