मे संपून जून सुरु झाला की ,
निळ्या निळ्या आभाळात काळे काळे ढग यायचे
शाळा सुरु झाली की मास्तरांच्या छडीसारखे दिवस टोकदार नि कठोर व्हायचे
खरे म्हणजे दिवस कसे छान होते
गाभुळलेल्या चिंचेसारखे
आंबट चिंबट चवदार होते
शाळा सुरु झाली की सारेच बेचव व्हायचे
अभ्यास म्हटला म्हणजे बाबा…. आमचे धरणच फुटायचे …!!
काळे काळे ढग नि मस्त थंड हवा
खिशात चिंचा बोरे नि रंगीत रंगीत गोट्या
मास्तरांनी गणिताचे सूत्र :
{ अ -ब }२ विचारले
की काय सांगू बाबा ..आमचे तर धरणच फुटायचे ..!!
कसे छान छान दिवस यायचे थंड थंड हवेचे
ब्याट होती
बॉल होता
बेल-तेल होते
ब्याटला स्ट्रोक लावण्याचे
भवरा वरच्यावर झेलण्याचे
गणपतीचे
गौरीचे
मग दिवाळीचे दिवस यायचे
सहामयीचा रिझल्ट लागताच
आमचे मन गोते खायचे
काय सांगू बाबा … आमचे तर धरणच फुटायचे !!
रंगीत रंगीत सिनेमाचे काय मस्त मस्त दिवस होते
मस्त मस्त नट्या नि चोकलेट चोकलेट हिरो होते
थेटरमध्ये खाता खाता मस्त वाटायचे
गणिताचा पेपर आठवून तर बाबा…
आमचे धरणच फुटायचे ...!!
कधीतरी सर्कस यायची वर्षातून एकदा
रात्रीचा सर्च-लाईट फिरायचा मिट्ट काळोखात
कधी कधी रस्त्याने हत्ती फिरायचा
मोठ-मोठ्या बाम्बुवर्ती जोकर चालायचा
अशावेळी बाबा मलातर गणित आठवायचे
काय सांगू बाबा… माझे धरणच फुटायचे !
किती वर्षे झाली नि किती काळ गेला
कालच माझ्या स्वप्नामध्ये गणिताचा पेपर आला
गणिताचे सूत्र आठवताना काय सांगू बाबा... मला घाम फुटून गेला ……!!