स्वयंभू

आमच्या गुरुवार कट्ट्यावर अध्यात्म म्हंटलं की किती बोलू नि किती नाही असं होतं. त्यातून एखाद्याचा अनुभव (त्याच्या दृष्टीनी) 'जरा हटके' असला तर बघायलाच नको. अर्थात फारसं कुणी ऐकत असतं असं मात्र नाही. हिरिरीनी बोलणाऱ्या प्रत्येकाचं आपापलं श्रद्धास्थान आहे. कोणाचे 'महाराज' आहेत, कोणाचे 'बापू' आहेत, कोणाचे 'महर्षी' आहेत तर कोणाचे नुसतेच 'गुरु' आहेत. थोडक्यात, या प्रत्येकाचा एक 'बाबा' आहे. काहीजणांचं मात्र कोणीच नाही. त्यांच्यापैकी काही सीमारेषेवर आहेत. त्यांना बाकीचे आपापल्या 'बाबा'च्या कळपात ओढायला पाहातात. आमच्यात अध्यात्मिक चर्चा होतात त्यावेळी प्रत्येक बाबावाला आपला बाबा इतरांच्या बाबापेक्षा कसा ग्रेट आहे हे प्रच्छन्नपणे सांगायचा प्रयत्न करतो. आज आपण जे काही आहोत ते आपल्या 'बाबां'मुळे असं आम्हा बाबावाल्यांना वाटतं.
कुठल्याही बाबाची दीक्षा न घेतलेल्यांमध्ये येशा एक आहे. येशा म्हणजे यशवंत कदम. त्यानी कधी बाबाचर्चेत भाग घेतला नाही. तो हजर असताना 'बाबा'लोकांवर चर्चा झालीच तर तो वैतागून म्हणायचा, बस झालं रे तुमचं अध्यात्म! दुसरं काही तरी बोला. आम्हा बाबावाल्यांच्या मते त्याला 'अध्यात्मिक अधिष्ठान'च नव्हतं.      

एकदा सुटीच्या दिवशी दुपारी मी येशाच्या घरी बसलो असताना एक फ्रॉक घातलेली वयस्कर बाई त्याच्याकडे आली. पेहेरावावरून ती ख्रिश्चन वाटत होती. तिच्या हातातल्या पिशवीत काही पुस्तकं होती.
'येस'? प्रश्नार्थक चेहरा करून येशानी तिला विचारलं.
'मी जेनेट. वरून आदेश आल्यामुळे मी देवाचा संदेश पोचवायला आल्ये' ती म्हणाली.
'वरून? वरून म्हणजे'? येशानी विचारलं.
'वरून, वरून.' वरच्या दिशेनी बोट दाखवत ती सांगू लागली.
येशाला काही कळलं नाही का तो न कळल्याचं नाटक करत होता कुणास ठाऊक. पण त्याच्या चेहऱ्यावरचा प्रश्न कायम होता. त्याला कसं सांगावं हे त्या बाईला कळेना. 'वरून, वरून' ती पुन्हा पुन्हा वर बोट दाखवून म्हणत होती. मला 'अध्यात्मिक अधिष्ठान' असल्यमुळे ती काय म्हणत होती ते मला कळलं. मी मध्ये पडलो नि येशाला म्हणालो,
'अरे, वरून म्हणजे देवाकडून असं म्हणायचंय त्याना'.
तिला हायसं वाटलं. ती घाईघाईनी म्हणाली, 'हां, त्या जगन्नियंत्याकडून'.
इतका अवजड शब्द पाठ केल्यासारखा तिच्या तोंडून बाहेर पडल्यावर माझी खात्रीच झाली की ती ख्रिश्चन धर्मप्रसारकांपैकी एक आहे.
'हा जगन्नियंता का काय तुम्ही म्हणता तो कोण आहे? ' येशानी तिला विचारलं. येशा तिची फिरकी घेतोय असं मला वाटलं.
जेनेटनी कीव करणाऱ्या नजरेनी येशाकडे पाह्यलं नि त्याला म्हणाली, 'अहो, जगन्नियंता म्हणजे 'तो' आकाशातला आपल्या सर्वांचा पिता, ज्यानी हे सर्व जग निर्माण केलं, तुम्हाला, आम्हाला निर्माण केलं.
'कशावरून? ' येशानी तिला तिनी तयारी न केलेला प्रश्न विचारला.
'तुम्ही असा अविश्वास दाखवू शकत नाही. ' जेनेट म्हणाली.
'का? मी विश्वास का ठेवावा? ' येशानी विचारलं.
'कारण तसं केलं नाहीत तर प्रभू तुमच्यावर रागवेल. ' जेनेट म्हणाली.
आता हा प्रभू कोण असं येशा विचारतो की काय अशी मला भीती वाटली. सुदैवानी येशानी समजूतदारपणा दाखवला.
'असं पहा', येशा म्हणाला, 'मुळात वर आकाशात कोणी बाप आहे हेच मला कबूल नाही तर त्यानी मला निर्माण केला याच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रश्नच नाही. '   
'समजा, तुम्ही तुमच्या वडलाना म्हणालात की त्यानी तुम्हाला जन्म दिला नाही तर ते तुमच्यावर रागावतील की नाही'? जेनेट म्हणाली नि येशाचं उत्तर हो आहे असं गृहीत धरून पुढे म्हणाली, 'तसंच आहे हे'. ठरलेलं वाक्य बोलायचं राहू नाही म्हणून संभाषणाची दिशा लक्षात न घेता जेनेटनी घाईघाईनी बोलून टाकलं.
'पण कोणी नाहीच तिथे तर राग कोणाला येणार'? येशा वर बोट दाखवत बोलला. त्यानी आपल्या थिअरीला चिकटून राहात तिला तर्काच्या कोंडीत पकडलं.
या दगडावर कितीही डोकं आपटलं तरी काही उपयोग नाही असं जेनेटला जाणवलं. शेवटी, 'ही पुस्तकं ठेवा. याचे पैसे नाही' असं म्हणून तिनी दोन पुस्तकं येशाच्या हातात ठेवली नि ती निघून गेली. 'वरून' मिळालेल्या आदेशानुसार तिनी प्रत्यक्ष संदेश नाही तरी तो छापलेली पुस्तकं पोचवली होती.  
ती गेल्यावर मी येशाला विचारलं, 'काय रे, तुझा खरंच विश्वास नाही देवावर का तिची परीक्षा घेत होतास'?
'देवबीव सर्व झूट आहे रे' येशा म्हणाला. त्याच्या आवाजात तुच्छता होती.
'अच्छा'? मी म्हणालो. येशा पूर्ण नास्तिक असेल असं वाटलं नव्हतं. त्याच्यात मला आमच्या महाराजांचा एक भावी शिष्य दिसला. मी त्याला म्हणालो, 'तू एकदा आमच्या महाराजाना भेट. ते तुझ्या सर्व शंकांचं निरसन करतील'.
'मला काहीच शंका नाहीत', येशानी मला उडवून लावलं. मला तो आमच्या महाराजांचा अपमान वाटला. त्याच्याकडे उत्तरं नसणारे प्रश्न आहेत हे दाखवण्यासाठी मी त्याला विचारलं, 'देव नाही म्हणतोस तर मग सांग, हे जग कोणी निर्माण केलाय'?
'कोणतं जग? हे भोवतालचं? अरे, ही माया आहे', येशा म्हणाला.
त्याच्या तोंडून 'माया' हा अध्यात्मिक शब्दकोषातला शब्द ऐकून 'केस' अगदीच हाताबाहेर गेलेली नाही असं वाटलं म्हणून त्याला अडकवण्यासाठी मी विचारलं, 'माया आहे ना? मग ही माया कोणी निर्माण केली'?
'आपणच. जो तो आपापलं जग निर्माण करतो नि त्यात जगतो. मी माझं जग निर्माण केलंय नि त्यात जगतोय. तू तुझं, त्यानी त्याचं, असं'.
'असं? चल, क्षणभर मानलं तू तुझं जग निर्माण केलयस, तरी तुला कोणी निर्माण केलंय हा प्रश्न राहतोच ना'? मी विचारलं.
'हे बघ, तुला जर असं म्हणायचं असेल की मला देवानी निर्माण केलंय, तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे'. येशा म्हणाला.
'कोणत्या'?
'देवाला कोणी निर्माण केलाय'? येशानी विचारलं.
'त्याला कशाला कोणी निर्माण करायला पाह्यजे? तो स्वयंभू आहे' मी म्हणालो खरा पण आपण हवेत बोलतोय असं मला वाटलं. 'तो स्वयंभू आहे म्हणतोस तर मी स्वयंभू आहे असं म्हणायला काय हरकत आहे? मीच मला स्वतःच्या इच्छेनी निर्माण केलंय असं समज. त्यामुळे निदान त्याचा बाप कोण, बापाचा बाप कोण, ही प्रश्नावली तरी थांबेल', येशा आपला नास्तिकपणा सोडायला तयार नव्हता.
'हे बघ, स्वयंभू म्हणायला तू काही तू काही आकाशातून पडला नाहीस की जमिनीतून वर आला नाहीस. तुझा जन्म तर तुझ्या आईवडलांमुळे झाला, हो ना'? मी विचारलं.
'तू भौतिक पातळीवर बोलतोयस का अध्यात्मिक'? येशानी विचारलं.
येशाचा हा प्रश्न वादाच्या दृष्टीनी कितपत योग्य ते मला ठरवता येईना. मी निरुत्तर झालो. शेवटी, 'नमस्कार, स्वयंभू यशवंत महाराज' असं म्हणून मी त्याला कोपरापासून हात जोडले.

मला निरुत्तर करणाऱ्या येशाच्या स्वयंभूपणाची हकीकत कट्ट्यावर सांगून इतरांकडून त्याला धडा शिकवावा असा विचार मी केला. पण कट्ट्याचा दिवस येईपर्यंत तो विरून गेला. मनात आलं, आपण स्वयंभू आहोत असं येशाला खरंच वाटत असलं तर? तर तो आपल्या इच्छा नि आपलं रूप यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करील. मेळ बसला नाही तर तर त्याची कारणं शोधील नि ती नाहिशी करण्याचा प्रयत्न करील. आणि काय सांगावं, त्याचा प्रयत्न यशस्वी झाला तर तो आपल्या इच्छेप्रमाणे आपलं रूप बदलायला लागेल.
मला येशा मध्ये एक भावी 'बाबा' दिसतोय. स्वयंभू बाबा. त्याचं पूर्वायुष्य कोणालाच माहीत नसेल.

तसं पाह्यलं तर येशाच्या तर्काप्रमाणे (तर्कटाप्रमाणे म्हणा हवं तर) प्रत्येकजण स्वयंभूच ठरतो, नाही का? कोणाला पटो वा न पटो.

हल्ली मला कट्ट्यावरच्या अध्यात्मिक गप्पा जाम बोअर व्हायला लागल्येत.