धोंडू आणि धोबंग

एका अज्ञात ठीकाणी खलबतं चालली असतात. मलईखा पोरा: "छैया छैया करून करून मी नाच नाच नाचून दमले गो बाई. नंतर हे बेबी, ते बेबी, घे बेबी, दे बेबी केले. मग हाऊस फुल्ल झाले. पण म्हणावेसे यश मिळत नाही आहे मला."

अर्रर्र बास खान:
आरं आरं आता बास की. काय हे अभद्र बोलतेस! माझ्या डोस्क्यात भन्नाट आयडीया आहे. ती आपण प्रत्यक्षात उतरवू या.

मसल्स खान:
हॅल्लो ब्रदर! सांग ना मला सुद्धा ती आयडीया. मी पण पार्टनर मध्ये शरिराचे सगळे सिक्स पॅक अॅबचे पार्ट पार्ट दाखवले. "नर" असल्याचा फायदा घेवून मसल्स चे "पार्ट" दाखवून पार्टनर चित्रपट केला.
मग मी अनेकांना "वांटेड" होतो.
मैने प्यार क्यो कीया असा प्रश्न पडेपर्यंत मी चित्रपटांत काम करत राहीलो. मग मध्येच केस दोन्ही बाजूंनी कपाळावर आणले. तुझ्याच नावे. आता मला एका जबरदस्त हीटची गरज आहे. मी अगोदरच फीट आहे. फक्त एका हिट ची गरज आहे.

अर्रर्र बास खान:
हॅल्लो ब्रदर! ऐक माझी आयडीया! एक भन्नाट स्टोरी. भन्नाट मारामारी. भन्नाट "इमोसन्स". बोली भाषेतला एक शब्द सापडलाय मला- धोबंग.

मसल्स आणि मलईखा:
धोबंग म्हणजे काय रे "भाऊ"?

अर्रर्र बास खान:
धोबंग म्हणजे प्रत्येकाला धो धो धुणारा माणूस.... खजीनी सारखा हा सुद्धा दणक्यात चालेल बघ. तशीच याक्शन टाकू आपण यात. थोदी वांटेड ची याक्शन मिक्स करू.

तेवढ्यात इनोद खण ना,
खामोश कन्या,
सिंपल कपडे घाला
हे तिघे तिथे येतात, म्हणतातः
आम्हालाही एका हीटची गरज आहे. पण इतकंही करून चित्रपट नाही चालला तर?

मसल्स खान:
कामीर कान आहे ना स्तुती करायला. तो करेल स्तुती. आपल्या चित्राटची.

सिंपल कपडे घाला:
पण इतकंही करून चित्रपट नाही चालला तर? काहितरी वादग्रस्त असलेच पाहीजे. त्याशिवाय चित्रपट चालत नाहीत.

... तेवढ्यात तेथे धोंडू येतो.

धोंडू:
मी सांगतो. आपण एक गुप्त गंमत करार करू. तुम्ही आमचा "धोंडू बाम" वापरत असालच. त्याचा शब्द गाण्यात वापरा. मग आम्ही आक्षेप घेवू. म्हणजे तुमची जाहिरात होईल. मग तुम्ही आम्हाला फुकटात मलई द्या म्हणजे मलईखा पोरा हीला आमच्या "धोंडू बाम" च्या जाहिरातीत फुकटात वापरू द्या म्हणजे आमची जाहिरात होईल. कशी वाटली आयडीया?

... ही आयडीया सगळ्यांना पसंत पडते.

धोबंग सुरू होतो.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच मसल्स खान बँक चोरांना धोपाटण्याने धो धो धुतो. अगदी धोबंगासारखा.
इतका धुतो, एवधा धुतो की "धुणे" ही संकल्पना सुद्धा लाजून आंघोळ करून स्वतःचे केस धो धो धुते.
तर मग ते मार खावून पेंगलेले, काळे निळे झालेले त्रस्त गुंड म्हणतात :
"आम्हाला कमरेत दुखतंय. काय करू? "

तो पटापट धोंडू बाम त्यांना वाटतो.
"धोंडू बाम" वापरा! पुन्हा मारामारीस सज्ज व्हा.

मग एकदा मसल्स खान चोरांचा पठलाग करता करता खामोश कन्या च्या घरात छपरावरून पडतो. खामोश कन्या ने लहानपणी त्याचा "खामोशी" पाहिलेला असल्याने ती त्याला समोर अचानक पाहून कायमची "खामोशश" होते.
मग तो तीला "धोंडू बाम" देतो.
पहिल्या प्रेमाची पहिली पेनकिलर भेट.

त्या गावातला सोन्या खूप मातला असतो. तो इनोद खण ना च्या सख्ख्या मुलात आणि दुखऱ्या मुलात वैतुष्ट आणण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला यश न आल्याने "धोंडू बाम" लावतो. नंतर यश येते. पण मग पुन्हा भावातले गैरसमज दूर होतात.

मातलेला सोन्या मुन्नी सोबत नाचतो. तेवढ्यात मसल्स खान अचानक येवून नाचायला लागतो.
तो असा काही तिरपा तारपा विचित्र पद्धतीने विविध पार्ट इकए तिकडे करून नाचतो की त्याला गाणे संपताच "धोंडू बाम" ची आख्खी बाटली लागते.

शेवटी सोन्या खूप मार खातो. मार खावून सूज येते. मग त्याच्या गालाला मुन्नी गालाला पुन्हा "धोंडू बाम" लावते.

धो धो धुतले जावून चित्रपट गृहातून बाहेर प्रेक्षक बाहेर पडतात.
दरवाज्या जवळ हसतमुखाने प्रत्येक प्रेक्षकाला "धोंडू बाम" फुकट वाटण्यात येतो.
तो ही कुणाच्या हस्ते-मलईखा पोरा हिच्या!