झोपेत पडणारी स्वप्नं

झोपेत पडणारी स्वप्नं जागेपणी आठवतात तेव्हा ती निरर्थक, विस्कळित नि असंबद्ध वाटतात. तरीसुद्धा स्वप्नांबद्दल माणसाना नेहमीच एक प्रकारचं कुतूहल वाटत आलंय.

सिग्मंड फ्रॉइडनी स्वप्नांचं मानसशास्त्रीय विश्लेषण करून काही तर्काधिष्ठित अनुमानं काढल्येत. बऱ्याच अंशी ती आपल्या अनुभवांशी जुळतात. ती याप्रमाणे:
१) बहुतेक स्वप्नं जाग आल्याआल्याच विसरायला होतात.
२) बहुतेक स्वप्नं वाईट (nightmarish) असतात. म्हणजे ती पाहाताना भीति, असुरक्षितता, काळजी या भावना उत्पन्न होतात. मनावर दडपण येतं. फारच थोडी स्वप्नं चांगली, हवीहवीशी, वाटणारी असतात.
३) एकच स्वप्न पुन्हा पुन्हा पडू शकतं. मला याचा अनुभव आहे. मी १९६४ साली शेवटची पदवी परीक्षा उत्तीर्ण झालो. पण "परीक्षा १५ दिवसांवर आल्ये नि एका महत्त्वाच्या विषयाचं पुस्तक अजून एकदाही हातात घेतलं नाही याचं मनावर दडपण आलंय" हे स्वप्न मला नंतर कितीक वेळा पडलंय नि अजूनही मधनं मधनं पडत असतं.
४) स्वप्न ही पाहाणाऱ्या माणसाची स्वतःची निर्मिती असते. ती त्या माणसाच्या स्वतःच्या (स्वतःलासुद्धा अभ्यासानीच समजेल अशा) सांकेतिक भाषेत असते.    
५) स्वप्नं मनातल्या अतृप्त इच्छा पूर्ण करतात. (तरीदेखील ती वाईट असतात हे सकृद्दर्शनी तरी चमत्कारिक वाटतं). आमच्या एका मित्राला हे पटत नाही कारण त्याची आवडती नटी कधीही त्याच्या स्वप्नात येत नाही.
६) स्वप्नातली इच्छापूर्ती उघड नसते. ती प्रच्छन्न असते. कारण प्रत्येकाच्या मनातला एक भाग सेन्सॉरची कात्री घेऊन बसलेला असतो. हा भाग झोपेतही जागा असतो. त्याचं निर्मात्यावर (पाहाणाराच निर्माता असतो) कडक नियंत्रण असतं. कदाचित यामुळेच आमच्या वर उल्लेख केलेल्या मित्राला त्याची आवडती नटी तिच्या ओळखू येणाऱ्या रुपात दिसत नसावी.  

बऱ्याच वर्षांपूर्वी एका मराठी मासिकात स्वप्नांवर लिहिलेला एक लेख माझ्या वाचनात आला होता. (लेखकाचं नाव आता आठवत नाही). त्यात शेवटचा परिच्छेद कोड्यात टाकणारा होता. त्याचा मजकूर साधारणपणे असा होता :
"स्वप्नातल्या गोष्टी जागेपणी आठवतात तेव्हा त्या असंबद्ध, अतार्किक, वाटतात. पण स्वप्न पाहात असताना त्या असंबद्ध वाटत नाहीत, तर्कसंगतच वाटतात. त्यामुळे त्यावेळी आपण जागे नसून स्वप्नात आहोत अशी शंका आपल्याला येत नाही. एवढंच नाही तर त्यावेळी आपण स्वप्नात तर नाही हे पाहायला स्वतःला चिमटा काढून पाह्यला तरी आपण स्वप्नात नाही जागेच आहोत अशी आपली खात्री पटते. मग आता सांगा, या क्षणी हे वाचत असताना तुम्ही स्वप्नात नसून जागे आहात याबद्दल तुमची खात्री आहे? पाह्यजे तर स्वतःला चिमटा काढून पाहा."