बाप्पा बाप्पा मोरया

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला, येई घरोघरी पाहुणा।

दिशा दाही दुमदुमती, "गणपति बप्पा मोरया"॥

अकार उकार मकार, तूची सच्चिदानंदस्वरुपा।

शंकर पिता माता पार्वति, "आधी वंदू तूज मोरया"॥

रिद्धी सिद्धी सवें असती, कला विद्येची तू देवता।

सकळाभीष्ट साध्य करिसी, "सिद्धीविनायक मोरया"॥

मूषक तूझे वाहन होई, डोई वरती दूर्वा।

परशु हाती पैंजणें पायी, "अष्टविनायक मोरया"॥

वक्रतुंड एकदंत, गजानना श्रीगणराया।

संकटांचे निरसन करिसी,"विघ्नहर्ता तूज मोरया"॥

सुपा एवढे कान तुझे, दिसतो किती देखणा।

डोळे हीरे आणिक मोती, "मंगलमूर्ती मोरया"॥

लाडू पेढे मोदकांचा, लागे तुजला नजराणा।

विश्वाचे सार, लंबोदर,"बप्पा बप्पा मोरया"॥

विधिवत तयाची पूजा करोनि, आशीर्वाद आपण घेऊया।

असो सदा तुझी कृपादृष्टी, "गणपति बप्पा मोरया"॥