गणपती येता घरा । साजरा करा मोद आगळा ।
संपला श्रावणमास खरा । धरेवरी अजुनी पाणकळा ॥
बहर फुलांचा न्यारा । डोलती तरूलता मुग्धा ।
शांत जाहल्या लाटा । शेता रंग येतसे भरा ॥
संपुनी उपास मासाचा । झाले चित्त शुद्ध आता ।
झाली घाइ सानथोरा । स्वागत गणरायाचे करण्या ॥
गोळा करा बाळगोपाळा । सजवा घरे नि चौरंगा ।
कोणी तामण घ्या घंटा । अक्षता दूर्वा धूप तथा ॥
नाचत गात चला । मुखाने मोरया मोरया ।
तालात वाजवा झांजा । छन् छन् छनक् छनक् छन् छना ॥
जवळी मृदुंग आहे कां । धिनक् धिन् नाद बरा नाचण्या ।
वाजवा दिडका ढोल चला । कंपित सारी गात्रे करा ॥
हरपू द्या तालसुरी भान या । अवघे गणेशमय होऊ या ।
वाजत गाजत आणू देवा । अर्पू तन-मन-भक्तीभावा ॥
आले गणपतीबाप्पा घरा । साजरा करा मोद आगळा ।
कुठली उच्चनीचता आता । अवघे बाप्पाला पुजू या ॥
अवघा स्वार्थ झडू दे नाथा । स्वर्थी झिजू देत ही काया ।
दे स्वाराज्यदान दातारा । वसुधा कुटुंब एकचि करा ॥
धरती सुजला-सुफला करा । असू दे तंव आधिराज्या ।
सेवा गोड मानुनी घ्या । चरणी अखंड आश्रय द्या ॥
हृदयी नित्य घोष तुमचा । असू द्या मोऽरया मोरया ।
मोऽरया मोऽरया, मोरया । मोरया मोऽरया मोऽरया ॥