प्रेमाचा चौकोन

एक हिन्दी शेर आहे. कदाचित तुला माहीत असेल. -

मोहब्बत का सफर है,
पता मंझिलसे पुछो..
उनकी बात छोडो, तुम अपने दिलसे पुछो।

म्हणजे
तुझ्या प्रेमाखातर कोणीही उठून काहीही म्हणेल, तुझ्या मनात कोणती मंझिल
दडलेली आहे ते महत्वाचे. अन् तेच तू जाणून घ्यायला हवं. हे प्रेमज्ञान
पाजळण्याचं कारण हेच की तुझ्या प्रेमासाठी तुझ्याभोवती प्रेमाचा त्रिकोण
नाही तर चौकोन झाला आहे!
वरील डाव्या बाजूच्या कोनात तुझे स्थान गृहीत
धरले तर इतर तीन कोन म्हणजे गणेश, सचिन व सुशील हे होत. मुळात प्रेमाचा हा
चौकोन असल्याने कोणीतरी एकच फार नजिक येणारा आहे. जर चौरस कल्पिला असता तर
तिघेही तुजपासून समसमान अंतरावर राहिले असते. परंतु चौकोनाकृतीत फक्त
एखादाच कोन जवळचा असतो, उरलेले जरा लांबचेच. तरीही ते मूळ आकृतीचाच एक भाग
असतात, हे विसरुन कसं चालेल? आता खरी कसोटी तुझीच आहे, आपल्या निकटचा कोन
कोणता ते शोधण्याची..
प्रत्येक कोनाला तुझ्या आसपास नव्हे तर अगदी नजिक
येण्याची आस आहे. पण ते भाग्य केवळ एकाच कोनाला लाभणार हे नक्की.
सुशील
विषयी तुझ्या मनात मैत्री व्यतिरिक्त दुसरी भावना नसावी असे मला वाटते. तो
तुझ्याशीच नव्हे तर मम्मी पप्पांशी मुद्दाम संवाद साधू पाहतो, हा त्याचा
आगाऊपणा असून तुझ्या मन मोकळ्या बोलण्याचा तो गैर अर्थ लावून भलत्याच
भ्रमात वावरतो आहे. त्याला वाटतं तू त्याच्यापुढे इतरांचं नांव घेतेस
म्हणजे 'मजाक' करते आहेस! म्हणजे सुशील हा निश्चितच दूरवरचा कोन आहे, हे
लक्षात घे.
गणेश म्हणजे तुझा बालपणापासूनचा सवंगडी. तुझ्याच नात्यातला.
तुम्हांला एकमेकांचे स्वभाव पक्के माहीत होते, आहेतही. म्हणूनच तुमचा
वाङनिश्चय अगदी सहजगत्या पार पडला. तुम्ही एकत्र राहण्याच्या आणाभाका
घेतल्या, तसे वागलात देखील. परंतु कोठेतरी माशी शिंकली अन् तुमच्या
नात्याची निरगाठ बसण्यापूर्वीच दृष्ट लागली. तुमचं ठरलेलं लग्न क्षणात
मोडलं. कारण त्यानं तुझ्या दादाचा केलेला अवमान तुला सहन झाला नाही. तुझा
स्वाभिमान तेव्हा जागृत झाला. जो तुझ्या माणसांची कोणतीही भीडभाड न ठेवता,
त्यांना रिस्पेक्ट न देता पाणउतारा करण्याची इच्छा बाळगतो. शिवाय
तुझ्याकडून मात्र स्वतःला अहो-जाहो संबोधण्याची अपेक्षा ठेवतो, त्याला
कितीही चांगल्या आचरणाचा असला तरी जवळ घ्यावा का? हा खरा तुझ्यापुढील
प्रश्न आहे..
तू गणेशशिवाय जगू शकतेस. कारण तुम्ही दोघांनीही तुमच्या
ब्रेक अप नंतर येणारी कमिटमेंट स्विकारलेली आहे. तुमचे तुटलेले नाते पुन्हा
जुळवण्याकामी तुझ्या घरच्यांचा हातभार लागणार नाही, नव्हे तुझीच तशी
घरच्यांविरुद्ध बगावत करण्याची इच्छा नाही, असे तू कैकदा बोलून दाखवले
आहेसच. तू त्याला सचिन विषयी सांगितल्यानंतर 'तू कोणाची जरी झालीस तरी
तुझ्या मनात कोण आहे, हे मला माहितंय' असं त्याचं म्हणणं ही ठरलेली ब्रेकअप
नंतरची कमिटमेंट नसून इमोशनली डिस्टर्ब करण्याचा प्रकार असू शकतो. किँवा
खरेचच तो तुझ्या व्यतिरिक्त कोणाला चाहत नसणार. असे असले तरी मुळात तुलाच
तुझ्या घरच्यांना दुखवायचे नाहीये, आणि ते म्हणतील त्याच्याशी तू विवाह
करणार आहेस. हा तुझा निश्चयसुद्धा तू अनेकदा उधृक्त केला आहेच. तेव्हा गणेश
नावाचा कोन कितीही जवळचा वाटत असला तरी दूर ठेवलेलाच बरा. नाही का?
राहता
राहिली सचिनची गोष्ट. तुझं लग्न मोडलेलं असल्याचं कळूनही त्यानं तुला
स्विकारण्याची तयारी दाखवली, हा त्याच्या मनाचा मोठेपणा तर आहेच, शिवाय
कोसळू पाहणाऱ्‍या व्यक्तिला सावरण्याचा एक चांगला गुणही आहे.
तुझ्याबाबत
भलंबुरं जाणल्यानंतरही त्यानं तुला रितसर मागणी घातलीच. दुसरा कोणी असता
तर दूर पळाला असता..
तुझ्या घरच्यांनाही ते स्थळ व तो मुलगा पसंत आहे
आणि तुलाही. तू त्याला भेटल्यानंतर तुझी भावनिक स्थिती किती आनंददायी होती,
हे सांगायलाच हवं का? त्याच्याविषयी नव्हे 'त्यांच्या'विषयी तू कितीतरी
भरभरुन बोलत राहिलीस, एखाद्या अखंडीत झऱ्‍यासारखी. तुला सचिनला मनापासून
रिस्पेक्ट द्यावासा वाटला यातच सर्वकाही आलं.
मग आता सांग बघू तुझा
जवळचा कोन कोणता?
मला वाटतं तुला उत्तर मिळालंय...