नवा मी

नवा मी

आज परत लेखणी हातात आली
"लिही" म्हणाली, जिवंत झालो मी

काल जीवनाने छळ केला माझा
आज त्याला धक्का लाऊन आलो मी

विचारांच्या आभावामुळे उपाशी पडलो
कधी भावनांच्या भरात वाहून गेलो मी

स्वत:बरोबर झाले संवाद असे की
लोकात शांत उभा राहिलो मी

काही बोलता नाही आलं तेव्हा
माझ्याच दुर्दैवावर हसलो मी

तिला कळेना, सगळंच वजा केल्यावरही
तिचा परत तसाच, कसा उरलो मी

मनातले कागदावर ओतून असा
माझाच कितीसा राहिलो मी

कविता संपली की मी रिकामा
किंवा परत नव्याने, जिवंत झालो मी

-- मयुरेश कुलकर्णी