आईचा मोबाईल

"ट्रिंग ट्रिंग .. ट्रिंग ट्रिंग .. " घरचा बीएसएनएल चा फोन वाजला आणि तो घ्यायला मी धावत पळत वरच्या खोलीत गेलो.

"हॅलो.. "

व्यक्ती १ : "हा, आणि त्यात थोडी साखर घाल म्हणजे अगदी मस्त चव येईल."

व्यक्ती २ : "बरं, बरं. बघते साखर घालून कस लागतंय चवीला .. बाकी तुझं कस काय चाललंय ?"

दोन बायकांच अतिशय महत्त्वाच संभाषण चालू होत, आणि बीएसएनएल च्या कृपेमुळे ते संभाषण माझ्या कानावर पडत होत. हताश मनानं मी फोन खाली आपटला.

ही पहिली दुसरी वेळ नव्हती. दिवसातून एकदा तरी आम्हाला शेजारच्या जोशी , शहा , सोमण ह्यांच्या मधल्या संभाषणाची झलक ऐकायला मिळायची. त्या क्षणीच ते बीएसएनएल चं डबडं घरातून काढून एक नवा मोबाईल घ्यायचा आणि जुना मोबाईल घरी ठेवायचा अस मी ठरवलं. .

"तुमचा तो मोबाईल येईल का मला वापरता? तो बीएसएनएल चा डब्बा चं बराय माझ्यासाठी.. " रोज कमीत कमी दोनदा तरी हे वाक्य आईकडून ऐकायला मिळत होत. "होईल गं तुला सवय .. " अस तिच्या मनावर बिंबवून आम्ही तिला कसतरी पटवलं.

नुकत्याच लागलेल्या नोकरीच्या पगारात मी स्वतःला नवीन मोबाईल घेतला आणि जुना घरी आईला वापरायला दिला. त्याच्यावरून अनेकदा टोमणे पण ऐकावे लागले -

"शहाण्यानं स्वतःला नवीन मोबाईल ठेवला आणि मला जुना वापरायला दिला." अस आख्ख्या जगाला सांगून झालं.

पण कस का होईना, आमच्या म्हातारीनं मोबाईल वापरायला सुरुवात केली खरी.

पहिल्याच दिवशी पन्नास ते साठ कॉल झाले आणि आख्ख्या गावाला आईच्या मोबाईल चा नंबर मिळाला. पहिला आठवडाभर त्या मोबाईल चं भरपूर कौतुक झालं आणि नंतर मात्र तो मोबाईल बेवारश्यासारखा घरात पडून राहायला लागला. त्या मोबाईल वर येणारे सगळे कॉल मला येऊ लागले. "काय रे? तुझ्या आईचा मोबाईल लागतच नाही कधी."

मी आईला मोबाईल बद्दल विचारलं. "आई, हल्ली तू मोबाईल वापरत नाहीस का?"

"कसला मोबाईल घेऊन दिला आहेस रे ? घरात पण अजिबात रेंज नसते त्याला .. म्हणून मी नेत चं नही कुठे बाहेर." .. अश्या प्रकारचा कडक प्रतिसाद आला.

"अग खिडकीत ठेवत जा. आपल्या घरात कोणत्याच कार्ड ला रेंज नसते माहितिये ना तुला? " इथपासून मी आणि ताईनं जे सुरुवात केली ते अगदी "मोबाईल" या शब्दाच्या मराठीतल्या अर्थापर्यंत आम्ही येऊन थांबलो. तेव्हा जरा "मोबाईल" या वस्तूचा उपयोग आईला कळायला लागला.

त्या दिवशी आई तिच्या भजनातल्या मैत्रिणीशी मोबाईल वरून गप्पा मारत होती. मी तिच्याकडे एकटक बघत होतो.

"हा, अग तू येतियेस ना? माझं आवरून तयार आहे. पायऱ्या उतरतिये बघ. लवकर ये. भजनाला उशीर होईल"..

मोबाईल चा उपयोग अगदी जोरात चलू झाला होता. चार वाजताच्या भजनासाठी पूर्वी दुपारी साडेतिनालाच जोरजोरात हाका मारत येणाऱ्या तिच्या मैत्रिणी हल्ली येत का नाहीत ह्याच कारण मला त्या दिवशी कळलं.

"काय आई? जोरात आहे बाई तुझ्या मोबाईलची हवा .. " मी मुद्दामच तिला बोलून दाखवलं.

"गप रे .. " अस म्हणत ती नकळत लाजली, हळूच गालात हसली आणि आपल्या भजनाच्या क्लास ला निघून गेली.