आपटयाची पाने...

वाचकहो,  

आज विजयादशमी. जे जे वाईट, ते ते सर्व नष्ट, पराभूत होऊन फक्त चांगल्याचाच विजय होतो 
हे सत्य अधोरेखित करणारा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मंगलमय दिवस.. 
तेन्व्हा सर्वप्रथम तुम्हा सर्वाना दसर्याच्या मनापासून शुभेछा!
खरतर कुठलाही सण हा कामात अडकलेल्या, जगरहाटीला कंटाळलेल्या, उदास मनासाठी जगण्याचे नवे 
कारण घेऊन येणारा  एक प्रकाशदूत असतो. नवे संकल्प नव्या उत्साहाने करण्यासाठी, घराप्रमाणेच मनावरही 
चढलेली मरगळ झटकून सर्वकाही नव्याने सुरू करण्यासाठी, निसर्गाने दिलेली आणखी एक संधी असते. 
तरीही आज यापैकी काहीच का करावेसे वाटत नाही? सणाचा आनंद कोणाशीच वाटून घ्यावासा का वाटत नाही? 
मुळात, निसर्गाच्या या रंगपंचमीतला निरागस आनंद लुटायची माझीच इच्छा कमी झालेय का? 
प्रियजनाना केले जाणारे फोन्स हे 'formal sms' मध्ये रुपांतरीत का झालेत ? या सगळ्यातला मायेचा ओलावा कुठे हरवला? 
या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसलेली असताना मला आजूबाजूला दिसतायत ते
 नालासोपारा येथील असे मामी-मामा ज्यानी स्वार्थासाठी आपल्या चिमण्या भाचरांचा बळी घेतला, 
असे सुस्न्स्कृत(? ) पालक ज्यांच्यातील मतभेदामुळे त्यांच्या बाळाना घरापेक्षा पाळणाघर
 अधिक मायेचे वाटू लागले आहे, आणि अशी मुले ज्याना आपल्या जन्मदात्याना देण्यासाठी
 थोडासाही वेळ नाही वा तसे करण्याची इच्छाही नाही.सन्शय,राग, द्वेष, तिरस्कार, हुकुमत या 
आणि अशाच भावना जगावर राज्य करतायत जश्या काही. 
प्रत्येक गोष्टच ओरबाडून, चढ्या किमतीने घेण्याच्या या रेसमधून आपट्याची कोवळी पानेही सुटली नाहीत 
की वडाच्या फांद्या.. असे मारून मुटकून पुण्य मिळवून काय साध्य करू पाहातोय आपण? 
हा सर्व भपका, ही महागातल्या महाग साड्यांची सळसळ, हा दागिन्यांचा डामडौल, 
ती आजूबाजूची गरीबी, असाहायता, कष्ट नजरेआड करणारी मग्रुरी, या सर्वामध्ये
 सण साजरा करण्यातले पावित्र्य, मांगल्य कुठे आहे? 
 कुणाला कदाचित हे चित्र खुपच विदारक वाटू शकेल. पण कुणी सांगेल का की या वातावरणात 
मनातील विशवास, आशेची ज्योत कशी जागृत ठेवायची? 
टीप - अतिशय उदास मनस्थितीत काल मी हा लेख माझ्या ' marathisumane' या  blog वर टाकला होता. पण हे विचार मला 'मनोगत' च्या व्यासपीठावरही शेअर करावेसे वाटले, म्हणून हा लेखप्रपंच!